Thursday, 8 October 2026

माझ्या नजरेतून 07 व्यवस्था व्यक्तिकेंद्रित झाली की…


 

व्यवस्था व्यक्तिकेंद्रित झाली की…

कधी कधी एखाद्या कार्यालयात काम करताना एक प्रश्न मनात सतत येतो—
आपण व्यवस्था चालवत आहोत की व्यवस्था एखाद्या व्यक्तीभोवती फिरते आहे?

माझ्या कामाच्या अनुभवातून हा प्रश्न मला अनेकदा पडतो.

कार्यालय म्हणजे नियम, प्रक्रिया, जबाबदारी आणि पारदर्शकता यावर चालणारी व्यवस्था असावी. एखादी व्यक्ती आली किंवा गेली, अधिकारी बदलला किंवा कर्मचारी बदलला तरी व्यवस्था मात्र तशीच सक्षमपणे चालत राहायला हवी.

पण जेव्हा कार्यालय एखाद्या व्यक्तिकेंद्रित विचाराने चालू लागतं, तेव्हा प्रश्न निर्माण होतात.

कोणाची फाइल आधी जाईल?
कोणाचे काम लगेच होईल?
कोणाला उत्तर मिळेल?
कोणाला थांबवले जाईल?

आणि कधी कधी फाइलचा वेगही कामाच्या गुणवत्तेवर नाही, तर व्यक्तीच्या समीकरणांवर ठरतोय असं वाटू लागतं.

सगळ्यात जास्त वेदना तेव्हा होतात, जेव्हा एखादी महिला अधिकारी किंवा कर्मचारी स्वतःच्या कामाबाबत ठामपणे उभी राहते.

ती नियम सांगते—तर अडचणीची व्यक्ती.
ती प्रश्न विचारते—तर उद्धट.
ती कामाचा पाठपुरावा करते—तर जास्तच पुढे जातेय.
आणि ती स्वतःच्या अधिकारासाठी बोलते—तर तिचा स्वभावच तसा आहे.

पण याच गोष्टी एखादा पुरुष करतो तेव्हा त्याला कर्तव्यनिष्ठ, कडक आणि निर्णयक्षम म्हटलं जातं.

मग स्त्रीसाठी वेगळे मापदंड का?

माझ्या मते, कोणत्याही कार्यालयाची खरी ताकद एखाद्या व्यक्तीच्या प्रभावात नसते. ती व्यवस्थेच्या नियमांमध्ये, प्रक्रियेत आणि सर्वांसाठी समान वागणुकीत असते.

कारण व्यक्ती बदलतात…
पदं बदलतात…
अधिकारी बदलतात…

पण व्यवस्था टिकली पाहिजे.

आज कदाचित हा प्रश्न फक्त माझा नाही.

अनेक जण कार्यालयात शांतपणे काम करत असतील, मनात प्रश्न ठेवून…
“मी बोलू का?”
“बोलले तर माझ्या कामावर परिणाम होईल का?”
“माझी फाइल थांबेल का?”
“माझ्याबद्दल वेगळं मत तयार होईल का?”

ही भीती जर कार्यालयीन संस्कृतीचा भाग होत असेल, तर आपण थांबून विचार करण्याची गरज आहे.

कार्यालयात व्यक्ती मोठी नसते; पद मोठं असतं.
आणि पदापेक्षा मोठी असते—व्यवस्था.

म्हणूनच कदाचित आता एक साधा बदल हवा आहे—

व्यक्ती कोण आहे हे न पाहता,
काम काय आहे ते पाहूया.

कोणाच्या जवळची आहे हे न पाहता,
नियम काय सांगतो ते पाहूया.

आणि सर्वात महत्त्वाचं—

एखादी स्त्री आपल्या अधिकाराच्या खुर्चीवर बसली असेल,
तर तिची खुर्ची हलवण्याऐवजी
तिच्या अधिकाराचा सन्मान करायला शिकूया.

कारण व्यवस्था व्यक्तिकेंद्रित झाली की
काम हरतं… माणसं हरतात… आणि शेवटी विश्वास हरतो. 

                                                                                                         smitaa 

No comments:

Post a Comment