Wednesday, 14 October 2026

माझ्या नजरेतून - १० नऊ दिवस देवीचा जागर… मग स्त्रीच्या सन्मानाचं काय?


 

नऊ दिवस देवीचा जागर… मग स्त्रीच्या सन्मानाचं काय?

        देवीच्या चरणी डोकं टेकवणारा समाज, घरातील स्त्रीच्या डोळ्यांतील अश्रू कधी पुसणार?

    नवरात्र सुरू आहे. घराघरांत घटस्थापना, मंदिरांत आरत्या आणि सर्वत्र देवीशक्तीचा जागर सुरू आहे. देवीच्या नऊ रूपांची पूजा करताना आपण स्त्रीशक्तीला नमन करतो. पण मनात एक प्रश्न येतो…

देवीच्या हातात शस्त्र पाहून तिच्या शक्तीचा गौरव करणारा समाज, एखादी स्त्री स्वतःच्या हक्कासाठी उभी राहिली की तिलाच दोष का देतो?

    देवी लक्ष्मीची पूजा करतो, पण घरातील स्त्रीने पैशांबाबत स्वतःचा निर्णय घेतला तर विरोध करतो. देवी सरस्वतीकडे ज्ञान मागतो, पण शिकलेली मुलगी स्वतःचं आयुष्य स्वतः ठरवू लागली की समाजाच्या भुवया उंचावतात.

    घरातील स्त्री दिवसभर सगळ्यांसाठी राबते, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते. तिच्या थकव्याकडे दुर्लक्ष करून आपण म्हणतो, “तिला सवय आहे!” पण तिलाही मन आहे, भावना आहेत, स्वप्नं आहेत… हे आपण कधी समजून घेणार?

    देवीला फुलं वाहताना, जिवंत स्त्रीच्या वाट्याला काटे तर देत नाही ना, याचाही विचार व्हायला हवा.

    नवरात्र म्हणजे केवळ उपवास, आरती आणि उत्सव नाही; तर स्त्रीच्या सामर्थ्याचा आणि सन्मानाचा स्वीकार करण्याची संधी आहे.

    यंदा देवीसमोर दिवा लावताना एक संकल्प करूया— स्त्रीच्या कष्टांची दखल घेऊ, तिच्या निर्णयांचा आदर करू आणि तिच्या स्वप्नांना बंधनांऐवजी बळ देऊ.

    कारण प्रत्येक स्त्रीने दुर्गेसारखं युद्ध करावं, अशी अपेक्षा करण्यापेक्षा तिला निर्भयपणे जगता येईल असा समाज निर्माण करणं अधिक महत्त्वाचं आहे.

शेवटी एवढंच…

देवीची पूजा नऊ दिवस नव्हे, तर स्त्रीचा सन्मान ३६५ दिवस करूया.

        कारण मंदिरातील देवीसमोर हात जोडणं ही श्रद्धा आहे; पण घरातील स्त्रीच्या स्वाभिमानाचा आदर करणं, हीच खरी स्त्रीशक्तीची पूजा आहे.

                                                                                — Smitaa 

1 comment: