Friday 20 May 2016

महाऔषधि धने

महाअाैषधी कोथिंबीर, धने

‘कोथिंबीर’ सर्व गृहिणींना सुपरिचित अाहे. भाजी आणताना कोथिंबिरीची जुडी आणायला आपण कधी विसरत नाही. पण कोथिंबिरीचा उपयोग बऱ्याचदा फक्त सजावटीसाठी केला जातो. पदार्थ उत्तम दिसावा किंवा चविष्ट व्हावा याव्यतिरिक्त कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठीही उत्तम कार्य करते ही गोष्ट सर्व गृहिणींना माहीत असायला हवी.
डोळ्याच्या आरोग्यासाठी कोथिंबीर चांगले कार्य करते. डोळे दुखणे, आग होणे या तक्रारी उन्हाळ्यात आढळून येतात. त्यासाठी कोथिंबिरीचा रस पोटात घ्यावा. बिब्बा उतला असेल तर त्वचेवर कोथिंबिरीचा रस लावावा. कोथिंबीर पित्त, उष्णता कमी करणारी असल्याने चटणी, पराठे या स्वरूपात वापर जरूर करावा. जास्त तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत म्हणून कोथिंबिरीची वडी थोड्या तेलात परतून घेऊन खावी. ती पौष्टिक म्हणूनच काम करते. स्वयंपाकामध्ये कोथिंबीर फोडणीत कधी न घालता पदार्थ तयार झाल्यावर किंवा शिजताना घालावी.
कोथिंबिरीप्रमाणेच ‘धने’ आपल्याला परिचित आहेतच. स्वयंपाकात रुची आणण्यासाठी धने वापरले जातात. तेदेखील आरोग्यासाठी उत्तम कार्य करतात.
खूप उन्हात काम केल्याने तहान जास्त लागते किंवा उष्ण प्रकृती असेल तर घशाला कोरड पडण्याची तक्रार असते. अशावेळी धने पाण्यात भिजत घालून ते कुस्करून त्या पाण्यात खडीसाखर घालून पाणी प्यावे. बऱ्याचदा उन्हाळी लागते म्हणजे लघवीला आग होते, अशावेळी धने पाण्यात उकळून ते पाणी गार झाल्यावर दिवसभर थोडे थोडे प्यावे.
मुळव्याधीतून रक्त पडत असल्यास धने रात्रभर भिजत घालावेत आणि सकाळी गाळून ते पाणी प्यावे. इतर औषधाच्या जोडीला हा उपाय केल्यास निश्चित फायदा होतो. अजीर्ण, उलटी, तोंडाला चव नसणे या सर्व पचनाशी संबंधित तक्रारींसाठी धने, जिरे वाटून लिंबाच्या रसातून घेतल्यास फायदा होतो.
अपचन, पोटात दुखणे व बारीक ताप येत असेल तर धने आणि बडीशेप दाेन ग्लास पाण्यात घालून उकळावे. आणि हे पाणी थोड्या थोड्या प्रमाणात गरम स्वरूपात प्यावे. पोटातील कृमींसाठीदेखील धने उत्कृष्ट कार्य करतात. धने विडंग (वावडिंग) यांची पावडर मधाबरोबर घेतल्यास फायदा होतो. हवा बदलानंतर बऱ्याचदा खोकला होतो. कफ झाला तरी काहीवेळा चिकटपणामुळे तो बाहेर पडण्यास त्रास होतो, अशावेळी धने घालून केलेला काढा साखर घालून पिण्यास द्यावा.
उन्हाळ्यात अतितहान, जळजळ होत असल्यास धने, काळ्या मनुका, नागरमोथा, वाळा यांची भरड पावडर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे पाणी प्यावे. चांगला फायदा होतो. युरिन इन्फेक्शन (मूत्रसंसर्ग) या प्रकारात लघवीला फार त्रास होतो. अशावेळी इतर औषधे चालू ठेवावीत आणि जोडीला धने आणि गोखरू यांचा काढा जरूर घ्यावा. मात्र पोटात जंतुनाशक औषधे घ्यावी लागतातच. उलट्या होत असतील तरी धने पावडर आणि खडीसाखर पाण्यासह घ्यावी. पित्ताचा त्रास वारंवार होत असल्यास काही दिवस नियमित औषधे पोटात घेणे फार आवश्यक असते. त्याच्या जोडीला धने-जिरे यांचा काढा घेतल्यास फायदा होतो.
अशा प्रकारे मूत्रविकार, अजीर्ण, डोळ्यांचे आरोग्य या सर्वांसाठीच धने उत्तम कार्य करतात.
काही गोष्टी अगदी रोजच्या वापरातील असतात. कायम घरात असतात. पण त्यांचा उपयोग कसा करावा हे ठाऊक नसते. गृहिणींना अथवा नोकरदार स्त्रियांना स्वयंपाकघर सांभाळताना आपण बनविलेले अन्न आरोग्यदायी कसे ठरेल हा विचार करावा लागतो. अन्नपदार्थ औषध म्हणून कसे कार्य करतात हेदेखील माहीत झाले तर प्रत्येक ‘स्त्री’ अधिक जागरूक राहून कुटुंबाला जपण्याचा प्रयत्न नक्की करेल, हा विश्वास आहे.

No comments:

Post a Comment