1. १९१० साली मैट्रिक झाल्यानंतर त्यांनी बडोद्याच्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. बाबू अरविंद घोष हे विनोबांच्या कॉलेजचे प्राचार्य होते. तय्तच विनोबांनी १९१४ मध्ये 'विद्यार्थी मंडळ' स्थापन केले. हे विद्यार्थी मंडळ आणि प्राचार्य अरविंद घोष यांच्यामुळे इंग्रज सरकारचे घडामोडींवर लक्ष होते.
2. नवीन स्थापन झालेल्या बनारस हिंदू विद्यापीठ येथे ४ फेब्रुवारी १९१६ रोजी महात्मा गांधीनी भाषण दिले होते ते भाषण वृत्तपत्रात छापून आले. ते वाचल्यानंतर विनोबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९१६ साली विनोबा परीक्षा देण्यासाठी मुंबई येथे जाणार होते पण महात्मा गांधींचे भाषण वाचल्यानंतर त्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र जाळून टाकले.
3. विनोबांनी गांधीना पत्रे लिहिली. त्यानंतर गांधीनी विनोबांना कोचरब आश्रम, अहमदाबाद येथे येउन वैयक्तिक भेट घेण्याचा सल्ला दिला. ७ जून १९१६ रोजी विनोबांची गांधींशी पहिली भेट कोचरब येथेच झाली व तेथेच त्यांनी शिक्षण सोडून देण्याचा निर्णय घेतला. व त्यांनी गांधींच्या आश्रमात चालणाऱ्या कार्यक्रमात रस घेण्यास सुरुवात केली. गांधीजींच्या आज्ञेवरून विनोबा शरीराच्या शुद्धीसाठी १४ जानेवारी १९१७ रोजी वाई मुक्कामी आले व वर्षभरात त्यांनी शरीरप्रकृती स्वस्थ केली.
4. गांधीजी साबरमती आश्रमात वास्तव्यास असताना जमनालाल बजाज यांनी वर्धा येथे आश्रम काढण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला. त्या आग्रहाखातर वर्धा येथे 'सत्यागृहाश्रम' काढण्यास गांधींनी परवानगी दिली. ८ एप्रिल १९२१ रोजी विनोबा गांधीजींच्या इच्छेनुसार वर्धा येथील आश्रम सांभाळण्यास गेले.
5. १९२१ मध्ये त्यांनी अधिकृतपणे कॉंग्रेसचे सभासदत्व स्वीकारले. परंतु एक कोटी रुपयांचा 'टिळक फंड' उभा करण्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी १९२५ मध्ये कॉंग्रेसचे सभासदत्व सोडले.
6. सरकारने घातलेली बंदी मोडून जमनालाल बजाज यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय झेंडा घेऊन ११ एप्रिल १९२१ रोजी नागपुरात निघालेल्या एका मिरवणुकीतील सर्व सत्यागृहींना अटक झाली. झेंडा सत्यागृहाच्या मिरवणुकीचे देशभरातून आलेल्या सत्यागृहींचे हे सत्र चालूच होते.
7. विनोबाही झेंडा सत्यागृहात सामील झाले. १८ जून १९२३ रोजी त्यांना अटक होऊन एक वर्षभराची सक्तमजुरीची शिक्षा झाली. विनोबाजींचा देशासाठी हा पहिला तुरुंगवास होता. पुढे आंदोलनाचा वाढता जोर पाहून सत्यागृहींची तुरुंगातून मुक्तता झाली व विनोबांनाही शिक्षेचे तीन महिने पूर्ण होण्याच्या आत ३ सप्टेंबर १९२३ रोजी सोडून देण्यात आले.
8. जानेवारी १९२३ साली त्यांनी 'महाराष्ट्र धर्म' या नवीन मासिकाची सुरवात केली. या मासिकात त्यांनी आपले उपनिषदावरील निबंध प्रसिद्ध केले. पुढे या मासिकाचे रुपांतर साप्ताहिकात झाले. ते तीन वर्षापर्यंत चालले. १८ जून १९२४ ते ११ एप्रिल १९२७ या काळात 'महाराष्ट्र धर्म'चे १४० अंक प्रसिद्ध झाले. त्यात एकूण २२२ लेख प्रकाशित करण्यात आले.
9. वैकोम, केरळ येथे दलितांच्या मंदिर प्रवेशावर रोख लावण्यात आली होती. या प्रकरणाचे पर्यवेक्षण करून त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी गांधीनी १९२५ साली विनोबांना वैकोम येथे पाठवले.
10. तुरुंगात त्यांनी 'इशावास्यवृत्ती' आणि 'स्थितप्रज्ञ' या ग्रंथांचे लेखन केले. वेल्लोर येथील तुरुंगात असताना त्यांनी अनेक दक्षिण भारतीय भाषा शिकल्या व त्यांचा अभ्यास केला. त्यावरून त्यांनी 'लोक नगरी' हे हस्तलिखित लिहिले. तुरुंगात ते आपल्या सोबती कैद्यांना 'भगवतगीते'वर प्रवचन देत. पुढे याचा संग्रह म्हणून 'गीता-प्रवचन' हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
11. कॉंग्रेसने अधिवेशन शहरापासून दूर खेड्यात भरवावे या गांधीजींच्या सूचनेनुसार १९३६ चे अधिवेशन फैजपूर (जळगाव) येथे भरविण्याचे ठरविले. आणि त्याची सर्व जबाबदारी विनोबांवर सोपविण्यात आली. विनोबाजींनी हे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडले.
12. महात्मा गांधीसोबत त्यांनी 'सविनय कायदेभंग' चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. १० ऑक्टोबर १९४० रोजी विनोबांनी पवनार येथे युद्धविरोधी भाषण करून, भाषणस्वातंत्र्याचा हक्क बजावत पाहिला वैयक्तिक सत्यागृह केला. त्यांना अटक झाली व तीन महिन्यांची शिक्षा झाली.
13. तुरुंगातून सुटून आल्यानंतर विनोबांनी पुन्हा १७ जानेवारी १९४१ रोजी सेवाग्राममधून सत्यागृह केला. त्यांना अटक होऊन एक वर्षाची साध्या कैदेची शिक्षा झाली. गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत 'चले जाव'चा सरकारला इशारा दिला. सरकारने तत्काळ राष्ट्रीय नेत्यांची धरपकड केली. विनोबानांही अटक झाली व सुमारे ३ वर्षे त्यांना तुरुंगात राहावे लागले.
14. जुलै १९४५ मध्ये तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी हरिजनविषयक कामाला वाहून घेतले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजींशी चर्चा करून ते १९४६ मध्ये पवनार आश्रमाजवळ सुर्गाव येथे रोज भंगीकाम करण्यासाठी जाऊ लागले.
No comments:
Post a Comment