Tuesday 26 April 2016

यशोगाथा

जातिवंत गीर गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाचा

वाशीममधील वंदे गोमातरम शेतकरी गटाने घेतला पुढाकार 

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील पशुपालक गीर, खिलार, साहिवाल या देशी गायींच्या पालनाकडे वळताहेत; परंतु गोठ्यात जातिवंत गाय असेल तरच अपेक्षित दुग्धोत्पादन मिळते, जातिवंत कालवडी, वळू गोठ्यामध्येच तयार होतात. हे लक्षात घेऊन वाशीम येथील वंदे गोमातरम शेतकरी गटातील देशी गायींचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांनी त्यांच्याकडील गीर गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण (एर्बियो ट्रान्सफर) तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच प्रयोग केला आहे. यामुळे येत्या काळात जातिवंत दुधाळ कालवडी शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होतील. 

या प्रयोगाबाबत वाशीम येथील प्रयोगशील शेतकरी रवी मारशेटवार म्हणाले, की आम्ही सुधारित शेती तंत्रज्ञानाच्या बरोबरीने जातिवंत गीर गायींचे संगोपन सुरू केले आहे. आमच्या गटातील ४० पशुपालकांकडे १०० गीर गायी आहेत. यातील जातिवंत गीर गायींचे प्रति वेत दुग्धोत्पादन १६०० ते २००० लिटर इतके आहे. काही गाई प्रति दिन सात ते आठ लिटर दूध देणाऱ्या आहेत; परंतु जातिवंत दुधाळ गाई, योग्य खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन असेल तर निश्चितपणे या गायी प्रति दिन सरासरी १५ लिटर दुग्धोत्पादन देऊ शकतात. हे लक्षात घेऊन वंश सुधारणा आणि दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने आम्ही ३१ मार्च रोजी आमच्या गटातील पाच गीर आणि दोन गावठी गायींच्यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच प्रयोग केला. यासाठी गुजरातमधील पशुतज्ज्ञ डॉ. देवेनभाई पटेल यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. 

भ्रूण प्रत्यारोपणासाठी आम्ही प्रति वेत पाच हजार लिटर दूध देणाऱ्या गायींचे भ्रूण खरेदी करून त्याचे प्रत्यारोपण केले, त्यामुळे आमच्या गोठ्यात पुढील काळात जन्मणाऱ्या कालवडी प्रति दिन १५ ते २० लिटर दुग्धोत्पादन देणाऱ्या तयार होतील अशी आशा आहे. भ्रूण प्रत्यारोपणापूर्वी आम्ही डॉ. देवेनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनानुसार १४ मार्चपासून सतरा गायींमध्ये माज संकलन तंत्रज्ञानाचा (इस्र्टस हिट सिंक्रोनायझेशन) वापर केला. यामुळे २४ मार्च रोजी गायी माजावर आल्या. त्यानंतर सातव्या दिवशी डॉ. पटेल यांनी या गायींची तपासणी केली. त्यानुसार माझ्याकडील एक गीर गाय, कृषिभूषण दत्ताभाऊ लोणसुने आणि अभियंता कैलास जिवणे यांच्याकडील एका गावठी गाय आणि तहसीलदार निर्भय जैन यांच्याकडील दोन गीर आणि दोन गावठी गायींमध्ये ३१ मार्च रोजी भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले. आम्हाला एका भ्रूण प्रत्यारोपणाचा खर्च साडेसोळा हजार रुपये आला. या तंत्रज्ञानाच्या वापरातून चांगल्या गुणवत्तेच्या कालवडी किंवा वळू तयार होतील, अशी आम्हाला आशा आहे. त्या दृष्टीने या गायींचे व्यवस्थापन आम्ही ठेवले आहे. आठ मे महिन्याच्या आठ तारखेला रोजी आम्ही गायींची पुन्हा आरोग्य तपासणी करणार आहोत. तपासणीमध्ये योग्य पद्धतीने किती गायींमध्ये गर्भधारणा झाली हे निश्चितपणे समजेल. 

चांगल्या वंशावळीच्या गायींचे भ्रूण ः 
प्रयोगाबाबत माहिती देताना रवी मारशेटवार म्हणाले, की गुजरात राज्यातील बीडज येथील ‘एनडीडीबी` संचालित साबरमती आश्रम गोशाळेतील गीर आणि साहिवाल गायींचे भ्रूण आम्ही मागविले होते. गीर गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणासाठी जी-२२२ या गायीचे भ्रूण निवडले. ही गाय प्रति वेत ५,०६५ लिटर दुग्धोत्पादन देते. या गायीच्या रेतनासाठी जी-२० या वळूची रेतमात्रा वापरलेली होती. या वळूच्या आईचे प्रति वेत दुग्धोत्पादन पाच हजार लिटर आहे. दुसऱ्या गावठी गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणासाठी एस-४६७० या साहिवाल गायीचा भ्रूण निवडला. ही गाय प्रति वेत ३,९५० लिटर दुग्धोत्पादन देते. या गायीच्या रेतनासाठी एस-३६ या वळूची रेतमात्रा वापरलेली होती. 

गोवंश सुधारणेसाठी तंत्रज्ञान उपयुक्त 
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे जातिवंत भारतीय गोवंश सुधारणेसाठी फायदा होईल. गोठ्यामध्ये अधिक दूध उत्पादन देणाऱ्या कालवडी तयार होतील. वळूचीदेखील जातिवंत गुणवैशिष्ट्ये राहण्यास मदत मिळेल. आम्ही वाशीम जिल्ह्यात गोवंश सुधारणेसाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापराचा प्रस्ताव दिला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराचा सध्याचा खर्च जास्त आहे; परंतु भारतीय गोवंश सुधारणेसाठी असे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. 
-डॉ. रवी जाधव, 
पशुधन विकास अधिकारी, वाशीम 

यशस्विता महत्त्वाची... 
भारतीय गोवंश सुधारणा आणि दूध उत्पादनवाढीसाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. सध्याचा पातळीवर या तंत्रज्ञानाचा खर्च जास्त आहे. याची यशस्विता २० टक्क्यांपर्यंत आहे. ज्या गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण केले आहे, त्या गायींची पंचविसाव्या दिवशी अल्टा सोनोग्राफी किंवा दीड महिन्याने पशुवैद्यकाकडून तपासणी केली तर नेमकी किती गर्भधारणा झाली हे कळून येईल. जसे तंत्रज्ञान सुधारत जाईल, तसा याचा खर्च कमी होत जाईल आणि यशस्विता वाढेल.

No comments:

Post a Comment