भूजलाची खरी गोष्ट!
भूजल जास्त प्रमाणात मुरावं यासाठी विशिष्ट प्रकारच्या खडकांची किंवा भूशास्त्राची आवश्यकता असते. त्यादृष्टीने महाराष्ट्राचं भूशास्त्र प्रतिकूल आहे. ही आकडेवारी किती क्षेत्रावर लागू होते. महाराष्ट्राचा ८१ टक्क्यांपेक्षा जास्त भूभाग बेसॉल्ट नावाच्या कठीण अग्निजन्य खडकानं व्यापला अाहे. त्याच्याशिवाय रूपांतरित खडकाचं प्रमाण साडेदहा टक्क्यांच्या आसपास आहे. तो मुख्यत: पूर्व विदर्भात आढळतो आणि अगदी थोड्या प्रमाणात कोकणात अगदी दक्षिणेला. या दोन्ही प्रकारच्या खडकांचं क्षेत्रफळ येतं ९२ टक्क्यांपेक्षा जास्त. या खडकांचं वैशिष्ट्य असं का, त्यांची पाणी सामावून घेण्याची क्षमता आहे केवळ १ ते ३ टक्के. अगदी अपवादात्मक स्थितीत ४ टक्के. याचा अर्थ महाराष्ट्राच्या बहुतांश भूभागावर पाणी मुरण्याच्या मूलभूत मर्यादा आहेत. महत्त्वाचा मुद्दा येतो, आपण हे वास्तव स्वीकारणार का?
अभिजित घोरपडे
भूजलाचे पुनर्भरण... हे सध्याचे परवलीचे शब्द. अनेक समस्यांवरचा उपायच जणू. मग ते शहरी भागातलं छतावरच्या पाण्याचं संवर्धन असो, नाहीतर ग्रामीण भागातील जलसंधारणाचे विविध प्रयत्न. पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. ही बाब उत्तम आणि अनुकरणीयच. पण आपल्याला याबाबतचं प्रमाण किंवा आकडेवारी माहीत असते का? ती इथं दिली तर कदाचित आश्चर्य वाटेल आणि आपल्या प्रचलित धारणांना धक्काही बसेल.
गेल्याच शनिवारी 'भवताल कट्टा' या उपक्रमात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे (जीएसडीए) निवृत्त उपसंचालक शशांक देशपांडे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. त्यांनी भूजल या विषयावर वस्तुनिष्ठपणे मांडणी केली. त्यांनी दिलेली आकडेवारी श्रोत्यांसाठी धक्कादायक होती. त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात सांगितलं, आपल्याकडं दरवर्षी मुरत असलेल्या भूजलापैकी ७२ टक्के पाणी हे नैसर्गिकरीत्या जमिनीत मुरतं. बाकी २२ टक्के पाणी सिंचनासाठी पुरवलेल्या पाण्यातून जमिनीत जातं. दोन टक्के पाणी तलाव आणि कालव्यातून पाझरून जमिनीत मुरतं. मग उरलं केवळ ४ टक्के पाणी. इतकंच पाणी आपण भूजलाच्या संवर्धसानाठी करत असलेल्या प्रयत्नांमुळं जमिनीत जातं. म्हणजे ज्याच्यासाठी इतकं काम केलं जातं, पैसा खर्च केला जातो, वेळ दिला जातो... त्याची निष्पत्ती काय? तर वर्षभर मुरणाऱ्या एकूण पाण्यापैकी केवळ चार टक्के वाटा! अर्थात तेही गरजेचं आणि महत्त्वाचंच आहे, पण आपल्याला वाटतं तितकं त्याचं प्रमाण नाही, एवढंच इथं सांगायचं अाहे.
हा धक्का कमी होता म्हणून की काय, देशपांडे यांनी दुसरी वस्तुस्थिती नमूद केली. महाराष्ट्रातील भूजल हे आपल्याकडं सांगितल्या जाणाऱ्या कासव आणि सशाच्या गोष्टीप्रमाणेच! बेसाल्टसारख्या कठीण खडकात पाणी मुरतं ते अगदी कासवाच्या गतीने. कधी ते दिवसाला एक ते शंभरेक मीटर खाली जातं, पण त्याचा वेग अगदी वर्षाला १ मीटर ते १०० मीटर इतकाही कमी असू शकतो; पण ते उपसलं जातं सशाच्या गतीने, म्हणजे ३ अश्वशक्तीच्या पंपाने तासाला सरासरी १८ हजार लिटर. जितकी जास्त अश्वशक्ती तितका पाणी उपसण्याचा वेग जास्त. एकूणच काय तर सशाच्या गतीने पाणी इतके उपसलं जाणार की खडकात काहीच शिल्लक राहणार नाही आणि मग काय एकदा का सर्व भूजल उपसलं गेलं की पुन्हा तेवढं पुनर्भरीत होण्यासाठी कासवाच्या गतीने बरीच वर्षे लागणार. तेही पाऊस पुरेसा पडला तरच जलधरात पाणी भरलं जाणार.
या आकडेवारीच्याही पुढचा भाग म्हणजे- आपण विंधन विहिरींद्वारे (बोअर वेल्स) कितीतरी वर्षांपूर्वीचं पाणी काढून घेतो आहोत. सर्वसाधारणपणे सांगायचं तर साधारण ६० मीटरवरचं म्हणजे २०० फुटांवरचं पाणी काढणं म्हणजे जे पाणी साठायला शंभर वर्ष लागलीत, असं पाणी काढून घेणं. लोक आता सहजपणे त्याच्याही खाली जातात. साधारण १०० मीटर म्हणजेच ३२५ ते ३३० फूट खाली गेलं की आपण तीनशे वर्षांपूर्वीचं पाणी उपसून घेतो, असं ढोबळमानानं समजायचं. आताच्या तंत्रज्ञानाची उपलब्धता पाहता, हे पाणी उपसायला फारसा वेळ लागत नाही आणि त्याचा खर्च जास्त असतो, पण तो आवाक्याबाहेरचा नसतो. आता शांतपणे विचार करा आणि सांगा, भूजल मुरण्याचा वेग आणि ते उपसून घेण्याचा वेग यांच्यात काही ताळमेळ बसतोय का?
ही वस्तुस्थिती इथंच संपत नाही. आता भूजल मिळवण्यासाठी खोल खोल जाण्याची स्पर्धा सुरू अाहे. हे असं करण्यानं पाणी मिळतं का? त्यात तथ्य किती? खरं सांगायचं तर त्यासाठी आपला खडक सविस्तरपणे समजून घ्यायला पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की, खडकाच्या वरच्या भागात भेगांचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं आणि खाली जाऊ तसं ते कमी होत जातं; मग अधिक खोल गेल्यावर जास्त पाणी कसं मिळेल? आणि थोडंफार पाणी लागलं तरी ते काढून घेणं खर्चिक ठरतं. कारण ते खेचून घेण्यासाठी किती वीज लागेल? या सर्व गोष्टी ध्यानात घेता, हे खोलवरचं पाणी काढून घेणं बऱ्याचदा आतबट्ट्याचं ठरतं. कारण हे लागणारं पाणीही फार काळ टिकत नाही. शशांक देशपांडे यांच्या शब्दांत सांगायचं तर... "राज्यभर भूजल पातळी खालावत आहे. त्यामुळे विहिरींच्या ऐवजी बोअरवेल/ट्यूबवेल घेण्यामागचा कल वाढला आहे. या मागची प्रमुख कारणे म्हणजे एका दिवसात विंधन विहीर करून त्यावर वीजपंप बसवून लगेचच पाणीपुरवठा सुरू होतो. परंतु, अतिखोलीवरील पाणी हे संधी व भेगांमध्ये उपलब्ध असल्याने व त्यांची व्याप्ती सर्वदूर नसते. त्यामुळे हे पाणी बराच काळ टिकत नाही, असा अनुभव आहे. परिणामी शेतकऱ्यांनी केलेली अर्थिक गुंतवणूक काही काळानंतर वाया जाते आणि तो हवालदिल व कर्जबाजारी होण्याचा धोका असतो."
भूजल जास्त प्रमाणात मुरावं यासाठी विशिष्ट प्रकारच्या खडकांची किंवा भूशास्त्राची आवश्यकता असते. त्यादृष्टीने महाराष्ट्राचं भूशास्त्र प्रतिकूल आहे. ही आकडेवारी किती क्षेत्रावर लागू होते. महाराष्ट्राचा ८१ टक्क्यांपेक्षा जास्त भूभाग बेसॉल्ट नावाच्या कठीण अग्निजन्य खडकानं व्यापला अाहे. त्याच्याशिवाय रूपांतरित खडकाचं प्रमाण साडेदहा टक्क्यांच्या आसपास आहे. तो मुख्यत: पूर्व विदर्भात आढळतो आणि अगदी थोड्या प्रमाणात कोकणात अगदी दक्षिणेला. या दोन्ही प्रकारच्या खडकांचं क्षेत्रफळ येतं ९२ टक्क्यांपेक्षा जास्त. या खडकांचं वैशिष्ट्य असं का, त्यांची पाणी सामावून घेण्याची क्षमता आहे केवळ १ ते ३ टक्के. अगदी अपवादात्मक स्थितीत ४ टक्के. याचा अर्थ महाराष्ट्राच्या बहुतांश भूभागावर पाणी मुरण्याच्या मूलभूत मर्यादा आहेत. महत्त्वाचा मुद्दा येतो, आपण हे वास्तव स्वीकारणार का?
याच्याही पुढं जाऊ सांगायचं म्हणजे पडणारा पाऊस आणि मुरणारं पाणी यांचं एकास एक प्रमाण असत नाही. कारण प्रत्येक भागाची पाणी मुरण्याची क्षमता विशिष्ट आहे, त्यामुळे तिथं किती पाऊस पडतो याला विशेष असा अर्थ उरत नाही. कोकणाबाबत सांगायचं तर तिथं २५ ते १५० मिलिमीटर इतकाच पाऊस मुरतो किंवा मुरू शकतो; मग तिथं सरासरी २५०० किंवा ३००० मिलिमीटर पाऊस पडला तर त्याचा भूजलाच्या दृष्टीनं फारसा उपयोग होतच नाही. पडलेलं पाणी जमिनीत न मुरता वाहून जातं.
पुढचं वास्तव तर आपल्या नियोजनाचं आणि भूजलाच्या किंवा एकूणच पाण्याच्या व्यवस्थापनाचे वाभाडे काढणारं आहे. महाराष्ट्रात जिथं भूजलाचं प्रमाण कमी आहे, त्याची अवस्था चिंताजनक बनली आहे, अशाच परिसरात जास्तीत जास्त पाणी लागणारं पीक घेतलं जातं. ते पीक म्हणजे अर्थातच ऊस आणि अशाच भागात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. तिथं उसासाठी जस्तीत जास्त प्रमाणात भूजलच वापरलं जातं... मग महाराष्ट्रातली ८० टक्के पाणलोट क्षेत्रं शोषित बनली नाहीत तरच नवल! आज आपण भूजलाचं हेच वास्तव घेऊन जगत आहोत.
सध्या तरी जगत आहोत, पण भविष्यात हे जगणं असेल का? अशी धास्ती मनात आल्याशिवाय राहत नाही. पाण्याबाबत श्रीमंत परंपरा असलेल्या भारतासारख्या देशात हे घडावं, हे सर्वांत दु:खदायक. कारण आपल्या पूर्वजांनी पाणी जपलं, राखलं. भूजलाच्या बाबतीत तर विशेष काळजी घेतली. त्याचा परिणाम म्हणून तर प्राचीन काळापासूनच्या अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या असंख्य व्यवस्था दिसतात. पण आता आपण हे शहाणपण मोडीत काढत आलो आहोत... फारसं भाष्य न करता केवळ आकडेवारी व वस्तुस्थिती पाहिली तरी भूजलाची खरी गोष्ट आपल्याला उलगडते. त्यासाठी आपल्यात थोडासा प्रामाणिकपणा आणि वस्तुनिष्ठपणा असावा लागतो इतकंच.
abhighorpade@gmail.com
Tuesday, March 28, 2017 AT 06:15 AM (IST)
Tags: agro special
No comments:
Post a Comment