Thursday 30 November 2017

चिलेटेड म्हणजे काय?

चिलेटेड म्हनजे काय. ?
चिलेट हा ग्रीक भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ पंजा असा होतो.
रासायनिकदृष्ट्या चिलेटस म्हणजे धनभारीत अन्नद्रव्ये उदा. लोह (आयर्न), जस्त (झिंक), मॅंगनीज (मंगल) आणि कॉपर (तांबे) यांच्या सोबत सेंद्रीय पदार्थाचा रासायनिक बंध तयार होवून झालेले संयुग. त्यामध्ये धनभारीत सूक्ष्म अन्नद्रव्य अणू धरून ठेवला जातो आणि पिकांना गुरजेनुसार उपलब्ध स्वरूपात मिळतो.
चिलेटसची वैशिष्ट्ये
* चिलेटस ही पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असतात किंवा पूर्णपणे विरघळतात.
* चिलेटसचा पिकांना फवारणीद्वारे तसेच जमिनीद्वारे देखील वापर करता येतो.
* चिलेट स्वरूपातील खतांची कार्यक्षमता जास्त असल्याने खतांचे वापराचे प्रमाण कमी लागते.
* चिलेट खते सल्फेट स्वरूपातील खतांपेक्षा महाग असतात. त्यामुळे त्याचा वापर जमिनीपेक्षा फवारणीद्वारे फायदेशीर दिसून येतो.
* नगदी पिकांकरिता जमिनीच्या काही विशिष्ट गुणधर्मामुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी पिकांसाठी जमिनीत ड्रिपद्वारादेखील प्रमाणशीर वापर करता येतो.
चिलेटसचे प्रकार
* चिलेट्स दोन प्रकारांत आढळतात
1. कृत्रिमरीत्या तयार केलेले चिलेट्स
2. नैसर्गिकरीत्या तयार झालेले चिलेट्स
1. कृत्रिमरीत्या तयार केलेले -
कृत्रिमरीत्या रासायनिक अभिक्रियेतून तयार केलेले चिलेट्स बाजारात उपलब्ध आहेत.
उदा.
1) ईडीटीए - ईथिलीन डायअमाईन टेट्रा ऍसिटीक ऍसिड.
2) एचईडीडीए - हायड्रॉक्सी इथाईल ईथिलीन डायअमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड.
3) ईडीडीएचए - ईथिलीन डायअमाईन डाय हैडॉक्सी ऍसिटिक ऍसिड.
4) सीडीटीए - सायक्लोहेनझेन डाय अमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड.
2. नैसर्गिकरीत्या तयार झालेले -
- सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तयार झालेली काही सेंद्रिय आम्ले प्रामुख्याने मॅलिक ऍसिड, टायटारिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड ही थोड्या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटिंगचे कार्य करतात. त्यामुळे पुरवठा करण्यात आलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत स्थिर न होता उपलब्ध स्वरूपात टिकून राहतात.
- नैसर्गिकरीत्या तयार सेंद्रिय पदार्थदेखील चिलेट्स स्वरूपात उपलब्ध होतात. उदा. सेंद्रिय खतांचे विघटन होऊन काही सेंद्रिय पदार्थ उदा. ह्युमीक ऍसिड, फलविक ऍसिड आणि विविध प्रकारची सेंद्रिय आम्ले व ऍमिनो ऍसिड्स तयार होतात. हेच सेंद्रिय पदार्थ चिलेट्स म्हणून कार्य करतात व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अणू धरून ठेवतात. पिकांना ते सहजपणे उपलब्ध होतात, त्यामुळे कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत किंवा निंबोळी पेंड इत्यादी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून सल्फेटयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास त्यांची कार्यक्षमता वाढवता येते.
- शेतकरी स्वतः नैसर्गिकरीत्या तयार झालेले चिलेट्स शेतावर तयार करू शकतात; ज्यांचा वापर जमिनीद्वारा सहजरीत्या करता येतो. अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय खतांच्या किंवा शेणखतवापरामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर अनिष्ट परिणाम होत असतो. त्यामुळे पूर्णतः कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा किंवा शेणखताचा वापर जमिनीत खत म्हणून करावा.

No comments:

Post a Comment