एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जे प्रबोधनपर्व सुरू झाले, त्या पूर्ण प्रबोधनपर्वातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत. उणेपुरे ४८ वर्षे इतकेच आयुष्य त्यांना लाभले. या आयुष्यातील सुमारे २८ वर्षांची त्यांची कारकिर्द ही सामाजिक कार्याची होती.
शाहू महाराजांनी राज्यसूत्रे हाती घेतली, त्यावेळी त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते. राज्याधिकार मिळताच त्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठविण्याचा इंग्रज सरकारचा विचार होता, पण शिक्षणाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचा मोह टाळून आपल्याच संस्थानाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यात कशा कशा सुधारणा घडवून आणायच्या यावर त्यांनी भर दिला. तसेच शेती, शिक्षणसंस्था, उद्योगधंदे यात कसे बदल करायचे याचे आडाखे बांधले व विनाविलंब प्रत्यक्ष कार्यास वाहून घेतले.
शाहू महाराजांनी आपल्या समाजसुधारणांचा केंद्रबिंदू शिक्षणप्रसार मानला. त्यांनी सर्व प्रकारच्या जाती-जमातींसाठीविद्यार्थी वसतीगृहे काढली. बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली झाली पाहिजेत, शिक्षणापासून सर्व समाज स्वावलंबी बनेल, राज्यकारभारात त्यांचा सहभाग होईल व विषमता दूर होण्यास त्यांची मदत होईल ही महाराजांची भूमिका होती. म्हणूनच की काय सुप्रसिद्ध चरित्रलेखक धनंजय कीर यांनी ‘राजर्षी शाहू छत्रपती’ या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे की, ‘खरोखर बुद्धानंतर भारतात राजर्षी शाहू हाच एक असा राजा होऊन गेला की, जो हरिजन, गिरीजन यांच्या पंक्तीस प्रेमाने, निर्भयपणे व उघडपणे जेवला. त्यावेळचा काळ लक्षात घेता सर्वधर्मांच्या लोकांच्या पंक्तीत बसणे, त्यांच्या शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत करणे, त्यांना राज्यकारभारात सहभागी करून घेणे ही एक प्रकारची क्रांतीच होती. ती शाहू महाराजांनी केली.
राष्ट्रसेवा, राष्ट्रैक्य आणि जात्याभिमान यातील संबंध त्यांनी चांगल्या प्रकारे उलगडून दाखविला आणि राष्ट्रवाद तसेच समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा सामान्य जनतेपासून तो उच्चवर्णियांपर्यंत सर्वांनी विचार केला पाहिजे, अशी भूमिका मांडून सर्वांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला.
राज्यारोहणानंतर प्रारंभीच्या काळातच दुष्काळाचे भीषण संकट कोसळले. यावेळी जनतेला अन्नधान्याचा व गुरांना गवत-चार्याचा तातडीने पुरवठा करून आपल्या यशस्वी कारकिर्दीची जणू चुणूक त्यांनी दाखवली. पुढे अशा संकटांवर काय’ची मात करण्यासाठी मूलभूत उपाययोजना म्हणून ‘सार्वजनिक पाटबंधारे धोरण’ जाहीर केले. स्वतंत्र पाटबंधारे खाते निर्माण करून त्यावर खास अधिकारी नेमले. प्रत्येक गावची जातीने पाहणी करून जुन्या विहिरी, तलाव यांच्या दुरुस्त्यांची कामे हाती घेतली. तसेच नवे तलाव, बंधारे यांच्या का’ानांही प्राधान्य दिले.
शेतीच्या क्षेत्रात ’हाराजांनी दाखविलेली प्रयोगशीलताही वाखाणण्याजोगी होती. आजपर्यंत ज्या भागात कधीच न घेतलेली चहा, कॉफी, कोको, वेलदोडे, रबर अशी विविध पिके घेण्याचे प्रयोग करून लोकांना उत्तेजन दिले. शेती मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे. व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला तरच समृद्धी येईल, हे जाणून खास बाजारपेठ स्थापन केली. बाहेरून काही व्यापारी मंडळींना पाचारण केले. त्यांना जागा दिल्या. पुढे कोल्हापूर ही ‘गुळाची मोठी पेठ’ म्हणून उदयास आली. त्याच्यामागे महाराजांचा दूरदर्शीपणा होता.
संस्थेने औद्योगिक सर्वेक्षण करून त्याच्या आधाराने मोठ्या कल्पकतेने नवनवे उद्योग सुरू केले. सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग सुरू केले. संस्थांनातील तरुण प्रशिक्षणासाठी बाहेर पाठवले व प्रशिक्षण झालेल्यांना संस्थानात बोलावून अधिकारपदे दिली. मधुमक्षिका पालन उद्योगाच्या बाबतीत तर संपूर्ण देशात त्यांचे जनकत्त्व कोल्हापूरला प्राप्त करून दिले. ‘दि शाहू छत्रपती स्पिनिंग ऍण्ड व्हिविंग मिल्स’ ही मोठी गिरणी सुरू केली. साखर कारखाना, ऑईल मिल, सॉ मिल, फाऊंड्री, इलेक्ट्रीक कंपनी, मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी अशा अनेक उद्योगांचा प्रारंभ महाराजांनी केला. प्रशिक्षित कामगार तयार व्हावा म्हणून ‘राजाराम इंडस्ट्रियल स्कूल’ काढले. संस्थानतून निघून गेलेल्या विणकरांना परत बोलावून त्यांची संघटना बांधली. त्यांना मदत केली आणि धोतरे, लुगडी, चोळीखण यांच्या उत्पादनाला ऊर्जितावस्था आणली.
स्वतः शाहू महाराज एक कसलेले मल्ल होते. आपल्या संस्थानातील विविध पेठांतून व गावोगावी त्यांनी तालमी उभ्या केल्या. तरुणांना व्यायामाची गोडी लावली. साहस, बळ, एकाग्रता, कौशल्य हे गुण पणाला लावावे लागणार्या तरुणांच्यात पुरुषार्थ जागवणारे खेळ सर्वदूर वाढतील असे प्रयत्न केले.
सर्व बाजूंनी विपरीत असलेल्या परिस्थितीशी मोठ्या धैर्याने झुंज देत कालचक्राचे उलट फिरणारे काटे, सुलट फिरवणारे राजर्षी शाहू महाराज परिवर्तनाचे उद्गाते होते. इ.स. १८९४ ते १९२२ या केवळ २८ वर्षांच्या कारकीर्दीत आपल्या संस्थानातील प्रजेलाच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला मार्गदर्शक ठरावे असे काम आपल्या हयातीत केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या असामान्य कार्यास विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment