Thursday 19 May 2016

पिक व्यवस्थापन सल्ला

पीक व्यवस्थापन सल्ला
-
- शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करावीत.
- उन्हाळी पाऊस पडल्यानंतर गवत उगवून आल्यानंतर कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
- जमीन सपाटीकरण व बांधबंदिस्तीची कामे पूर्ण करावीत.
- शेतातील मातीचे प्रातिनिधिक नमुने गोळा करून ते मृदापरीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवावेत.
- धान्य (गहू, ज्वारी, हरभरा) साठवून ठेवण्यापूर्वी ते कडक उन्हात २-३ दिवस चांगले वाळवून साठवावे.
- उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, मूग पिकांस गरजेनुसार पाणी द्यावे.
- पूर्वहंगामी उसाची बांधणी करून रासायनिक खतांची मात्रा (१३६ किलो नत्रासाठी २९५ किलो युरिया, ८५ किलो स्फुरदासाठी ५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ८५ किलो पालाशसाठी १४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रतिहेक्टरी द्यावी.
- खरीप हंगामात लागवडीसाठी सुधारित बियाण्यांची निवड करावी. प्रमाणित बियाणे खरेदी करावेत. बियाण्यांची पावती तसेच टॅग व पिशवी जपून ठेवावी.
- पिकासाठी रासायनिक खते, बीजप्रक्रियेसाठी आवश्यक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जिवाणू संवर्धकांचे नियोजन करावे.

उन्हाळी भुईमूग ः
१) जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
२) पिकाची वेळेवर काढणी करावी.

उन्हाळी बाजरी ः
१) तयार झालेल्या उन्हाळी बाजरीची वेळेवर काढणी करावी.

ऊस ः
१) जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
२) पाण्याचा तुटवडा असल्यास आच्छादनाचा वापर करून एकाआड एक सरी पद्धतीने पाणी द्यावे.
३) सुरू उसास पाणी पुरेसे असल्यास शेवटचा रासायनिक खताचा हप्ता हेक्टरी १०० किलो नत्रासाठी २१७ किलो युरिया, ५५ किलो स्फुरदसाठी ३४४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५५ किलो पालाशसाठी ९२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश देऊन बांधणी करावी.

कांदा ः
१) कांदा काढणीपूर्वी ३ आठवडे पाणी बंद करावे. काढणीनंतर कांदा पातीसह ३-४ दिवस शेतामध्ये सुकू द्यावा. नंतर ४-५ सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. त्यानंतर कांदा सावलीत २१ दिवस सुकवावा. प्रतवारी करावी.

आले लागवड ः
१) आले लागवडीसाठी मध्यम खोल व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.
२) जमिनीची १५ ते २० सें.मी. खोल नांगरणी करून हेक्टरी १२ ते १५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरून कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. दोन टन निंबोळी किंवा करंजी पेंड आल्याची उथळणी करतेवेळी लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी द्यावी.
३) लागवड मे महिन्याअखेरपर्यंत करावी.
४) लागवडीसाठी ३ ते ५ सें.मी. लांबीचे १ ते २ रसरशीत डोळे असलेले ३० ते ५० ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत.
५) मूळकुजव्या रोग झालेल्या शेतातील आले बेणेसाठी वापरू नये.
६) हेक्टरी १८ ते २० क्विंटल बियाणे लागते.
७) लागवड गादी वाफा, सपाट वाफा व सरी पद्धतीने करता येते.
गादीवाफा - २० x २० सें.मी.
सपाट वाफा - ३ मी. x २ मी. वाफ्यात २० x २० सें.मी.
सरी पद्धत - ४५ सें.मी. रुंद सरी वरंब्याच्या दोन्ही बाजूस ४ ते ६ सें.मी. खोलीवर २० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
८) प्रतिहेक्टरी १२० किलो नत्र तीन समान हप्त्यात लागवडीनंतर पहिला हप्ता दीड महिन्याने, त्यानंतर दुसरा व तिसरा हप्ता एक-एक महिन्याच्या अंतराने द्यावे. प्रतिहेक्टरी ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात पसरून द्यावे.
९) लागवडीपूर्वी मातृकंद १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक ४० ग्रॅम कार्बारील प्रति १०० लिटर पाण्याच्या द्रावणात ५ ते १० मिनिटे बुडवावेत. त्यानंतर लागवडीपूर्वी ॲझेटोबॅक्टर, पीएसबी व ट्रायकोडर्मा यांच्या संयुक्त द्रावणात (प्रत्येकी दोन किलो प्रति एकरी ५० लिटर पाणी) बुडवून लागवड करावी.
१०) लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. तसेच तिसऱ्या दिवशी आंबवणी द्यावे. पाणी साठून राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
११) मुळा, गवार, घेवडा, मिरची ही आंतरपिके घ्यावीत.

फळबाग व्यवस्थापन ः
- पाणी उपलब्धतेनुसार फळबागेमध्ये वाळलेले गवत, पालापाचोळा यांच्या आच्छादनाबरोबरच मडका सिंचन पद्धतीचा वापर कवा.
- लागवडीसाठी लागणारी आवश्यक कलमे/रोपे यांची मागणी सरकारमान्य रोपवाटिकेकडे नोंदवावी.
- नवीन फळबाग लागवडीसाठी खड्डे घ्यावेत. ते १५ ते २० दिवस उन्हात तापवून नंतर खत-मातीने भरून घ्यावेत.
- बोरांची छाटणी ६० सें.मी.पर्यंत मुख्य खोड ठेवून, ४ ते ६ दुय्यम उपफांद्या ठेवून करावी.
- रोगग्रस्त फळझाडांची छाटणी करावी.
- लिंबू, मोसंबी, संत्री, डाळिंब, पेरू इत्यादी फळझाडांची मृगबहार धरण्यासाठी पूर्वतयारी करावी.
- झेंडू लागवड ४५ ते ६० सें.मी., शेवंती ६० सें.मी. व गुलछडी २० ते ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
- निशिगंधाची लागवड करावी.
- जूनमध्ये लागवडीसाठी फूलझाडांच्या रोपांसाठी बियांची पेरणी करावी.

पाणीटंचाईच्या काळात फळबागांचे व्यवस्थापन ः
१) अवर्षणाचा ताण कमी करण्यासाठी संरक्षित पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी पाणी वाचविणाऱ्या पाणी देण्याच्या पद्धतींचा अवलंब करावा. उदा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मडका पद्धत. या पद्धतीमुळे कमी पाण्यात जास्त झाडांना पाणीपुरवठा करता येऊ शकतो. पाटपाणी देणे शक्यतो टाळावे.
२) फळबागेमधील तण काढावे. आळ्यातील माती हलवून भुसभुशीत करावी त्यामुळे शेतात पडलेल्या भेगा बुजवून केषाकर्षणाने खालच्या थरातील पाणी वर येणे थांबते. जमीन हलविल्यामुळे भेगा व तंतूवाहिन्या मोडळ्या जातात आणि वर येणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण झाल्याने हवेत बाष्पीभवनाद्वारे पाण्याचा होणारा नाश थांबविता येतो. त्यामुळे १० ते १५ मि.मी. ओलाव्याची बचत होते.
३) बाष्पीभवनामुळे जमिनीतील सुमारे ७० टक्के पाणी उडून जाते. हे थांबवून धरण्यासाठी कोिळपणी अथवा जमीन हलविणे सोबतच बागेत झाडाभोवती आच्छादनाचा वापर करावा. आच्छादनासाठी प्लॅस्टिक फिल्म, शेतातील निरुपयोगी काडीकचरा, धसकटे, गवत, तुरकाट्या अथवा पाचट झाडाच्या खोडाभोवती, झाडाच्या वाढीच्या घेरापेक्षा एक ते दोन फूट जास्त बाहेरपर्यंत पसरावे. सेंद्रिय आच्छादनाचा थर ८ ते १० सें.मी. जाडीचा असावा. आच्छादनामुळे २४ ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते.
४) जमिनीत ओलावा कमी असल्यामुळे झाडे कोमेजतात. पानांचे तापमान वाढते. झाडांच्या पानातून मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ जाते. पानातील अन्नांश तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. अशा वेळी झाडे जगविण्यासाठी एक टक्का युरिया, एक टक्का म्युरेट ऑफ पोटॅशचा फवारा पिकावर मारल्यास झाडांना अन्नपुरवठा थोड्या प्रमाणात होऊन झाडामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती येते. झाडे मरण्याचे प्रमाण कमी होते.
५) पाणीटंचाई काळात शक्यतो फळझाडावर बहर घेऊ नये.अथवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करावे. पाणी कमी असल्यास व झाडावर फळे धरली असल्यास झाडे जगविण्यासाठी झाडावरील एकूण फळांपैकी काही फळे तोडून त्यांची विल्हेवाट लावावी, म्हणजे झाडाची पाण्याची गरज कमी होईल.
६) झाडांनी जमिनीतून शोषलेल्या पाण्यापैकी फार मोठा भाग पाने व फांद्यांमधून बाष्पीभवनाद्वारे हवेत निघून जाते. ते कमी करण्यासाठी झाडावरील अनावश्यक फांद्या, पाने काढून कमीत कमी आवश्यक तेवढीच पाने व फांद्या झाडावर ठेवाव्यात. त्यामुळे झाडातील पाण्याचे बाष्पीभवनाद्वारे उत्सर्जन कमी होईल.
७) पाणीटंचाई काळात पिकांना रासायनिक खतांची मात्रा शक्यतो देऊ नये. पाण्याच्या उपलब्धतेनुसार रासायनिक खताच्या मात्रा द्याव्यात. पिकावरील कीड व रोगाचे नियंत्रण वेळेवर केल्यास झाडांचे तेज चांगले राहून पाण्याचा ताण सहन करण्यास झाडे सक्षम होतात.
८) झाडांचा आकार लहान असल्यास झाडावर किलतानाने अथवा गवताने सावली करावी. त्यामुळे झाडांचे तापमान वाढणार नाही व पानांद्वारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल.
९) फळबागेभोवती ६ ते ७ फूट उंचीचे बांबूच्या अथवा उसाचे पाचट अथवा गव्हाच्या काडापासून तयार केलेल्या चट्या बांधून वारा प्रतिरोधक कुंपण तयार करावे. त्यामुळे बागेतील वाऱ्याची गती कमी होऊन २० ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते.
१०) जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी आच्छादनापूर्वी खोडाभोवती चांगले कुजलेले सेंद्रिय खत मातीत मिसळावे.
११) झाडावरील वाळलेल्या फांद्या करवतीने कापून टाकाव्यात व त्या ठिकाणी १० टक्के तीव्रतेची बोर्डोपेस्ट लावावी. फळझाडांच्या खोडावर ३ ते ४ फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. त्यामुळे खोडावरून सूर्यप्रकाशचे परावर्तन होऊन खोडाचे तापमान वाढणार नाही, तसेच संभाव्य रोगांचा बंदोबस्त होईल.
१२) पानगळ होणाऱ्या झाडांची उदा. आवळा, सीताफळ, बोर, डाळिंब, पेरू, चिंच, शेवगा, कौठ, अंजीर इत्यादी झाडांची सर्व पाने पाण्याअभावी गळून गेली तरी झाडांना धोका पोचत नाही. तसेच सदाहरीत फळझाडांपैकी लिंबू, आंबा, चिकू, मोसंबी, संत्री इत्यादी झाडांची ३० टक्के पानगळ झाली तरी झाडांची मर होत नाही. झाडांची पानगळ मोठ्या प्रमाणात झाली तरी घाबरून न जाता वरीलपैकी शक्य त्या उपाययोजना करून झाडे जगविण्याचा प्रयत्न करावा.

जनावरांचे संगोपन ः
- जनावरांना दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ व ताजे पाणी पाजावे.
- जनावरांना दुपारच्या वेळी हवेशीर गोठ्यात अथवा झाडांच्या दाट सावलीखाली बांधावे.
- उघड्यावर बांधलेल्या जनावरांच्या विशेषतः म्हशींच्या पाठीवर ओले गोणपाट टाकावे.
- गोठ्याचे पत्रे टीनचे असतील, तर त्यावर गवत/ उसाचे पाचट टाकावे.
- जनावरांच्या आहारात हिरवा चारा द्यावा. (लसूणघास, बरसीम, हिरवी मका.)
- दुधाचे प्रमाण टिकून राहण्यासाठी त्यांना आहारात क्षार मिश्रण व मिठाचा समावेश करावा. कारण उष्णतेमुळे पोटॅशियमसारखे क्षार जनावरांच्या घामाद्वारे बाहेर पडतात, तर सोडियमसारखे क्षार मूत्राद्वारे जास्त प्रमाणात बाहेर पडतात.
- रात्रीच्या व पहाटेच्या वेळी जास्त आहार द्यावा. जर दिवसा कोरडा चारा दिला तर बाहेरील अति उष्णतेमुळे शरीरात निर्माण होणारी उष्णता मुबलक प्रमाणात बाहेर पडत नाही. त्यामुळे विशेषतः संकरित जनावरे धापा टाकतात. त्यामुळे त्यांची भूक मंदावते. परिणामतः दूध उत्पादनात घट दिसून येते.
- उन्हाळ्यामध्ये विशेषतः म्हशींना जास्त त्रास होतो. त्यांच्या काळ्या रंगामुळे शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे माजावर येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य प्रमाणातील संप्रेरकांच्या अभावामुळे म्हशी माजावर येत नाहीत. त्यासाठी उन्हाळ्यात म्हशींना सावलीत बांधावे. त्यांच्या अंगावर पाणी शिंपडावे. तसेच सकाळी ९ पूर्वी किंवा दुपारी ४ नंतर म्हशींना पोहण्यास सोडावे. उत्कृष्ट प्रतीचा वळू म्हशींच्या कळपात सोडावा. अशा प्रकारे उन्हाळ्यात म्हशींची काळजी घेतल्यास नियमित गाभण राहण्याचे प्रमाण वाढते.

No comments:

Post a Comment