Thursday 28 November 2019

महात्मा ज्योतिबा फुले

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन.........
क्रांतीज्योत महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रतिष्ठा, सामाजिक व आर्थिक न्याय, शोषणविरहित समाजरचना, समान संधी या महान नैतिक मूल्यांवर आधारित समाजरचनेचे स्वप्न पाहिलेल्या आणि त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केलेल्या महात्मा फुले यांचा आज १२९ वा स्मृती दिन
“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले”
महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते, सार्वजनिक सत्यधर्माचे व सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले. बहुजन समाजाला सामाजिक हक्क मिळून देण्यात त्यांनी आपले आयुष्य वेचले. गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्य , अशा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जनजागृती केले. अस्पृश्यता, जातीयवाद व स्त्री-पुरुष भेदभाव समूळ नष्ट करण्यासाठी महात्मा फुले व पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अपार कष्ट घेतले.
मित्राच्या लग्नाच्या वरातीत अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंतर त्यांनी समाज सुधारणेचा वसा घेतला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची संकल्पना सर्वप्रथम त्यांनी मांडली. स्त्रीयांना शिक्षण देण्यासाठी फुले कुटुंबाने प्रस्थापित समाजाचा सर्व विरोध पचवला. पुण्यातील गंजपेठ येथील त्यांचे वास्तव्य एक क्रांतीचे केंद्र ठरले. त्यांनी आपल्या घराचा हौद सर्वांसाठी खुला केला. छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली शिवजंयती महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन साजरी केली. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधिचा शोध त्यांनी लावला. समाधीची पूजा केली..रयतेचे राज्य उभे करणा-या शिवाजीराजांवर त्यांनी कुळवाडीभूषण नावाचा पहिला पोवाडा लिहिला. सनातनी प्रवृत्तीच्या विरोधात समाजात जागृती करण्याचा चंग बांधून त्यांनी समाजाच्या हातातील मनुस्मृतीची बेडी तोडण्यासाठी मोठे कष्ट घेतले. प्रारंभी समाजातील लोकांनीच त्यांना अज्ञानातून विरोध केला. पुण्यातील ब्रम्हणांकडून जोतीरावांचा खूप छळ झाला. पण ते डगमगले नाहीत............... विधवा पुनर्विवाह, केशवपन अशा अनेक गंभीर सामाजिक विषयांना त्यांनी हात घातला. रावबहादूर विठ्ठलराव वांदेकर यांच्या पुढाकाराने ११ मे १८८८ रोजी ‘मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती-धर्म संस्था ’ मांडवी , कोळीवाडा , मुंबई येथे मोठ्या आदराने महात्मा ही पदवी देण्यात आली.
समाजसेवेला आपले पूर्ण जीवन वाहून घेतलेले दाम्पत्य म्हणून फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील.तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र नि समस्त स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे ह्या महात्म्याचे जीवितकार्य होते.
केशवपन सारख्या विकृत नि अमानवी रुढीविरुद्ध हा महात्मा उभा ठाकला नि त्यांनी विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.स्त्री नि अस्पृश्य ह्यांच्या शिक्षणाविरुद्ध शब्दही काढणे हे पाप मानले जात असतानाच्या काळात त्यांनी स्त्रियांसाठी नि अस्पृश्यांसाठी शाळा काढली. सनातन्यांनी धर्म बुडाला,धर्माचा नाश झाला. असा नेहमीप्रमाणे प्रचार सुरु केला पण त्याला ज्योतीबांनी भिक घातली नाही. स्त्रियांना आणि अस्पृश्य शाळेत शिकवण्यासाठी जाणार्या सावित्रीमाई ह्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली गेली दगड शेणाचा मारा झाला पण हि विद्येची देवता आपल्या निर्णयापासून जराही परावृत्त झाली नाही.स्वताला होणाऱ्या त्रासापेक्षा ह्या दाम्पत्याला स्त्रिया व शुद्र ह्यांच्या जीवनात परिवर्तन होणे ते सन्मानाने जगणे महत्वाचे होते
समाजात विधवाविवाह व्हावेत स्त्रीला पुन्हा नवे जीवन सुरु करण्याची संधी मिळावी ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दुष्काळात आपल्या घरचा हौद अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजासाठी खुला केला. महात्मा फुले हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते. आपल्या स्वताच्या उदाहरणातून ते समाजापुढे आदर्श ठेवत.सनातन्यांनी त्यांना रोखण्यासाठी बरेच प्रयत्न केले त्यांच्यावर मारेकरीही घातले पण ज्योतिबा नावाच्या वादळापुढे धर्मांधचा पाला पाचोळा हा उडून गेला.
समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
अश्या ह्या महामानवास व त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन.....🙏🏽🙏🏽🙏🏽

No comments:

Post a Comment