प्रिय सखे..
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शनिचा चौथरा तु ओलांडलास..अंबेच्या गाभारयातही तू प्रवेश केलास,त्याबद्दल तुझ कौतुक आहेच...पण खर सांगू का तुला चौथरा ओलांडायचा आहे . तो तुझ्या मनात वर्षानुवर्षे घट्ट रूतून बसलेल्या रूढीपरंपरांचा आणि पापपुण्याच्या भ्रामक कल्पनांचा... खरतर तथाकथित धर्माचा ठेका घेऊन देवावर अधिकार सांगणाऱ्यांना कदाचित या गोष्टीचा विसर पडला असेल की ज्या देवांना तू चालत नाहीस त्यांचा जन्म तुझ्याच उदरातून झालाय...पण तुझी लढाई समाजाशी नाही..सरकारशीही नाही..पुरूषांशी तर बिलकूल नाही....कारण तुझ्या शिक्षणाची मुहुर्तमेढ ज्यांनी रोवली ते ज्योतिबा,विधवा विवाह आणि संतती नियमनाची सुरूवात करणारे महर्षि आणि रघुनाथ कर्वे,केशवपन आणि सती सारख्या अनिष्ट प्रथांविरोधात लढणारे राजा राम मोहन राॅय. हिंदू काेड बिल आणून स्त्रीयांना स्त्रीपन मिळवून देनारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.या आणि अशा कित्येक पुरूषांनी समाजाच्या विरोधात जाऊन तुझ्या आयुष्याला अर्थ दिलाय..माणूस म्हणून तुला ओळख दिलीय………..
म्हणूनच तुझी खरी लढाई फक्त आणि फक्त स्वतःशी आहे.तू कवटाळून बसलेल्या खोटया कर्मकांडाशी आहे.कारण, पोटच्या तीन पोरांनी उपाशी ठेवल असतानाही 'एक मुलगा पाहिजेच'असा उपदेश देणारी तुच आहेस.बाहेर स्त्री समानतेच्या गप्पा मारून घरी मुलगाच हवा असा अट्टाहास धरणारीही तूच आहेस.गणपती-नवरात्रीला स्वतःला अपवित्र समजून पाळीच्या गोळया घेणारीही तूच आहेस.लग्न न होणार्या, मूल न होणार्या आणि विधवा झालेल्या स्त्रियांना जगणं नकोसं करणारीही तूच आहेस...आणि म्हणून मंदीर प्रवेशाला विरोध करणारयांमध्ये तू आहेस.
सखे,
तुला बदलाव लागेल.....
एकवेळ देवीची खणानारळाने ओटी नाही भरलीस तरी चालेल,पण रस्त्याकडेला अर्धवट कपडयात निजलेल्या असहाय्य स्त्रीच शरीर तुला झाकावं लागेल.देवासमोर पंचपक्वांनाची आरास नाही केलीस तरी चालेल पण निराधार आणि गरीब मुलींच्या तोंडात अन्नाचा घास तुला भरवावा लागेल.अन्यायाने गांजलेल्या लेकीबहिणींना मदतीचा हात द्यावा लागेल.वासनांध समाजाची तुला भिती वाटते ना, मग तुझ्या मुलाच्या वासनेची शिकार कोणी होणार नाही याची जबाबदारी तुला घ्यावी लागेल.'अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही झालो असतो सुंदर रूपवान' असे म्हणून परस्त्रीकडे मातेसमान पहायला लावणारी महाराजांची दृष्टी म्हणजे दुसर तिसर काही नव्हत गं! ती जिजाऊंच्या संस्करांची ताकद होती,ही ताकद तुला तुझ्या 'मुलाच्या नजरेत आणावी लागेल.'
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलास, तसा तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात जाऊन तुझ्यातल्या शक्तीच दर्शन घे...तुझी बुध्दीमत्ता, विद्वत्ता, तुझं वात्सल्य, तुझा कणखरपणा, तुझी सहनशीलता, सृजनशीलता यांचा साक्षात्कार तुला होईल.तुझा त्याग, समर्पण, नवनिर्मितीची क्षमता यापुढे साऱ्या निसर्गशक्ती हात जोडून उभ्या आहेत.तुझ्याशिवाय धर्मच काय सृष्टीच्या निर्मितीची कल्पना सुध्दा करता येत नाही.तुझ्या श्रध्देला मी नाकारत नाही...पण एवढच सांगणं आहे;
सखे,
श्रध्दा ठेवायची ती स्त्रित्वावर ,
जागर करायचा तो स्त्रिशक्तीचा,
संहार करायचा तर स्वतःला अपवित्र, दुय्यम,समजणार्या स्वतःमधील दुष्ट प्रवृत्तींचा,आणिधर्म पाळायचा तो माणुसकीचा.
No comments:
Post a Comment