Friday 2 March 2018

जमिनीत टिकवा ओलावा

🌿 *जमिनीत टिकवा ओलावा...* 🌿

अोलावा टिकून राहण्यासाठी जमिनीत पाणी मुरवण्याचे प्रमाण वाढवणे व बाष्पीभवन कमी करणे महत्त्वाचे असते. जमिनीची बांधबंदिस्ती, पिकांची निवड, माती परीक्षण, आच्छादन अशा विविध उपाययोजना करून जमिनीतील अोलावा टिकवून ठेवता येतो.

पावसाद्वारे मिळणारे सर्वच पाणी शेतीला उपयुक्त होते असे नाही. जमिनीच्या उताराचे प्रमाण व पृष्ठभागाच्या रचनेनुसार पावसाचे पाणी कमीअधिक वाहून जाते. एकूण पडणाऱ्या पावसाच्या फक्त ६५-७५ टक्के पाऊस पिकाच्या वाढीच्या दृष्टीने उपयुक्त असतो. वाहून जाणारे पाणी शेतात खोलगट भागात बांध घालून रोखता येईल. त्यासाठी नैसर्गिकरीत्या खोलगट भागाची निवड करावी. बांधाची लांबी आणि उंची कमी करून खड्ड्यात पाणी साठवण्याची क्षमता वाढवावी. अशी तळी बांधण्यास योग्य जागा नसल्यास, खोदीव तळी तयार करणे फायद्याचे ठरते. त्यासाठी बांधाच्या सांडव्याच्या खाली किंवा नाल्याच्या कडेला मोठे खड्डे काढून, वाहून जाणारे पाणी साठवावे. हे पाणी ज्या वेळी पिकास पाण्याची गरज आहे त्या वेळी वापरता येते.

*१) जमिनीची बांधबंदिस्ती -*
जमिनीच्या पृष्ठभागावरील १५ सेंमी जाडीचा थरामध्ये पिकास आवश्‍यक अशी अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. जोराचा पाऊस पडला की पाण्याबरोबर बरीचशी माती वाहून जाते. म्हणून पावसाने होणारी जमिनीची धूप थांबवण्यासाठी बांध बंदिस्ती करणे आवश्‍यक असते. मध्यम खोल व उथळ जमिनीसाठी समपातळीत बांध घालावेत तसेच भारी व काळ्या जमिनीत मृद संधारणाबरोबरच आवश्‍यकतेपेक्षा जास्त असलेल्या पाण्याचा निचरा करावा.

*२) पेरणी व मशागत -*
जमिनीत पाणी मुरण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करून घेणे आवश्‍यक असते. नांगरट उतारास आडवी केल्यास त्यापासून अपेक्षित लाभ होतो. नांगरटीनंतर पिकाची पेरणी करण्यासाठी कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. त्यामुळे तणाचे प्रमाण कमी राहाते तसेच कुळवल्यामुळे जमिनीतून वाफेच्या रूपाने जाणारे पाणी कमी होते. 
सर्वसाधारणपणे ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. परिणामी जमिनीची धूपही वाढते. म्हणूनच या काळात संपूर्ण जमीन झाकून टाकणारी पिके जास्त उपयुक्त ठरतात. त्या दृष्टीने भुईमूग, बाजरी, मटकी, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांची निवड करावी. त्याशिवाय पिकांच्या वाढीस लागणारा काळही लक्षात घ्यावा. अल्प मुदतीच्या पिकांची वाढ झपाट्याने होते व त्यांना पाणीही कमी लागते, म्हणून अशी अल्प मुदतीची पिके निवडावीत.
कोरडवाहू जमिनीत लवकर पेरणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणीनंतर पिकात अधूनमधून कोळपणी करावी त्यामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. कोळपणीमुळे जमिनीत पडलेल्या भेगा मोडल्यामुळे हवेत निघून जाणाऱ्या वाफरुपी पाण्याचे प्रमाण घटते. कोळपणी केल्याने पिकाच्या वरच्या मुळ्या तुटतात व खालच्या मुळांना जोर येऊन त्या खाली असलेल्या ओलीकडे धाव घेतात.

*३) माती परीक्षण -*
पिकांची निवड करण्यापूर्वी माती परीक्षण करावे. माती परिक्षणावरून जमिनीचा प्रकार, कस व जमिनीतील पोषक द्रव्यांचे प्रमाण समजते. जमिनीतील चुनखडीचे प्रमाण, निचऱ्याची क्षमता, आम्ल-विम्ल निर्देशांक, सेंद्रिय कर्ब व उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती मिळते.
माती परीक्षणावरून कोणत्या जमिनीत कोणती पिके योग्य आहेत हे कळते. तसेच या माहितीआधारे मृद संधारणाच्या कामाची दिशा ठरवता येते. पीक लागवडीस अयोग्य जमिनी सुधारता येतात.

*४) सेंद्रिय खताचा वापर -*
सेंद्रिय खताच्या वापराने मुख्यतः जमिनीची घडण सुधारण्यास मदत होते. जमिनीची घडण चांगली असेल तर त्यात पाणी भरपूर जिरते व पिकांना मिळते. खोल जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होतो.
सर्वसाधारणपणे कोरडवाहू जमिनीत कमीत - कमी तीन वर्षांतून एकदा दर हेक्टरी (१०-१२) गाड्या शेणखत द्यावे. म्हणजे जमिनीत पाणी मुरण्याची आणि ओल टिकवून धरण्याची क्षमता वाढते.

*५) आच्छादनाचा वापर -*
आच्छादनापासून पिकाच्या वाढीसाठी जमिनीत ओलावा उपलब्ध होतो. त्यामुळे रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते. तणाचा प्रादुर्भाव कमी होतो.
आच्छादनासाठी शेतीतील निरुपयोगी सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ वापरता येतात. यामध्ये प्रामुख्याने ज्वारीचे सड, तुराट्या, वाळलेले गवत. पऱ्हाट्या, गव्हाचे काड, साळीचा पेंढा, उसाचे पाचट, लाकडाचा भुसा, झाडाची वाळलेली पाने, काडीकचरा इत्यादी हेक्टरी ५-१० टन पसरावे.
शेतातील दगड-गोटेही नैसर्गिक आच्छादन म्हणून फायदेशीर   ठरतात.

No comments:

Post a Comment