🍇 *द्राक्षावरील खोडकिडा- समस्या आणि व्यवस्थापन* 🍇
भारतामध्ये द्राक्षावर खोडकिडा प्रथमत: विभागीय फळ संशोधन केंद्र पुणे येथे सन १९६८ मध्ये आढळून आली. सुरुवातीस ही कीड दुय्यम स्वरूपाची होती कारण या किडीचे प्रमाण एक-दोन टक्केच दिसून येत असे शिवाय ज्या बागा जुन्या झालेल्या असत अशाच बागांमध्ये ही कीड आढळून येत असे.त्यामुळे द्राक्ष बागायतदार या किडीचा प्रामुख्याने असा विचार करत नसे. परंतु द्राक् षबागायतदार खुंटाकडे वळले तस तसे या किडीचे प्रमाण वाढत असतांना दिसून येत आहे. आज या किडीचा विचार केला असता ही एक प्रमुख कीड म्हणून ओळखली जाते.हल्ली ह्या किडीचे प्रमाण ५० ते ९० टक्क्यांनी वाढले आहे. या किडीस पोषक असलेले उष्ण कोरडे वातावरण आणि पाण्याची कमतरता शिवाय योग्य खुंट रोपाची निवड न केल्या गेल्या मुळे आणि खोडावर तसेच ओलांड्यावर अनावधनाने झालेल्या जखमामुळे ही कीड वाढते.
*किडीची ओळख-*
खोड किडीचे भुंगेरे हे २-३ से.मी.लांब व विटकरी रंगाचे असतात शिवाय अन्टेना (मिशा) या शरीरा पेक्षा जास्त लांब असतात. हे भुंगेरे पावसाळ्यात रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होतात.खोड किडीची अळी ही रंगाने पांढरट पिवळसर असते.अळीचे डोळे हे चपटे असून लहान असतात.शिवाय ह्या अळीला पाय नसतात,फक्त शरीरच्या हलचाली वरून अळी खोडात किंवा ओलांड्यात मागे पुढे सरकते.
*किडीचा जीवनक्रम-*
खोड किडीचे मादी भुंगेरे जून-जुलै महिन्यात बाहेर पडून खोडावर किंवा ओलांड्यावर ज्या ठिकाणी वेलीला जखमा असतील तेथे किंवा जखमा करून त्यात १०० ते २०० अंडी घालते.अंडी दीड ते दोन आठवड्यात उबवून अळ्या बाहेर येतात.बाहेर पडलेल्या अळ्या खोड तसेच वलांडे पोखरण्यास सुरवात करतात.अळीने खोडात किंवा ओलांड्यात प्रवेश केल्यानंतर ४ ते ६ महिने आतच राहते.कोषावस्था हीसुद्धा आतच असते.कोषावस्था एक महिन्याची असते.कोषांतून बाहेर पडलेले भुंगेरे तीन महिन्या पर्यत जगू शकतात.अशा त-हेने एक वर्षात फक्त एकच जीवनक्रम पूर्ण होतो.
अड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या जखमेच्या ठिकाणी पोखरण्यास सुरवात करतात.खोड किंवा ओलांडे पोखरलेल्या वेलीचे पाने प्रथम पिवळी दिसू लागतात.आणि नंतर या पानांवर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यासारखी लक्षणे दिसू लागतात.कालांतराने अशा वेली किंवा ओलांडे वाळून जातात.खोडात किंवा ओलांड्यात जर अळी असेल अशा वेळी अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर येत असतो.कारण जर खोडावर किवा आजुबाजूला निरीक्षण केले असता आपणास भुसा दिसून येतो.
ज्या बागा खुंटावर आहेत (रुट) अशा बागेमध्ये आपणास जरा वेगळा अनुभव येतो.कलम करतांना द्राक्ष बागायतदार चार ते पाच फुटवे ठेवतात. कलम करते वेळी फक्त चांगल्या निरोगी पेन्सिल आकाराच्या दोन काडयावर कलम केले जाते.आणि शिल्लक फुटवे कट केले जातात. परंतु अशा ठिकाणी पेस्ट केली जात नाही.या कट केलेल्या फुटव्यावर(कड्यावर ) मादी भुंगेरे अंडी घालतात.आणि त्याच ठिकाणा पासून पोखरण्यास सुरुवात करतात.त्यामुळे आपणास खुंटावरील बागेत दुस-या वर्षापासूनच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.याचा अर्थ खुंटावरील बागेत खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो असा नाही तर आपण वेलीला केलेल्या जखमांमुळे मादी भुंगे-यांना अंडी घालण्यास वाव मिळतो.म्हणून खुंटावर कलम केल्यानंतर पेस्ट केलीच पाहिजे.
*व्यवस्थापन-*
१) जून तसेच जुलै महिन्यात बागेजवळ प्रकाश सापळे लावले असता या सापळ्याकडे खोड किडीचे भुंगेरे आकर्षित होतात.असे आकर्षित झालेले भुंगेरे रॉकेल मिश्रीत पाण्यात नष्ट केले असता पुढील उत्पत्ती थांबेल.
२) आपल्या द्राक्ष बागेत खोडावर तसेच ओलांड्यावर जखमा होणार नाही याची दक्षता घ्यावी.जखमा असल्यास खोड तसेच ओलांड्यावर १:१ या प्रमाणात ब्लायटोसचे पेस्टीग करावे.पेस्टीग हे एप्रिल तसेच ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस घेणे अधिक चांगले.
३) छाटणी आगोदर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास असे ओलांडे,खोड किंवा काड्या करवतीने काढून घ्याव्या.आणि जखमांवर वरील प्रमाणे पेस्टीग करावे.
४)रुटस्टोकवर कलम करतांना अतिरिक्त फुटवे काढल्यानंतर त्यावर पेस्ट करावे.म्हणजे नवीन बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
५)बागेत खोड किडीचा प्रादुर्भाव झालेला आसेल अशा वेळी खोड किडीचे छिद्रे तारेच्या साह्याने मोकळी करावीत.व अशा छिद्रात इंजेक्शनच्या साह्याने नुवान २० मिली प्रतिलीटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रत्येक छिद्रात २० ते २५ मिली या प्रमाणात सोडून छिद्र गाळाच्या साह्याने हवाबंद करावीत.नुवान खेरीज आपण क्लोरोपायरीफॉस सुद्धा वापरू शकता.क्लोरोचे प्रमाण २५ मिली प्रतिलीटर या प्रमाणात वापरावे.
६)छिद्रात इंजेक्शनच्या साहाय्याने जर पेट्रोल सोडून गाळाच्या सहाय्याने छिद्र लगेचच बंद केलीतर खोड कीड लगेच मरते.
विषारी आमिष वापरताना वर्षातून दोन तीन वेळेस वापरावे.
_*|| अन्नदाता सुखी भवः ||*_
No comments:
Post a Comment