Saturday 30 April 2016

शेती सल्ला

आजचा शेती सल्ला: ठिबक सिंचन संचाची देखभाल

* ज्या पाण्यात लोहाचे प्रमाण तीन ते चार पीपीएम एवढे असते, असे पाणी ठिबक संचातून वापरल्यास तोट्या किंवा सूक्ष्म नलिका बंद पडण्याचा धोका असतो, त्यासाठी असे पाणी शक्‍यतो ठिबक संचातून वापरू नये.
* तोट्या सूक्ष्म नलिका, तसेच गाळण टाक्‍या, मातीचे किंवा वाळूचे कण, काडीकचरा इ. अडकून बंद पडतात यासाठी वाळूच्या गाळण टाकीत साचलेली घाण पाणी उलट दिशेने वळवून बाहेर काढून टाकावी. धातूच्या गाळण टाकीत असलेल्या स्टेनलेस स्टील व प्लॅस्टिकच्या चाळण्या बाहेर काढून ब्रशच्या साह्याने स्वच्छ कराव्यात. मुख्य पंपसेट, दाबमापक यंत्रे, खत देण्याची यंत्रणा व गाळण यंत्रणा नियमित तपासाव्यात.
* दररोज संच सुरू करण्यापूर्वी वाळूची यंत्रणा, पाण्याची दिशा उलटमार्गे वळवून साफ करावी व धातूच्या गाळण्या किमान आठवड्यातून एकदा ब्रशच्या साह्याने साफ कराव्यात. आठवड्यातून एकदा मुख्य व उपमुख्य नळीच्या शेवटच्या टोकाची थ्रेड कॅप काढून नेहमीपेक्षा सव्वा ते दीडपट जास्त दाबाने पाणी संचात सोडून साफ कराव्यात. याच पद्धतीने उपनळ्यांची शेवटची तोंडे उघडून त्या साफ कराव्यात. 
* पाण्यातील वेगवेगळ्या क्षारांची एकमेकांशी रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यापासून पांढऱ्या, तांबड्या अथवा काळ्या रंगाचे थर ठिबक संचाच्या विविध भागांत तयार होतात, त्यामुळे तोट्या बंद पडतात. रासायनिक प्रक्रियेमुळे ठिबक संच बंद पडल्यास आम्लप्रक्रिया करावी. साधारणपणे सहा महिन्यांच्या अंतराने उपनळ्यांवरील बंद पडलेल्या तोट्या एक टक्के आम्लाच्या पाण्याने साफ कराव्यात.
* जैविक कारणांनी ठिबक संच बंद पडल्यास क्‍लोरिन प्रक्रिया करावी. ही प्रक्रिया साधारणपणे सहा महिन्यांच्या अंतराने करावी. आम्ल/क्‍लोरिन प्रक्रियेनंतर संपूर्ण संच पाण्याने स्वच्छ करणे आवश्‍यक असते, दुसऱ्या हंगामासाठी संच उपयोगात आण?यापूर्वीही आम्ल/क्‍लोरिन प्रक्रिया करावी.
* आम्लयुक्त पाणी व्हेंचुरीच्या साह्याने संचातून १५-२० मिनिटे सोडावे. त्यानंतर संच २४ तास बंद ठेवावा. दुसऱ्या दिवशी संच पाण्याने स्वच्छ करावा. तोट्या पूर्णपणे बंद झालेल्या असल्यास अशा तोट्या एक टक्का आम्लयुक्त पाण्यात (दहा मि.लि. हायड्रोक्‍लोरिक आम्ल प्रति लिटर पाण्यात) १५ ते २० मिनिटे बुडवून परत चांगल्या पाण्याने साफ कराव्यात. जैविक पद्धतींच्या उपायात ब्लिचिंग पावडरचा उपयोग करावा. हजार लिटर पाण्यात ३५ टक्के क्‍लोरिनचे प्रमाण असलेली ब्लिचिंग पावडर ४५ ग्रॅम मिसळावी. संचात हे पाणी २० मिनिटे सोडावे व त्यानंतर संच २४ तास बंद ठेवावा, दुसऱ्या दिवशी संच पाण्याने साफ करावा.

No comments:

Post a Comment