माझ्या नजरेतून 04 शिक्षण बदलतंय… पण आपण काय गमावतोय?
शिक्षण बदलतंय… पण आपण काय गमावतोय? “मॅडम, आमच्या मुलाला अभ्यासासाठी पुस्तकाची गरजच नाही. सगळं मोबाईलवर मिळतं आता!” एका पालकाचं हे वाक्य ऐकलं आणि क्षणभर विचारात पडले. खरंच… काळ किती बदलला आहे! कधीकाळी मुलांच्या दप्तरात पुस्तकं, वह्या, पाटी, कंपासपेटी आणि दोन-तीन पेन्सिली असायच्या. दप्तर जड असायचं, पण त्यातल्या प्रत्येक वस्तूला एक वेगळी किंमत होती. आज दप्तर हलकं झालंय… पण शिक्षणाचं ओझं मात्र कदाचित वाढलंय. पूर्वी शिक्षक वर्गात फळ्यावर धडा लिहायचे. मुलं तो उतरवून घ्यायची. समजलं नाही तर हात वर करून प्रश्न विचारायचा. आज स्मार्ट बोर्ड आहेत, डिजिटल क्लास आहेत, ऑनलाइन अभ्यासक्रम आहेत, व्हिडिओ आहेत, ॲप्स आहेत आणि एका क्लिकवर जगभराची माहिती उपलब्ध आहे. शिक्षणाच्या या बदलाचं स्वागत करायलाच हवं. पण या सगळ्या आधुनिकतेकडे पाहताना मनात एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतो— आपण मुलांना शिकवतोय की फक्त माहिती देतोय? कारण माहिती आणि शिक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गुगलवर उत्तर मिळू शकतं; पण योग्य प्रश्न कोणता विचारायचा, हे गुगल शिकवू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता उत्तर तयार करून देऊ शकते; पण त्या उत्तर...