Wednesday, 30 March 2016

डाळिंब माहिती

डाळिंब बागेचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन
-
सध्या उष्णता वाढत असल्याने मार्च ते मे या महिन्यात डाळिंबाच्या नवीन बागेची लागवड करू नये. त्याच प्रमाणे हस्त व आंबे बहार धरलेल्या बागांची उन्हाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी. 


वाढत्या उष्णतामानाचा फटका डाळिंबाच्या बागांना बसतो, त्यामुळे जलव्यवस्थापन, आच्छादन व बाष्परोधकांची फवारणी असे उपाय करावे लागतात.
- बाष्पोत्सर्जन कमी होण्याच्या दृष्टीने केओलिन २.५ ते ५ टक्के किंवा निम ऑईल १ मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे डाळिंबाच्या झाडांवर फवारणी करावी.
- डाळिंब बागेला शक्‍यतो रात्री पाणी द्यावे.
- दुपारच्या वेळी तापमान जास्त असेल तेव्हा फक्त पाण्याचा फवारा घ्यावा.
- गहू आणि सोयाबीनच्या भुश्श्याचा वापर बागेत सेंद्रिय आच्छादन म्हणून करावा. शक्य असल्यास काळ्या मल्चिंग पेपरचा वापर करावा. मात्र या दोन्ही प्रकारच्या आच्छादनाखाली वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
- बागेभोवती पश्‍चिम-उत्तर दिशेने मका अथवा शेवरीचे सजीव कुंपण तयार करावे, त्यामुळे बागेतील बाष्पोत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.

- हस्त बहारातील फळ काढणी -
हस्त बहारात सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये फुलापासून तयार झालेली फळे आता म्हणजेच एप्रिल दरम्यान काढणीस येतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडाला ६० ते ८० फळे घ्यावीत. फळ पक्व झाले की टोकाकडील पुष्प पाकळ्या मिटतात. साधारणतः फुलोऱ्यानंतर १५० ते २१० दिवसांनी आणि फळधारणेनंतर १२० ते १३० दिवसांनी डाळिंब काढणीस येतात.

- आंबे बहार व्यवस्थापन -
- उशिराचा आंबेबहार शक्‍यतो घेऊ नये; कारण या बहाराची फळे पावसात सापडून तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. त्याच प्रमाणे फुगवणीच्या काळात पाणी कमी पडू शकते.
- पानगळ करताना इथेफॉन २ मि.लि.प्रति लिटर या प्रमाणात घ्यावे.
- छाटणी झाल्यानंतर ताबडतोब १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
- छाटलेल्या, रोगट फांद्या, फळे जाळून नष्ट करावीत.
- डाळिंबाचा बहार धरताना प्रति झाड २० किलो शेणखत, २ किलो निंबोळी पेंड, १ किलो गांडूळ खत, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्लस, २५ ग्रॅम पीएसबी आणि १५ ग्रॅम अॅझोटोबॅक्‍टर द्यावे.
- दोन वर्षांच्या झाडाला पहिला बहार धरताना पहिले पाणी देतेवेळी २७० ग्रॅम युरिया अधिक ८०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट अधिक २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे.
- पूर्ण वाढ झालेल्या किंवा चार वर्षांपुढील झाडांना १४०० ग्रॅम युरिया अधिक १६०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ४०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश (६५०:२५०:२५० ग्रॅम नत्रःस्फुरदःपालाश) प्रति झाड द्यावे. त्यातील निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद, पालाश पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे. उर्वरित ३२५ ग्रॅम नत्राची अर्धी मात्रा गाठ सेट झाल्यानंतर दोन ते तीन हप्त्यात विभागून द्यावी.
- तसेच बहार धरतेवेळी २०० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा द्यावी. फळे लिंबू आकाराची असताना ५०० ग्रॅम १८:४६:०० आणि १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावा.
- फळे पेरू आकाराची असताना २०० ग्रॅम १९:१९:१९ आणि १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावा.
- विद्राव्य खतांचा वापर करताना झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार १२:६१:० , १९:१९:१९, १३:४०:१३,१३:०:४५, ०:५२:५० या ग्रेडचा वापर करावा.
- बागेत जमिनीवर कॉपर डस्ट (४ टक्के ) ८ किलो किंवा ब्लिचिंग पावडर २०-२५ किलो प्रती एकरी धुरळणी करावी. किंवा बागेत जमिनीवर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

कीड नियंत्रण -
मावा : Aphis gossipy
फूलकीड : Scircothrips tabaci
नुकसानाचा प्रकार : नवीन फुटीचे रसशोषण करतात.
प्रादुर्भावास अनुकूल परिस्थिती : नवीन फूट निघताना आढळतात.

जैविक उपाय-
निंबोळी अर्क ५ टक्के किंवा
अझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) १ मि.लि. प्रति १ लिटर पाणी


- रासायनिक उपाय : प्रति लिटर पाणी
डायमिथोएट १ मि.लि. किंवा
अॅसिटामिप्रीड ०.५ ग्रॅम किंवा
इमिडाक्‍लोप्रिड ०.४ मि.लि. किंवा
थायामेथोक्‍झाम ०.३ ग्रॅम

पाणी व्यवस्थापन :
ताण सोडताना डाळिंबाला पहिले पाणी पाच ते सहा तास द्यावे. डाळिंबाची बाग फुलोऱ्यात असताना बेताचे पाणी द्यावे. गाठ सेट झाल्यानंतर डाळिंब्याच्या झाडांना खालील वेळापत्रकाप्रमाणे पाणी द्यावे.

डाळिंबाच्या झाडाला अति पाणी दिल्यास सूत्रकृमी, बुरशीजन्य रोग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.


अधिक माहितीसाठी संपर्क : 0९७६७७३३६२२ 
ई-मेल : watavrukshafoundation@gmail.com

No comments:

Post a Comment