Tuesday 16 April 2019

तुरटीचे गुणधर्म


बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’
साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती
आयुर्वेद ही भारताची एक ओळख! संपूर्ण जगाकडे जे नाही ते भारताकडे आहे. ते ज्ञान म्हणजे आयुर्वेद. त्यामुळे हे शिकण्यासाठी ज्याप्रमाणे जगभरातून लोक आज भारताकडे येत आहेत, त्याचप्रमाणे कित्येक वैद्य वेगवेगळ्या देशांमध्ये आयुर्वेद प्रचार कार्यासाठी जात आहेत. त्यांना सर्व प्रगत देशांकडून आग्रहाचे निमंत्रण मिळत आहे. मलासुद्धा गेली ७-८ वर्षे रशियामध्ये आयुर्वेद शिकविण्यासाठी जायची संधी मिळाली. मात्र प्रत्येक वेळी मीच काही तरी शिकून येतोय की काय असे मला वाटते. कारण आपण जेवढा आयुर्वेद वापरत नाही त्यापेक्षा थोडा जास्त आपलाच आयुर्वेद रोजच्या वापरात वापरणारे लोक मला तिथे भेटले.
एकदा एका रुग्णाशी सहज गप्पा मारत बसलो होतो तर तो मला तो रोज वापरत असलेल्या भारतीय बाजारपेठेतील काही आयुर्वेदिक वस्तूंची माहिती सांगायला लागला. आयुर्वेदिक टूथपेस्ट, साबण, तेल असे सांगून झाल्यावर तो मला म्हणाला की तुमचा तो ‘नॅचरल क्रिस्टल सोप तर फारच छान आहे. रशियन भाषेत नॅचरल चा उच्चार ‘नतुराल’ असा करतात त्यांच्या भाषेत ऐकायला फार छान वाटतं. असो. तो म्हणाला, ‘आमच्याकडे ज्यांना ज्यांना या सोपचा अनुभव आला आहे ते सर्वजण हाच वापरतात. फारच सुंदर आहे हा. या मुळे घामाचा दरुगध बिलकूल येत नाही. कोणतेही त्वचाविकार असतील तर याच्या नियमित वापरणे ते पटकन बरे होतात, एवढंच नव्हे तर मासिक पाळीच्या काळात या सोपने अंघोळ केल्यास कोणताही जंतुसंसर्ग होत नाही. हा उत्तम जंतुघ्न आहे. जखम तर फार पटकन भरते, आम्ही काही लागलं, कापलं तर प्रथम यानेच स्वच्छ धुवून घेतो. रक्तस्रावसुद्धा लगेच थांबतो. आता तर इथे सर्व पुरुषमंडळी दाढी केल्यानंतर आफ्टर शेवऐवजी हाच ‘नतुराल क्रिस्टल’ वापरतात. थोडा महाग आहे पण छान आहे.
कुतूहलापोटी मी त्याला तो आणून दाखवायला सांगितला. सायंकाळी तो रुग्ण साबण घेऊन आला. सुंदर बांबूच्या काडय़ांच्या वेष्टनात फार आकर्षक पॅकिंग केलेले होते. साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती. म्हणजे १ किलोची किंमत ४० हजार रुपये. असो. कुतूहल वाढत चाललं होतं, काय असेल कळत नव्हतं एवढं महाग, एवढं गुणकारी आणि तेही भारतीय? आयुर्वेदिक? म्हणून पटकन उघडून पाहिलं. तो आपल्या तुरटीचा खडा होता.
मी खरोखरच चकित झालो. काय सांगावं कळेना. त्याने तुरटीचे सर्व गुण अगदी बरोबर सांगितले होते. आणि आमच्या लहानपणी आमच्या घरी पण हाच वापरला जायचा. अगदी पूर्वी भारतीयांच्या प्रत्येक घराघरांत तुरटीचा एक खडा तरी अवश्य मिळायचा. सर्व पुरुष मंडळी दाढी केल्यावर तर हमखास लावायची. कापलं, लागलं की आमच्या लहानपणीचे हुकमाचे औषध होते ते. माझे विचारचक्र सुरू झाले. आम्ही विसरून गेलेल्या आमच्याच एका सवयीची व औषधाची आठवण त्याने करून दिल्याबद्दल मनातून त्याचे आभार मानले. हे असेच चालू राहिले तर काही काळाने हीच मंडळी आपल्याला आयुर्वेद शिकवतील आणि आपल्याकडे अगदी अजूनही १००-१५० रुपये किलोने मिळणारी तुरटी आपल्याला ४० हजार रुपये किलोने विकतील आणि आपणही ती आनंदाने घेऊ. कारण तेव्हा ती आपली ‘तुरटी’ नसेल. ती रशियन ‘नतुराल क्रिस्टल’ असेल.
महागडे डीओ लावून घामाची दरुगधी घालवण्यापेक्षा एकदा तरी तुरटी लावून पाहा किती छान वाटते. आफ्टर शेवसाठी सर्वोत्तम. खरंच घरातल्या घरात काही जखम झाली, कापलं किंवा खरचटलं की लगेच तुरटीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जखम पटकन भरून येते व जंतुसंसर्ग पण होत नाही. सततची सर्वागाची, योनीत, जांघेत खाज सुटत असेल तर तुरटीच्या साबणाने अंघोळ करा. खाज पटकन थांबते. त्वचारोग असणाऱ्यांनी तर आवर्जून या साबणाचा वापर करावा. दातातून, हिरडय़ातून  रक्तस्राव होत असल्यास अथवा दाढ दुखत असल्यास तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात व तुरटीच्या लाहीचे  चूर्ण मध व तुपात कालवून दिवसातून दोन ते तीन वेळा लावावे. तत्काळ उपशय मिळतो.
अशी बहुगुणी आज्जीबाईच्या बटव्यातील तुरटी आजकाल आपल्या किती लोकांच्या घरात आहे?





No comments:

Post a Comment