Sunday, 28 May 2017

Study

1. ‘बराक-८’ हे क्षेपणास्त्र भारताने कोणत्या देशासोबत विकसि‍त केले आहे?
(1)  रशिया (2)  जपान
(3)  इस्रायल (4)  अमेरिका
Explanation:
   इस्रायलने भारतासोबत मिळून विकसित केलेल्या ‘बराक-८’ या क्षेत्रणास्‍त्राची इस्रायली नौदलाच्या जहाजावरून प्रथमच यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्‍त्राची पुढील चाचणी भारतीय नौदलाच्या जहाजावरून घेण्यात येणार आहे. भारताच्या आयएनएस कोलकाता या जहाजावर प्रक्षेपक तसेच क्षेपणास्‍त्रांचा वेध घेणारी रडार यंत्रणा बसवलेली आहे. त्यामुळे बराक-८ ची चाचणी या जहाजावरून करण्यात येणार आहे. बराक-८ हे क्षेपणास्‍त्र भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, इस्रायलच्या एरोस्पेस इंडस्ट्रीज, इस्रायलचे शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान विकास व्यवस्थापन संस्था ‘एल्टा सिस्टीम’ आणि इतर कंपन्यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.
इस्रायलच्‍या समुद्रातील तेलसाठ्यांचे संरक्षण करण्यासाठी बराक-८ जर्मनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्‍त्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे इस्रायलच्या हवाई संरक्षणाचा विस्तार होण्यात मदत होणार आहे.
पुढील दोन वर्षांत बराक-८ ही क्षेपणास्‍त्र यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. ज्याचा फायदा नौदलाच्या जहाजांना संरक्षण मिळण्यासाठी होईल.
‘बराक-८’ -
१) ‘बराक-८’ हे बराक या क्षेपणास्‍त्राची सुधारित आवृत्ती आहे.
२) बराक क्षेपणास्‍त्रे सध्या भारत आणि इस्रायल वापरत आहेत.
३) लढाऊ जहाजे, हेलिकॉप्टर, ड्रोन यांचा सामना करण्‍याची क्षमता या क्षेपणास्‍त्रामध्ये आहे.
४) बराक-८ मध्‍ये अत्याधुनिक रडार, टू-वे डाटा लिंक आहेत.

2. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणार्‍या निसर्गातील घटकांचा समुच्चय म्हणजे ........... होय. 
(1)  पर्यावरण (2)  वातावरण
(3)  जीवावरण (4)  परिस्थितीकी
Explanation:
   सजीवांच्या जीवनावर, सभोवतालच्या परिस्थितीतील उपलब्ध असलेल्या, सर्व घटकांचा परिणाम होत असतो. यालाच पर्यावरण असे म्हणतात. निसर्गातील जीवसृष्टीवर दोन घटकांचा परिणाम होत असतो.
१) जैविक घटक यामध्ये जीवजंतू, वनस्पती, सृष्टी यांचा समावेश होतो.
२) अजैविक घटक यामध्ये वातावरण, हवा, पाणी, भूमी इत्यादी घटकांचा समावेश होतो. निसर्ग सृष्टीमधील जैविक व अजैविक घटकांमधील अन्योन्य आंतरिक संबंधाला ‘पर्यावरण’ असे म्हणतात.
.
3. अ – सिंधू संस्कृतीचा कार्यकाळ इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. १७०० असा आहे. ब – दयाराम साहनी यांनी १९२१ मध्‍ये या संस्कृतीतील ‘हडप्पा’ शहराचा शोध लावला. क – सिंधू संस्कृतीत सर्व शहरांना तटबंदी असायची. वरीलपैकी अचूक विधान निवडा. 
(1)  फक्त अ बरोबर (2)  फक्त ब बरोबर
(3)  फक्त अ व ब बरोबर (4)  अ, ब, क सर्व बरोबर 
Explanation:
   सुमारे ५००० वर्षांपूर्वी जगातील प्रमुख चार नद्यांच्या काठी मानवी संस्कृती निर्माण झाल्या. यामध्‍ये तेग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या काठी मेसोपोटेमिया संस्कृती, नाईल नदीकाठी इजिप्तची संस्कृती, सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृती आणि हो-हँग हो नदीच्‍या काठी चिनी संस्कृतीचा उदय झाला.
  सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख चार्ल्स मेसन यांनी १८२६ मध्ये केला; परंतु सिंधू संस्कृतीची खरी ओळख १९२०-२१ साली लाहोर–मुलतान रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा, मुद्रा व इतर पुरातत्त्वीय अवशेषांमुळेच झाली. जॉन मार्शल, राखालदास बॅनर्जी, दयाराम सहानी, माधव स्वरूप वत्स इ. पुरातत्त्व विद्वानांच्या परिश्रमपूर्वक उत्खननामुळे एका अतिप्राचीन संस्कतीतील ‘हडप्पा’ शहराचा उत्खननातून शोध लागला. ‘हडप्पा’ हे शहर सिंधू संस्कृतीमधील सर्वप्रथम उत्खननीय स्थळ असल्याने व सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खननीय शहरातील सर्वच लक्षणे या शहरात आढळत असल्याने सिंधू संस्कृतीलाच ‘हडप्पा संस्कृती’ असेही म्‍हणतात.
   सिंधू नदीच्‍या खोर्‍यात नवीन संस्कृतीचा शोध लागल्याची घोषणा १९२४ मध्ये सर लॉन मार्शल यांनी केली. या संस्‍कृतीला भारतीय संस्कृतीची गंगोत्री मानली जाते. १९९० च्या दशकात हॉर्वर्ड विद्यापीठातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड मेडो यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने हडप्पा (हराप्पा) परिसरात उत्खनन केले. त्यात सिंधू संस्कृतीतील काही अवशेष तसेच त्यापूर्वीचे काही अवशेष सापडले. सुमारे ५००० वर्षांपूर्वी बनवलेल्या भांड्यांचा त्यात समावेश आहे. या भांड्यावर जी चि‍त्रलिपी कोरली आहे, ती सिंधू संस्‍कृतीच्‍या अवशेषात आढळून आलेल्‍या लिपीशी साधर्म्‍य राखणारी आहे. त्रिशुल, झाडे यांचा या लिपीत प्रामुख्‍याने समावेश आहे. सिंधू संस्‍कृतीच्‍या पूर्व काळातील ही लिपी असल्‍याचा दावा डॉ. मेडो यांनी केला. तेथे त्‍यांना अनेक प्राण्‍यांचे शिक्‍के सापडले. व्यापारासाठी दगडी वजनेमापेही त्यांनी बनवली होती. देशाच्या विविध भागांशी व इराण अफगाणिस्तान यांच्याशीही त्यांचे व्यापारी संबंध होते.
  स्थान व विस्तार – पूर्वेस आलमगीरपूर, पश्चिमेस सुत्केगेंडोर, दक्षिणेस महाराष्ट्रातील दायमबाद व उत्तरेस जम्मूमधील मांडा अशा याच्या सीमा आहेत. पूर्व पश्चिम १६०० किमी व दक्षिण उत्तर ११०० किमी याची लांबी, रुंदी असून एकूण १२,९९,६०० चौ. किमी भारताचा भाग याने व्यापला आहे. पंजाब, राजस्थान, गुजरात, बलुचिस्तान, हरियाणा व महाराष्ट्र इत्यादी प्रदेशात या संस्कृतीचा विस्तार झाला आहे.
सिंधू संस्‍कृतीची वैशिष्‍ट्ये – हडप्पा, मोहनजोदडो, रंगपूर, सुरकोटडा, कालीबंगन, रोपड, दायमाबाद, मेहरगड, चहूदंडो, ढोलवीरा अशा ४०० हून अधिक ठिकाणच्या उत्खननीत अवशेषांवरून सिंधू संस्कृतीची पुढील काही वैशिष्‍ट्ये दि‍सून येतात.
१) सिंधू संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती आहे.
२) ही एक नागरी व व्यापारप्रधान संस्कृती आहे.
३) सिंधू संस्कृतीमध्ये सामाजिक व धार्मिक वैमनस्यांचा अभाव दि‍सून येतो.
४) अन्य संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचे व्यापारिक संबंध असल्याचे उत्खननीत पुराव्‍यांवरून समजते.
५) सिंधू संस्कृतीमधील लोकांना लिपीचे ज्ञान होते.
६) ही एक शांतताप्रिय संस्कृती होती.
७) सिंधू संस्कृतीमध्ये मं‍दि‍रांचा अभाव दि‍‍सून येतो.
८) वजनमापात समानता दि‍सून येते.
९) सिंधू संस्कृतीच्या नगर नियोजनास महत्त्व होते.
.4. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ मध्ये कुठे झाला?
(1)  ठेंभू (2)  निफाड
(3)  कागल (4)  पुणे
Explanation:
  महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ला नाशिक मधील निफाड तालुक्यात झाला. त्‍यांचे विद्यार्थी जीवन सुरुवातीला कोल्‍हापूर येथे आणि नंतर मुंबई येथे गेले. १८६४ मध्‍ये मुंबईच्‍या ‘एलफिस्‍टन’ कॉलेजातून ते एम.ए. झाले. एम.जी.रानडे यांच्‍या मातोश्रीचे नाव गोपिकाबाई असे होते. १८६५ साली त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी अक्‍क्‍लकोट राज्याचे कारभारी म्हणून काम पाहिले. इ.स. १८६८ मध्ये त्यांची एलफिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास या विषयाचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. नोव्हेंबर १८७१ मध्ये त्यांची पुणे येथील न्यायपालिकेत सबऑडमिनेट न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. जाने. १८७८ ला न्या. रानडे यांची नाशिक येथे ‘सदर अमीन’ म्हणून नेमणूक झाली. मे १८७९ मध्ये पुण्यातील विश्रामबाग वाडा व बुधवार वाड्याला आगी लागल्या. न्या. रानड्यांचा या कटाशी संबंध असावा अशी सरकारला शंका आली, परिणामी न्या. रानडे यांची धुळ्यास बदली करण्यात आली. इ.स. १८८० मध्ये न्या. रानडे यांची पुण्यास पुन्हा बदली करण्यात आली. इ.स. १८९३ ला त्यांची मुंबई हायकोर्टात ‘हायकोर्ट जज’ म्‍हणून नियुक्ती करण्‍यात आली, पुढे १९०१ पर्यंत त्‍यांनी हायकोर्ट जज म्‍हणून काम पाहिले. इ.स. १८६२ मध्‍ये मुंबईत रानड्यांनी आपले मित्र विष्‍णू परशुराम पंडि‍त यांना ‘इंदुप्रकाश’ वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीतून त्‍यांनी समाज सुधारणेविषयी लिहिले (या वृत्तपत्राच्‍या मराठी विभागाचे संपादकत्‍व विष्‍णुशास्‍त्री पंडित यांचेकडे होते.) १५ जून १८६९ ला वेणुबाई परांजपे यांचा पांडुरंग करमरकरांसोबत विधवा विवाह घडवून आणण्यात पंडित लोकहितवादी यांना रानडे यांनी मदत केली. गणेश वासुदेव जोशींच्या समाजविषयक व अर्थविषयक विचारांचा रानडेंवर प्रभाव होता. डिसें. १८७३ मध्‍ये पहिल्या पत्नी वारल्यानंतर पुण्यात ‘सेवासदन’ या संस्थेच्या संस्थापिका रमाबाई रानडे (मूळचे नाव यमुना चिपळूणकर) शी पुनर्विवाह. यावेळी वधू वरांचे वय अनुक्रमे ११ आणि ३२ वर्षे होते. रानडेंचा पहिला विवाह वाई येथील सखूबाई दांडेकर हिच्याशी झाला होता. रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होत. (मराठी विषय घेऊन वामन आबूजी मोडक पहिले पदवीधर. भांडारकर, रानडे वागळे हे इतर विषयांचे पहिले पदवीधर होत.) त्यामुळे ‘पदवीधरांचे मुकुटमणी’ हा किताब रानडेंना दिला आहे. न्या. रानडे यांनी १८५८ च्या राणी जाहीरनाम्याला ‘हिन्‍दी प्रजेचा मॅग्राचार्टा’ असे म्‍हटले होते. १८७९चे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना पाठिंबा दिल्‍याचा तसेच पुण्‍यात लागलेल्या आगीच्या संशयावरून न्या. रानडेंची बदली धुळ्यास करण्‍यात आली होती. इ.स. १८६५ मध्ये विष्णुशास्‍त्री पंडित व इतर सहकार्‍यांच्या साहाय्याने ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळाची’ स्थापना मुंबई येथे केली. इ.स. १८६०मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे न्या. रानडे हे प्रमुख आधारस्तंभ होते. प्रार्थना समाजाची तत्त्वे, उपासना पद्धती आणि विधी यांच्यासाठी त्यांनी ‘एकेश्वरनिष्ठांची कैफि‍यत’ या नावाचा निबंध लिहिला. (म. फुले यांनी ‘अस्पृश्यांची कैफि‍यत’ हा ग्रंथ लिहिला होता.)
.
5. शिक्षणाच्या मूलभूत हक्कांबाबत योग्य विधाने ओळखा. अ – संसदेने ४ ऑगस्ट २००९ रोजी शिक्षणाचा हक्क पारित केला ब – राज्यघटनेतील कलम २१ (अ) मध्‍ये बदल करून ६ ते १४ वर्षापर्यंत मुलांना मोफत व सक्‍तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. क – या हक्कांची अंमलबजावणी १५ ऑगस्ट २००९ पासून सुरू झाली. ड – ह्या कायद्याची जम्मू-काश्‍मीर राज्यात अंमलबजावणी केली गेली नाही.
(1)  अ, ब व क (2)  अ, ब व ड
(3)  ब, क व ड (4)  सर्व बरोबर 
Explanation:
   भारतीय राज्यघटनेतील कलम २१ (अ) मध्ये देशातील ६ ते १४ वर्षें वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात यावे अशी तरतूद करण्यात आली आहे.
   संसदेने ४ ऑगस्‍ट २००९ मध्ये शिक्षणाचा हक्क पारित केला. त्यामुळे शिक्षणाचा हक्क देणार्‍या १३५ देशांमध्ये भारताचाही समावेश झाला. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१० पासून करण्यात आली.
   जम्मू-काश्‍मीर या राज्याला सोडून संपूर्ण भारतामध्‍ये शिक्षण हक्‍क कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्‍यात आली. या कायद्यानुसार एखाद्या विद्यार्थ्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले नाही, तर १४व्‍या वर्षापुढेही प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यासाठी मोफत शिक्षण मिळू शकेल अशी तरतूद केली आहे. तसेच प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्‍याही बालकाला मागील वर्षात ठेवले जाणार नाही, शाळेतून काढले जाणार नाही. किंवा प्रवेश नाकारला जाणार नाही अशा तरतुदी शिक्षण हक्‍क कायद्यानुसार करण्यात आल्या आहेत.
.
6. अ - संयुक्त राष्ट्रसंघाची (UNO) स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ मध्ये न्यूयार्क येथे झाली. ब – भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. क – आंतरराष्ट्रीय न्यायालय हे UNO चा एक भाग आहे. ड – वंश, लिंग, भाषा व धर्म यावरून मानवा-मानवामध्‍ये भेदभाव न करता सर्वांना स्वातंत्र्य व मानवी हक्क मिळवून देणे हे UNO चे कर्तव्य आहे. वरीलपैकी अचूक विधान निवडा. 
(1)  फक्त अ व ब बरोबर (2)  फक्त क व ड बरोबर
(3)  फक्त अ व क बरोबर (4)  अ, ब, क, ड सर्व बरोबर
Explanation:
  पहिल्‍या महायुद्धानंतर स्‍थापन झालेली ‘राष्‍ट्रसंघ’ ही पहिली आंतरराष्‍ट्रीय संघटना जागतिक शांतता आणि सुरक्षितता स्‍थापन करण्‍यात अयशस्‍वी झाली. सन १९३९ मध्‍ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. दोन्‍ही महायुद्धात मोठ्या प्रमाणात मानव व वित्तहानी झाली. त्‍यानंतर झालेल्‍या ‘वैचारिक मंथनातून’ ‘संयुक्‍त राष्‍ट्र संघटनेचा’ उदय झाला. २६ जून १९४५ रोजी सॅन-फ्रॅन्सिस्‍को येथे५१ देशांच्‍या प्रतिनिधींनी संयुक्‍त राष्ट्रांच्या सनदेवर सह्या केल्या. २५ एप्रिल १९४५ ते २६ जून १९४५च्या दरम्यान संयुक्‍त राष्ट्रांच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या परिषदा झाल्या. सॅन-फ्रॉन्सिस्को ये‍थे संयुक्त राष्ट्राची घटना लिहिण्यात आली तिलाच सनद (चार्टर) असे म्हणतात.
संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचे हेतू -
१. आंतरराष्‍ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्‍थापित करण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहील. शांततेला धोका पोहचवणार्‍या गोष्टींपासून बचाव किंवा त्‍या दूर करण्यासाठी उपाय योजेल.
२. आंतरराष्‍ट्रीय कायदा व न्याय तत्त्वांशी जुळवून घेऊन आंतरराष्‍ट्रीय वाद सोडवण्‍यास प्रयत्‍न केले जातील.
३. जगातील सर्व राष्‍ट्रांमधील सामाजिक, आर्थिक, सांस्‍कृतिक व इतर अनेक प्रश्‍न की जे मानवी जीवनाशी निगडि‍त आहेत. ते सोडवण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्र प्रयत्‍नशील राहील.
४. वंश, लिंग, भाषा व धर्म यावरून मानवा-मानवामध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना स्वातंत्र्य आणि मानवी हक्क मिळवून देण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्र प्रयत्‍नशील राहील.
५. सर्वसामान्‍य जनतेच्‍या जीवनामध्‍ये मिलाप घडवून आणण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्र कार्य करेल.
६. सामूहिक हितासाठी लष्‍करी बळाचा वापर संयुक्‍त राष्‍ट्र करेल.
७. राष्‍ट्रांचे प्रादेशिक अखंडत्‍व राखण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्रे बळाचा वापर टाळतील.
संयुक्‍त राष्‍ट्रसंघाची रचना -
संयुक्‍त राष्‍ट्रांचे उद्दिष्‍ट्ये आणि ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी सनदेमध्‍ये सहा प्रमुख स्‍तंभाचा उल्‍लेख करण्‍यात आला आहे.
१) महासभा
हे संयुक्‍त राष्‍ट्रांचे कायदेमंडळ आहे. यामध्‍ये सर्व सभासद राष्‍ट्रांचा समावेश होतो. प्रत्‍येक सभासद राष्‍ट्रास पाच प्रतिनिधी पाठवता येतात. मात्र प्रत्‍येक सभासद राष्‍ट्रास एकच मत देण्‍याचा अधिकार असतो. हे प्रतिनिधी आपल्‍या सरकारच्‍या सूचनेवरून काम करतात. महासभेचे वर्षातून एकदा अधिवेशन होते.
महासभेचे कार्ये
I. आंतरराष्‍ट्रीय समस्‍यांवर चर्चा करणे.
II. संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक मंडळ यासारख्‍या घटकांच्‍या सदस्‍यांची निवड करणे.
III. संयुक्‍त राष्‍ट्रामध्‍ये नवीन देशांना सदस्‍यत्‍व देणे.
IV. संयुक्‍त राष्‍ट्रांचा अर्थसंकल्‍प मंजूर करणे.
V. संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सरचिटणीसाची निवड करणे.
२) सुरक्षा परिषद
हे संयुक्‍त राष्‍ट्रांचे कार्यकारी मंडळ आहे. यामध्‍ये १५ सदस्‍य असून त्‍यापैकी ५ कायम सदस्‍य आहेत. ते म्‍हणजे इंग्‍लंड, अमेरिका रशिया, फ्रान्‍स, चीन, १० अस्‍थायी सदस्‍यांची निवड दोन वर्षांसाठी महासभेकडून करण्‍यात येते. सुरक्षा परिषदेवर सभासद राष्‍ट्र १ प्रतिनिधी पाठवू शकते. जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्‍थापित करण्‍यासाठी सनदेनुसार सर्व स्‍थायी (कायम) सदस्‍यांना ‘नकाराधिकार’ दिलेला आहे.
कार्ये
१) आंतरराष्‍ट्रीय सुरक्षा व शांतता प्रस्‍थापित करणे.
२) नवीन सदस्‍यत्‍व देण्‍यासाठी किंवा रद्द करण्‍यासाठी महासभेस शिफारस करणे.
३) आंतरराष्‍ट्रीय न्‍यायालयाच्‍या न्‍यायाधीशांच्‍या निवडीमध्‍ये महासभेसह सहभाग घेणे.
४) महासभेस सरचिटणीस पदाच्‍या उमेदवाराचे नाव सुचवणे.
३) आर्थिक आणि सामाजिक मंडळ
मानवी हक्‍क व स्‍वातंत्र्ये यांच्‍या पुरस्‍कारासाठी त्यांना प्रोत्‍साहन व प्रतिष्‍ठा मिळवून देण्‍यासाठी या शाखेची निर्मिती झाली. यामध्‍ये ५४ सदस्‍यांची निवड महासभेकडून तीन वर्षांसाठी करण्‍यात येते. यामधील १/३ सदस्‍य दरवर्षी बदलण्‍यात येतात. निवृत्त होणारे सदस्‍य लगेच पुन्‍हा निवडून येण्‍यास पात्र ठरतात.
४) सचिवालय
हा संयुक्‍त राष्‍ट्रांचा प्रशासकीय विभाग आहे. सरचिटणीस हा संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सचिवालयाचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो. महासभा सचिवाची नेमणूक सुरक्षा परिषदेच्‍या शिफारशीवरून पाच वर्षांसाठी करते. सचिवालयाचे कार्यालय अमेर
.
7. शासनाने देशांतर्गत घेतलेल्‍या कर्जाचा समावेश अंदाजपत्रकाच्‍या कोणत्‍या भागात होईल?
(1)  भांडवली जमा (2)  महसुली जमा
(3)  लोकलेखा जमा (4)  कर्ज जमा 
Explanation:
  विकसनशील राष्ट्रांना आपल्या विकासाच्या योजना पार पाडण्याकरिता मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज भासते. कोणत्‍याही राष्ट्रांपुढे भांडवल उभारणीचे एकूण तीन मार्ग असतात. १) कर   २) बचत आणि  ३) कर्ज. विकसनशील राष्ट्रांमधील जनतेची कारभार क्षमता व बचत कमी असल्यामुळे कर उभारणी व बचत यांवर मर्यादा येते. त्यामुळे अशा राष्ट्रांपुढे आपला विकास खर्च भागवण्याकरिता कर्ज उभारणीशिवाय कोणताही पर्याय नसतो. शासन दोन प्रकारे कर्जाची उभारणी करते. १) देशांतर्गत कर्ज    २) परकीय कर्ज.
१. देशांतर्गत कर्ज :- शासन देशातील नागरिकांकडून विकासाच्‍या योजना राबवण्याकरिता बचतपत्रे, भविष्य निर्वाह निधी, कोषागरे, विपत्र इत्यादी माध्यमातून कर्ज घेते. गरजेनुसार शासन रिझर्व्ह बँक, विमा महामंडळे यांच्याकडून सुद्धा कर्ज घेते. याला देशांतर्गत कर्ज असे म्‍हणतात.
२. परकीय कर्ज :- जेव्हा शासन विकासाच्या योजना राबवण्याकरिता आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक, अनिवासी भारतीय किंवा अन्य राष्ट्रांकडून कर्ज घेते ते परकीय कर्ज म्हणून ओळखले जाते.
.
9. आधुनिक विज्ञानाचे जनक कुणाला म्‍हणतात?
(1)  गॅलिलिओ (2)  रुदरफोर्ड
(3)  आयझॅक न्‍यूटन (4)  अॅनॉक्झिमँडर
Explanation:
   आधुनिक विज्ञानाची खरी सुरुवात गॅलिलिओनेच केली. अॅरिस्‍टॉटलच्‍या मतानुसार भिन्‍न वजनाच्‍या दोन वस्‍तू सारख्‍याच उंचीवरून खाली टाकण्‍यात आल्‍या असता, जास्‍त वजनाची वस्‍तू जमिनीवर अगोदर पडेल, हा दावा गॅलिलिओने पिसाच्‍या प्रयोगाद्वारे खोडून काढला. तसेच त्‍याने दुर्बिणीचा शोध लावून अनेक क्रांतिकारक विचार जगापुढे मांडले. परंतु धर्ममार्तंडांना त्याचे विचार मंजूर नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांचा भयंकर छळ झाला. त्‍यांनी त्‍याच्‍यावर धर्मविरोधी विधाने करण्‍याचा आरोप केला व त्‍याला पोपसमोर त्‍याच्‍या चुकांची कबुली देऊन माफी मागावी लागली. तरीही त्‍याने आपले काम चालूच ठेवले. मौल्‍यवान रत्‍नांची घनता मोजण्‍यासाठी हैड्रोस्‍टॅटिक तराजूचा शोध त्यानेच लावला. म्‍हणून गॅलिलिओला आधुनिक विज्ञानाचा जनक असे म्‍हणतात. 
.
10. अ – वैदिक संस्‍कृतीचा विकास इ.स.पू.२०० ते इ.स. ५०० मध्‍ये झाला. ब – आर्याचा पहिला राजा वैवस्‍वतमनू हा होय क – या संस्‍कृतीत जन प्रमुखास राजन (राजा) म्‍हणत होते. वरीलपैकी अयोग्‍य विधान निवडा. 
(1)  फक्त अ बरोबर (2)  फक्त ब बरोबर
(3)  फक्त क बरोबर (4)  यापैकी नाही 
Explanation:
   इ.स.पू. २००० च्‍या सुमारास आर्यांचे भारतात आगमन होऊन सप्तसिंधूच्‍या प्रदेशात त्‍यांच्‍या वसाहती स्‍थापन झाल्‍या. सिंधू संस्‍कृतीच्‍या अस्‍तानंतर इ.स.पू. २०००-५०० या कालखंडात आर्यांच्‍या वैदिक संस्‍कृतीचा विकास झाला. प्रा. मॅकडोनाल्‍ड, प्रा. ग्राईल्‍स, जर्मन शास्‍त्रज्ञ पेनका, लोकमान्‍य टिळक तसेच अविनाश चंद्रदास, डॉ. आर्यांच्‍या झा, डी. एस. त्रिवेदी, डॉ. पावगी, लक्ष्‍मीधर कल्‍ला, मॅक्‍समुल्‍लर यांनी आर्याच्‍या मूळ भूमीबद्दल विचार मांडले. सिंधू संस्‍कृतीच्‍या अस्‍तानंतर व बौद्धकाळाच्‍या २००० ते ५०० च्‍या दरम्‍यान आर्य संस्‍कृतीचा उदय झाला. आर्यांचा पहिला राजा वैवस्‍वतमनू हा होता. मनूच्‍या वंशाची दुसरी शाखा त्‍याचा पुत्र पुरुरवा व मुलगी इला हिने प्रयागच्‍या भूप्रदेशात नवीन राज्‍याची स्‍थापना केली. या वंशाला लवंश चांद्रवंश, कुरुवंश, पौरववंश ही नावे पडली, तर मनूच्‍या मोठ्या मुलाने इक्ष्‍वाकुने अयोध्‍येच्‍या परिसरात स्‍वतंत्र राज्‍य स्‍थापन केले. त्‍यास मानववंश, इक्ष्‍वाकुवंश किंवा सूर्यवंश या नावाने ओळखतात.
महाकाव्‍य -
   पुराणात वैवस्‍वतमनूच्‍या इक्ष्‍वाकू, पौरवकौरव वंशाच्‍या रूपाने दीड हजार वर्षांचा, आर्यांचा राजकीय इतिहास कथन केलेला आहे. बौद्ध काळापर्यंतच्‍या वैदिक आर्य संस्‍कृतीच्‍या राजकीय इतिहासाचे प्रमुख साधन म्‍हणून या पौराणिक वर्णनांचा उपयोग केला जातो. ॠग्‍वेदकाळात वायव्‍य भारतात सप्तसिंधूच्‍या प्रदेशात आर्यांचा राज्यविस्‍तार झालेला होता. आर्यांनी भारतात प्रवेश केला, त्‍यानंतर त्‍यांच्‍या लहान लहान टोळी राज्‍यांचा उदय झाला. त्‍यास जन व प्रमुखाला राजन असे म्‍हणत. आर्यांची ग्रामीण जीवनपद्धती होती व त्‍यातून मोठी कुटुंबे निर्माण झाली. कुटुंबास कूल व कुटुंबप्रमुखास कुलूप म्‍हणत. अनेक कुटुंबांचे मिळून ग्राम व त्‍यांच्‍या मुख्‍यास ग्रामणी म्‍हणतात. ठरावीक ग्रामांचा मिळून विश होत असे. विशच्‍या प्रमुखास विशपती म्‍हणत. अनेक विशांचा मिळून बनलेल्‍या राजकीय घटकास जन म्‍हणत. जन प्रमुखास राजन (राजा) असे म्‍हणत. ॠग्‍वेदात राजाला गोपजनास्‍य म्‍हणत. राजपद वंशपरंपरागत असले तरी त्‍यावर समिती व प्रजेचे नियंत्रण असे. प्रजा राजाला बली नावाचा कर देत असे. ॠग्‍वेदकाळात जनकल्‍याणकारी नियंत्रित राजेशाही अस्तित्‍वात होती. पुरोहित हे महत्त्वाचे पद होते. त्‍याचबरोबर सेनानी, दूत, हेर,यांचा समावेश राज्‍याची शांतता व सुव्‍यवस्‍था टिकवण्‍यासाठी केला गेला. राजाला प्रशासन कार्यात मदत करण्‍यासाठी सभा, समित्‍या होत्‍या. सभेत कुटुंबप्रमुख (कुलूप), वयोवृद्ध, ज्ञानी, अनुभवी यांचा समावेश होता. सामान्‍य प्रजाजनांतून समिती सदस्‍य निवडले जात. सभेपेक्षा समितीला अधिक अधिकार होते. राजा हा समितीचा अध्‍यक्ष होता व त्‍याच्‍यावर सभा व समितीचा वचक असे. साडेतीन हजार वर्षांपूर्वी सभा व समितीच्‍या रूपाने लोकशाहीचा प्रयोग प्रचलित होता. राजा हा सर्वोच्‍च न्‍यायाधीश असून त्‍याला पुरोहित, सभा, समिती न्‍यायदानात मदत करत. ॠग्‍वेदकालीन आर्य संस्‍कृतीत संयुक्‍त कुटुंबपद्धती अस्तित्‍वात होती. समाजात स्त्रियांना मानाचे स्‍थान होते. आहारात तांदूळ, गहू, बार्ली, तीळ, सातू, गुळाचा समावेश. पशू व धान्‍याच्‍या रूपाने व्‍यापार व अर्थव्‍यवहार चालत असे. आर्यांच्‍या बहुसंख्‍य देवता निसर्गदेवता होत्‍या-वरुण, इंद्र, सूर्य, अग्नी व इतर देवतांचा समावेश होता. ॠग्‍वेदकाळात कर्मकांडाचा उदय झालेला नव्‍हता. उत्तर वैदिककाळात म्‍हणजेच ॠग्‍वेदानंतर यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांची निर्मिती झाली. रामायण, महाभारत, गीता, उपनिषदे, सूत्रे, धर्मशास्‍त्राची निर्मिती झाली. उत्तर वैदिक काळात कुरू, कोशल, काशी, पांचाल, मगध व इतर राज्‍ये होती. रत्‍नीन (मंत्रिमंडळ) राजन्‍य (युवराज), महिषी (राजाची पट्टराणी), पुरोहित, सेनानी तसेच संग्रहित भागधुक, पालागल, ग्रामणी या अधिकारी वर्गांकडून राजाला प्रशासन कार्यात मदत होत होती. विवाहपद्धतीचे १० प्रकार प्रचलित होते. तसेच उत्तर वैदिक काळात स्त्रियांचा दर्जा खालावलेला होता. समाजात आश्रम व्‍यवस्‍था प्रचलित होती. पितृसत्ताक व संयुक्‍त कुटुंबपद्धती अस्तित्‍वात होती. कृषिप्रधान अर्थव्‍यवस्‍था होती. उत्तर वैदिक काळात विष्‍णू,  ब्रह्मा, महेश या प्रमुख देवता प्रचलित होत्‍या. यज्ञविधी, यज्ञकांडास महत्त्व प्राप्त झाले.
.
11. अ – विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्‍म कर्नाटकातील जामखिंडी येथे २३ एप्रिल १८७३ मध्‍ये झाला. ब – त्‍यांनी १९०३ मध्‍ये अॅमस्‍टाडम येथील जागतिक धर्मपरिषदेत “हिंदुस्‍थानातील उदार धर्म” हा निबंध वाचला. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
(1)  फक्त अ बरोबर ब चूक (2)  फक्त ब बरोबर अ चूक
(3)  अ व ब दोन्‍ही बरोबर (4)  अ व ब दोन्‍ही चूक
Explanation:
  विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्‍म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जामखिंडी येथे झाला. वि. रा. शिंदेचे घराणे सरापूरचे जहाँगीरदार घराणे होते. शिंदेंचे मूळ गाव गोव्‍यातील पेडणे तालुक्‍यातील पार्से हे होय. सयाजीराव गायकवाडांनी शिक्षण पूर्ण झाल्‍यावर बडोदा संस्‍थानात नोकरी करावी लागेल या अटीवर वि.रा.शिंदे यांना १५०० रु. आर्थिक साहाय्‍य केले. इ.स. १८१८ मध्‍ये पुण्‍यातील फर्ग्‍युसन कॉलेजातून इतिहास व कायदा विषय घेऊन बी.ए. झाल्‍यावर त्‍यांनी प्रार्थना समाजाचे सभासदत्‍व स्वीकारले. वि. रा. शिंदे हे प्रार्थना समाजातर्फे प्रकाशित होणार्‍या ‘सुबोध पत्रिकेत’ लेख लिहित असत.
  इ.स. १९०३ मध्‍ये प्रार्थना समाजाचे प्रचारक म्‍हणून वि.रा.शिंदे यांची निवड झाली व बेळगाव येथून त्‍यांनी भारत दौरा सुरू केला. वि. रा. शिंदे यांनी प्रार्थना समाजाच्‍या सभासदांसाठी ‘उपासना’ हे साप्ताहिक चालवले. इ.स. १९०३ मध्‍ये प्रार्थना समाजाच्‍या साहाय्‍याने त्‍यांना अमेरिकेला जाण्‍याची संधी मिळाली. जुलै १९०३ साली अमेरिकेवरून परतताना अॅमस्‍टाडम येथील जागतिक धर्मपरिषदेत ‘हिन्‍दुस्‍थानातील उदार धर्म’ हा निबंध वाचला.
  इ.स. १९१० मध्‍ये त्‍यांनी जेजूरी (पुणे) येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली. इ.स. १९१३ मध्‍ये वि.रा.शिंदे यांनी जातीभेदावर भाषण दिल्‍यामुळे झालेल्‍या दंगलीत त्‍यांना जामखिंडी हे गाव सोडावे लागले. त्‍यानंतर ते मुंबईत व तेथून लगेच पुण्‍यास राहावयास आले. अस्‍पृश्‍यता निवारणाचा ठराव काँग्रेसच्‍या अधिवेशनात प्रथमच १९१७ ला कोलकाता येथे वि. रा. शिंदे यांच्‍या पुढाकाराने मांडण्‍यात आला. २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे सयाजीराव गायकवाडांच्‍या अध्‍यक्षतेखाली अखिल भारतीय अस्‍पृश्‍यता निवारण परिषद भरवली व अस्‍पृश्‍यता निवारक संघ स्‍थापन केला. इ.स. १९१८ मध्‍ये त्‍यांनी ‘मराठा राष्‍ट्रीय संघाची’ स्‍थापना केली. मराठा राष्‍ट्रीय संघास विरोध करणार्‍यांनी सत्‍यशोधक मराठा पक्ष ही संघटना स्‍थापन केली होती. १९१३मध्‍ये वि.रा.शिंदे यांचा निराश्रित सहकारी मंडळाशी संपर्क तुटला व ते ब्राह्मो समाजात गेले. त्‍यांनी ब्राह्मो धर्माच्‍या प्रसारासाठी ‘तरुण ब्राह्म संघ’ स्‍थापन केला होता. इ.स. १९२४ साली त्रावणकोर संस्‍थानातील वायकोम येथे अस्‍पृश्‍यांनी केलेल्‍या सत्‍याग्रहात वि.रा.शिंदे यांनी भाग घेतला होता. १९२३ मध्‍ये वि.रा. शिंदे यांनी ‘अहिल्‍याश्रमाची’ स्‍थापना केली. १९३० या सविनय कायदेभंगाच्‍या चळवळीत त्‍याना ६ महिने अटक झाली होती. १९३२-३३ सालचे बडोदा संस्‍थानचे “सयाजीराव गायकवाड” पारितोषिक वि.रा. शिंदे यांना मिळाले होते. इ.स. १८९५ च्‍या पुणे येथील काँग्रेस अधिवेशनात स्‍वयंसेवक म्‍हणून वि.रा.शिंदे यांनी काम केले. वि.रा.शिंदे यांचा “आधुनिक काळातील महाकलिपुरुष” असा द्वारकापीठ शंकराचार्यांनी निषेध करून एका अर्थाने कशंदेच्‍या पुरोगामीत्‍वाची पावतीच दिली. वि.रा.शिंदे यांनी ‘समता सैनिक दलाची’ स्‍थापना केली.
.
12. लोकसभेच्‍या दुसर्‍या महिला सभापती कोण आहेत?
(1)  मीरा कुमार (2)  सुषमा स्‍वराज
(3)  प्रतिभाताई पाटील (4)  सुमित्रा महाजन 
Explanation:
  सुमित्रा महाजन यांचे संपूर्ण नाव सौ. सुमित्रा जयंत महाजन असे आहे. यांचा जन्‍म ११ एप्रिल १९४३ साली कोकणातील चिपळूण येथे झाला.
मध्‍यप्रदेश ही सुमित्रा महाजन यांची कर्मभूमी असली, तरी कोकणातील चिपळूण ही त्‍यांची जन्‍मभूमी आहे. येथील उषा व पुरुषोत्तम साठे यांच्‍या पोटी १२ एप्रिल १९४३ रोजी जन्‍म झाला. २९ जानेवारी १९६५ रोजी इंदौर येथील प्रसिद्ध वकील जयंत महाजन यांच्‍याशी विवाह झाला. ताई या नावाने सर्वपरिचित असलेल्‍या इंदौर विद्यापीठातून त्‍यांनी कायद्याची पदवी घेतली.
  १९८२ मध्‍ये इंदौर महानगरपालिकेत नगरसेविका म्‍हणून निवडून आल्‍या, त्‍यानंतर उपमहापौरपदी निवड झाली. १९८९ मध्‍ये पहिल्‍यांदा ‘इंदौर’लोकसभा मतदारसंघातून खासदार म्‍हणून निवडून आल्‍या, यानंतर त्‍या सलग आठ वेळा या मतदारसंघातून निवडून आल्‍या आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास, माहिती व प्रसारण आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या खात्‍याच्‍या राज्‍यमंत्री होत्‍या.
गिनि‍ज बुकात नोंद – एकाच मतदान संघातून आठ वेळा निवडून येणार्‍या महिला खासदार म्‍हणून गिनीज बुकमध्‍ये त्‍यांची नोंद झाली आहे.
मराठी भाषकाला चौथ्‍यांदा सभापतीपदाचा मान – लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळणकर, १९९१ ते ९६ या कालावधीत शिवराज पाटील चाकुरकर, २००२ ते २००४ मनोहर जोशी आणि यानंतर सुमित्रा महाजन यांना हा बहुमान मिळाला.
लोकसभेचे सभापती
पहिले
१. गणेश वासुदेव मावळणकर
२. एम. ए. अय्‍यंगार
१९५२-१९५६ (मृत्‍यू)
१९५६-१९५७
दुसरे
१. एम. ए. अय्‍यंगार
१९५७-१९६२
ति‍सरे
१. हुकूम सिंह
१९६२-१९६७
चौथे
१. नीलम संजय रेड्डी
२. डॉ. गुरदयाल सिंह ढिल्‍लो
१९६७-१९६९ (राजीनामा)
१९६९-१९७१
पांचवे
१. डॉ. गुरुदयाल सिंह ढिल्‍लो
२. बलीराम भगत
१९७१-१९७५
१९७६-१९७७
सहावी
१. नीलम संजय रेड्डी
२. के. डी. हेगडे
१९७७-१९७७ (राजीनामा)
१९७७-१९८०
सातवे
१. डॉ. बलराम जाखड
१९८०-१९८५
आठवे
१. डॉ. बलराम जाखड
१९८५-१९८९
नववे
१. रवि राव
१९८९-१९९१
दहावे
१. शिवराज वी. पाटील
१९९१-१९९६
अकरावे
१. पी. ए. संगमा
१९९६-१९९८
बारावे
१. जी. एम. सी. बालयोगी
१९९८-१९९९
तेरावे
१. जी. एम. सी. बालयोगी
२. मनोहर जोशी
१९९९-२००२ (मृत्‍यू)
२००२-२००४
चौदावे
१. सोमनाथ चटर्जी
२००४-२००९
पंधरावे
१. मीरा कुमार
२००९ ते २०१४
सोळावे
१. सुमित्रा महाजन
२०१४ ते आजपर्यंत

No comments:

Post a Comment