जीवन
शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
जन्मदिवस
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.
कार्य
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाला.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
शाहू महाराजांचे नाव घेतले की दुर्दैवाने आजही काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात. तर काही लोकांना शाहूंच्या विचाराशी काही देणेघेणे नसते पण उठता बसता शाहूंचे नाव घ्यायला आवडते. तर काहींना शाहूंचे विचार केवळ आरक्षणाच्या अनुषंगाने महान वाटतात, त्या लोकांना शाहू म्हणजे केवळ आरक्षणाचे उद्गाते वाटतात. काही लोकांना शाहू फक्त आपल्या जातीच्या भूषणापायी प्रिय वाटतात ! तर काही लोकांना राजकीय सोयीपोटी शाहू जवळचे वाटतात. सपूर्ण शाहू महाराज खूप कमी लोकांच्या पचनी पडतात ! शाहूंची पूर्ण माहिती नसतानाही त्यांची भलावण करणारे आणि खाजगीत त्यांच्या नावे बोटे मोडणारे असे दोन्ही प्रकारचे लोक समाजात मोठ्या प्रमाणात आढळतात. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय मनापासून संपूर्ण शाहू ज्यांच्या मनाला पटले आहेत असे लोक मात्र खूप कमी आढळतात ! नेमके कोणते कार्य शाहू महाराजांनी केले आहे ? शाहूंचे सामाजिक योगदान काय आहे ? त्यांच्या जातीधर्मा विषयी कोणत्या भूमिका होत्या ? या सर्व बाबींचा धावता आढावा वाचायचा असेल तरच पुढे वाचा अन्यथा आपला हिरमोड होईल .......
आज शाहूंच्या नावाने आपली दुकानदारी चालवणारया लोकाना त्यांचा इतिहास आणि त्यांची विचारधारा कितपत माहित असेल हा संशोधनाचा विषय व्हावा अशी परिस्थिती आहे. तरीदेखील आजही अनेकांच्या सामाजिक जाणिवांचे बावनकशी प्रेरणास्त्रोत अशीच शाहूंची आजची ओळख आहे...समतेचे अन बंधुतेचे कागदी गोडवे आजही सर्वत्र गायिले जातात परंतु खरे कार्य करताना नाके मुरडली जातात हा अनुभव आहे, त्यामुळेच शाहूंच्या जन्माला १४२ वर्षे उलटूनही त्यांच्या विचारानुसार समग्र आयुष्यभर तंतोतंत वाटचाल करणारा नेता आजच्या घडीला अस्तित्वात नाही...
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो..शाहू महाराजांना "राजर्षी" ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातला. आज शाहूंची जयंती. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती. कारण माणसाला पशुत्वापासून मनुष्यत्व मिळवून देणारे एक प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण होय. त्यामुळे शिक्षणाशिवाय आपला उध्दार होणार नाही. हे राजर्षीनी ओळखले होते. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. एवढेच नाही तर ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळांची निर्मित केली. आणि एवढ्यावरही महाराज थांबले नाहीत तर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.शाहू राजे हे त्यांच्या कर्तृत्वामुळे नावाप्रमाणेच यशवंत राहिले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा मोठ्या समर्थपणे घेऊन जाण्याचे कार्य करणारा एक महान मानवतावादी राजा म्हणून राजर्षी शाहू महारजानी आपली ओळख निर्माण केली. या व्यापक दूरदृष्टीच्या राजाने त्याकाळी राजेशाही असतांनासुध्दा सामाजिक बंधूभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये आजच्या लोकशाहीतील शासनालाही करणे शक्य होत नाही. असे अद्वितीय स्वरुपाचे कार्य केले.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून या निधड्या छातीच्या समाजसुधारकाने ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. नुसती घोषणा करुन थांबणारे ते राजे नव्हते तर त्वरीत अंमलबजावणी करुन संबंधीत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. राजर्षीवर अनेक प्रकारचे आरोप केले.त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.
त्यावेळेस धर्मव्यवस्थेने स्त्रियांना अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क, अधिकार, नाकारले, स्त्री म्हणजे केवळ चूल व मूल या पुरतीच मर्यादित ठेवली त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अतिशय विचित्र पद्धत आपल्या देशात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातीभेदाचे प्रस्त नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला. परंतु आज एकविसाव्या शतकामध्ये आणि लोकशाही शासनव्यवस्थेमध्ये मात्र स्त्रिभ्रूणहत्या, हूंडाबळी सारख्या अनेक माध्यमातून स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात बळी दिला जात आहे. आज स्त्रीयांना या संकटातून बाहेर काढावयाचे असेल तर राजर्षी शाहूंचा स्त्रीविषयक व्यापक दृष्टीकोनच आपण स्विकारणे ही काळाची गरज आहे.
तत्कालीन परिस्थितीमध्ये जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करुन गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वनवन भटकणाऱ्या लोकांना राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.
गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन राधानगरी नावाचा प्रकल्प उभा केला. जेणेकरून भविष्यात माझ्या रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही ही दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरणाची निर्मिती केली. राजषी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ आर्थिक मदत केली.
आज शाहू राजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु केवळ एवढ्याने त्यांच्या विचार व कार्याचे चिज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी हेाता. आत्मसन्मासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्ती विरुध्द होता. आज शाहू राजांच्या नंतर मात्र त्यांचाच जयजयकार करणारे त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगीरी या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहू राजे फक्त जयंती व पुण्यतिथी पुरते मर्यादित केले आहे. त्यांचा वारसा, विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टिका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. आजचे राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात. मात्र त्यांचा विचार जपतांना घाबरतात. ही दुर्दैवी बाब आहे.... या महान लोकराजाला त्रिकाल अभिवादन...
शाहू महाराजांचे नाव असलेल्या संस्था
- शाहू आर्ट गॅलरी, कसबा बावडा (कोल्हापूर)
- शाहू कापड गिरणी, कोल्हापूर
- शाहू कुस्ती मैदान, खासबाग (कोल्हापूर)
- शाहू कॉलेज, पुणे
- कोल्हापूर जिल्हा परिषदेचा राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
- शाहू ग्लोबल स्कूल (स्वराज्य रयत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, औरंगाबाद.)
- शाहू चित्रमंदिर, कोल्हापूर (स्थापना : १५ मे, इ.स. १९४७)
- राजर्षी शाहू जलतरण तलाव, मोहननगर (पिंपरी-पुणे)
- शाहू नगर. जळगाव
- छत्रपती शाहू पुतळा, महाराष्ट्र भवन (नवी दिल्ली); संसद प्रांगण (नवी दिल्ली); दसरा चौक (कोल्हापूर); पुणे विद्यापीठ; श्री शिवाजी प्रिपरेटरी मेमोरियल संस्थेच्या आवारात-पुणे; उंड्री;
- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू पुरस्कार
- राजर्षी शाहू पुरस्कार (छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा पुरस्कार)
- लोकराजा राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्था, पुणे
- शाहू भवन, बलिया (बिहार)
- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे
- छत्रपति शाहू जी महाराज मेडिकल विश्वविद्यालय, लखनौ (आता या विद्यापीठाचे नाव बदलून किंग जॉर्ज मेडिकल विश्वविद्यालय केले गेले आहे!)
- राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर
- शाहू मैदान, कोल्हापूर
- राजर्षी छत्रपती शाहूमहाराज रेल्वे टर्मिनस (अधिकृत हिंदी लघुरूप ’छशाट’) : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव
- राजर्षी शाहू विकास आघाडी, जयसिंगपूर
- छत्रपति शाहू जी महाराज विश्वविद्यालय, कानपूर
- छत्रपति शाहू जी महाराज शोध एवं प्रशिक्षण संस्थान, भागीदारी भवन, गोमती नगर, लखनौ
- राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम
- राजर्षी शाहू सहकारी बँक
- राजर्षी शाहू महाराज सोशल नॅशनल पुरस्कार
- राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
शाहू महाराजांवरील प्रकाशित साहित्य
- Rajarshi Shahu Chatrapati : A Socially revolutionary King (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
- शाहू महाराजांची चरित्रे. लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ.अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार(यांनी २००१ साली लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती, ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
- बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
- राजर्षी शाहू छत्रपती. लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव. नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.
- कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य. लेखक : एकनाथ केशव घोरपडे
- राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य. लेखक : रा.ना. चव्हाण
- राजर्षी शाहू कार्य व काळ. (लेखक - रा.ना. चव्हाण)
- समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका
- लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
- राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)
No comments:
Post a Comment