उमेदच्या महिलांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी कधी गोड होणार?
हजारो महिलांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा दिवा पेटवणारे हात स्वतःच्या आयुष्यात मात्र आर्थिक असुरक्षिततेच्या अंधारात का?
दिवाळी आली की घराघरांत आनंदाची तयारी सुरू होते. बाजारपेठा सजतात, फराळाचा सुगंध दरवळतो, मुलांच्या चेहऱ्यावर नवीन कपड्यांचा आनंद दिसतो. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात एक असा कर्मचारी वर्ग आहे, ज्याच्या मनात दिवाळीच्या आनंदापेक्षा भविष्याची चिंता अधिक आहे.
हा वर्ग आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी!
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा नवा प्रकाश निर्माण करण्यासाठी हे अधिकारी-कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.
गावागावांत बचत गटांची स्थापना, महिलांचे संघटन, ग्रामसंघ आणि प्रभागसंघांची बांधणी, बँक कर्ज जोडणी, आर्थिक साक्षरता, उद्योग व्यवसाय प्रशिक्षण, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिला उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी... कामांची यादी मोठी आहे आणि जबाबदाऱ्यांचा व्याप त्याहून मोठा!
कधी गावातील बैठकीत, कधी बँकेच्या दारात, कधी प्रशिक्षण केंद्रात, तर कधी महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शनाच्या स्टॉलवर हे कर्मचारी उभे असतात.
महिलांच्या उद्योगाला चालना मिळावी म्हणून रात्री उशिरापर्यंत प्रदर्शनाचे नियोजन केले जाते. महिलांच्या उत्पादनांना ग्राहक मिळावेत म्हणून प्रयत्न केले जातात. एखाद्या महिलेचा व्यवसाय सुरू झाला, तिच्या हातात स्वतःच्या कमाईचे पैसे आले, तिच्या कुटुंबात तिचा निर्णय महत्त्वाचा ठरू लागला, की त्यामागे या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा असतो.
महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आपल्या कामाचे समाधान मानणारा हा कर्मचारी वर्ग स्वतःच्या आयुष्यात मात्र अनेक प्रश्नांशी झुंजत आहे.
शासनाच्या प्रत्येक अभियानाला उद्दिष्टे असतात. दर महिन्याला अहवाल असतात, आढावा बैठका असतात, कामाचा पाठपुरावा असतो. आकडेवारी पूर्ण करण्याचा दबाव असतो. डिजिटल प्रणालीवर माहिती भरणे, वेळेत अहवाल सादर करणे, वरिष्ठांच्या सूचनांची अंमलबजावणी करणे, क्षेत्रीय कामकाज सांभाळणे या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना वैयक्तिक आयुष्य, कुटुंब आणि स्वतःच्या गरजा अनेकदा मागे पडतात.
कामाच्या बाबतीत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच जबाबदारी, कधी त्याहून अधिक अपेक्षा; पण वेतन, सुविधा, नोकरीची शाश्वती आणि सामाजिक सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र अनिश्चितता!
प्रश्न असा आहे की, ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण कोण करणार?
ज्या महिलांना बचत करायला शिकवतो, त्यांच्यासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देतो, उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन करतो, त्या महिलांच्या भविष्यासाठी योजना आखतो, त्याच अभियानातील कर्मचाऱ्यांच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार?
त्यांनाही कुटुंब आहे. मुलांचे शिक्षण आहे. घरभाडे, कर्जाचे हप्ते, औषधोपचार आणि रोजच्या जगण्याचा खर्च आहे. त्यांनाही दिवाळीत मुलांना नवीन कपडे घ्यायचे आहेत. घरात फराळ करायचा आहे. कुटुंबासोबत आनंदाचे चार क्षण घालवायचे आहेत.
मात्र वेतनातील अनिश्चितता, मानधनातील मर्यादा, सेवाशाश्वतीचा अभाव आणि भविष्याची चिंता यामुळे अनेकांच्या सणाचा आनंदही अपूर्ण राहतो.
सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, अभियानाच्या यशाची चर्चा होते तेव्हा उद्दिष्टपूर्तीचे आकडे पुढे येतात; पुरस्कार आणि कौतुकाचे सोहळे होतात. पण त्या यशामागे गावोगावी फिरणाऱ्या, स्वतःच्या वेळेची मर्यादा विसरणाऱ्या आणि महिलांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा किती होते?
महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आयुष्यात स्वावलंबनाची आणि सुरक्षिततेची हमी मिळू नये, ही विसंगती नाही का?
आम्हाला केवळ दिवाळी बोनस किंवा सणापुरती भेट नको आहे. आमची अपेक्षा आहे योग्य वेतन, वेळेवर मानधन, सामाजिक सुरक्षा, कामाची दखल, सेवाशाश्वती आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार.
उमेद अभियान हे केवळ योजना राबवणारे अभियान नाही; ते ग्रामीण महिलांच्या स्वप्नांना बळ देणारे व्यासपीठ आहे. पण या स्वप्नांना आकार देणाऱ्या मनुष्यबळाच्या प्रश्नांकडेही तितक्याच संवेदनशीलतेने पाहण्याची वेळ आली आहे.
कारण अभियानाची खरी ताकद केवळ बचत गटांच्या संख्येत, बँक कर्जाच्या आकड्यांत किंवा उद्योगांच्या उद्दिष्टपूर्तीत नाही; तर हे सर्व घडवण्यासाठी झटणाऱ्या माणसांमध्ये आहे.
हजारो महिलांच्या घरात स्वावलंबनाचा दिवा पेटवणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या घरातही एकदा आर्थिक सुरक्षिततेचा दिवा उजळू द्या!
या दिवाळीत एकच अपेक्षा...
उमेदच्या महिलांची दिवाळी गोड व्हावीच; पण त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड व्हावी.
कारण...
दुसऱ्यांच्या आयुष्यात उजेड निर्माण करणाऱ्यांच्या वाट्याला कायम अंधारच का?
उमेदच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी कधी गोड होणार?
— Smitaa






