Sunday 11 February 2018

गैरसमज

काही शेतकऱ्यांच्या मनातील गैरसमज

शेणखत अर्धवट कुजलेले अथवा न कुजलेले असेल तरीही फायदेशीर ठरते.

वास्तविकता:

मुळात आपण शेणखताचा वापर का करतो हे नीट समजून घेणे गरजेचे आहे. आपण शेणखत वापरतो कारण त्यात उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ व्हावी, जमीन भुसभुशीत राहावी आणि जमिनीची योग्य प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढावी. हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा शेणखत पूर्णपणे कुजलेले असते.

शेणखत अर्धवट/न कुजलेले असेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात.

१) जेव्हा आपण असे शेणखत मुळांभोवती टाकतो तेव्हा त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरूच असते. ह्या कुजण्याच्या प्रक्रियेत शेणखताचे तापमान 60-75 डिग्री सेल्सिअस च्या आसपास जाते. त्यामुळे झाडाच्या मुळांना शॉक बसतो अथवा इजा होण्याची शक्यता असते. परिणामी झाडाच्या उत्पादकतेत घट होते.

२) कुठलीही गोष्ट कुजण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. असे शेणखत कुजताना जमिनीतील ऑक्सिजन घेत असते आणि झाडांच्या मुळांनादेखील ऑक्सिजन आवश्यक असतोच. परिणामी  हे कुजणारे शेणखत जमिनीतील ऑक्सिजनचा साठा कमी करते आणि झाडाच्या मुळांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे झाडाच्या आत काही चुकीची संप्रेरके स्रवतात आणि हे झाडाच्या उत्पादनक्षमतेला मारक ठरते.

३) जर ह्या कुजणाऱ्या शेणखताला ऑक्सिजन मिळाला नाही तर ते सडण्याची प्रक्रिया सुरू होते. ह्या सडणाऱ्या शेणखतात उपद्रवी बुरशी/जीवाणू वाढण्याचा धोका निर्माण होतो.

अर्धवट/न कुजलेल्या शेणखताचा फायदा न होता त्याने तोटेच अधिक होतात. आपल्या पिकाला फायदा होणे तर दूरच, त्याची उत्पादकता कमी होऊन रासायनिक औषधांचा खर्च वाढतो.

म्हणूनच शेणखत टाकताना ते पुर्ण कुजलेले असायला हवे. ते उपलब्ध नसल्यास, फक्त आपल्या समाधानासाठी अर्धवट/न कुजलेले शेणखत हे न वापरलेलेच बरे.

No comments:

Post a Comment