Saturday 10 March 2018

कोंडी

.....कोंडी...  

      रोज टी. व्ही. वर औरंगाबादच्या 'कचरा कोंडीची 'बातमी पाहून माझ्या मनात विचार आला,केवळ औरंगाबादच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न पुढे मागे निर्माण होऊ शकतो.याला कळत नकळत आपण सारेच जबाबदार आहोत का?
         आपण कमीतकमी  कष्ट करून ज्यास्त सुखात राहायचा प्रयत्न करतोय.वापरा आणि फेका ही प्रवृत्ती जपतोय.
         घरात छोटासा जरी कार्यक्रम असला तरी आपण लगेच 'यूज अँड थ्रो ' वाले ग्लास, चमचे,द्रोण, डिश आणतो ,वापरतो आणि फेकून देतो.घरात शोकेस मध्ये मारे ऐटीत ग्लास ,डिनर सेट ठेवलेले असतात, पण ते वापरले तर परत धुणार कोण? म्हणून आपण ते फक्त शोकेसची शोभा वाढवण्यासाठीच ठेवतो.धुवायला वेळ कोणाला आहे ?
          पूर्वी गावाला जाताना आपण मोठ्या  वॉटर बॅग्ज न्यायचो.पण आता ठिकठिकाणी बिस्लरीच्या बाटल्या घेतो,वापरून फेकून देतो.
            लहान मुलांचे 'लंगोट 'हा प्रकार तर आपण विसरूनच गेलोय.हगीज,सॅनिटरी नॅपकिन्स ! हात पुसायला रुमलाऐवजी पेपर नॅपकिन्स! बापरे! वापरा आणि फेका असा किती कचरा टाकतो आपण !
              पूर्वी वाण सामान आणताना घरातूनच तेलाची बरणी, तुपासाठी डबा न्यावा लागायचा.आता यासाठी विविध प्रकारच्या पॉलिथीन पिशव्या किंवा बाटल्या मिळतात,नंतर त्या आपण फेकतोच.
             पूर्वी लग्नाचा कितीही मोठा 'बस्ता ' बांधला तरी तो एकाच मोठ्या कापडात 'गाठोडं 'करून मिळायचा.आता प्रत्येक साडीसाठी व कपड्यासाठी स्वतंत्र पिशवीचा आपला अट्टाहास असतो.
              वस्तू दुरुस्ती कडे आपला कल नसतो.बूट, चप्पल,खेळणी,छत्री अशा गोष्टी आपण लगेच फेकून नव्या घेतो.
              'वापरा आणि फेका ' अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.याला जबाबदार कोण? याचे उत्तर म्हणजे सध्याचे धावते युग म्हणावे लागेल.कोणालाही वेळ नाही.रात्र थोडी सोंगे फार.प्रत्येक जण आपापल्या कोशात आणि व्यापात इतका अडकलाय की त्याला स्वतःच्या आयुष्याची कोंडी फोडायला वेळ नाही तर कचरा कोंडीचं काय घेऊन बसलात ?
              कंटाळा आला की आपण पटकन एखाद्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करतो,पण हे पार्सल फोडल्यानंतर होणाऱ्या कचऱ्याने एक अक्खी कॅरी बॅग भरते,पण आपण मात्र वेगळ्याच आनंदात असतो.
                 

No comments:

Post a Comment