Monday 14 November 2016

कृषी माहिती

परभणी जिल्ह्यातील बोरी येथील मुरलीधर गोरे यांनी दूरदुष्टीने मशागतपूर्व ते पेरणी-काढणीपर्यंत शेतीत यांत्रिकीकरण केले आहे. कौशल्याने व संशोधक वृत्तीने गरजेनुसार यंत्रांत सुधारणा करून वेळ, पैसा, श्रम व मजुरीत बचत केली आहे. रुंद वरंबा, सोयाबीन कापणी, फवारणी आदी कामे त्यांनी सुलक्ष केली आहेत.
माणिक रासवे

शेतकरी नवनवीन पीक पद्धतींचा, सुधारित तंत्रांचा अवलंब करत आहेत. परंतु मजुरांची समस्या मात्र काही करून सुटायला तयार नाही. वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे पेरणीचे नियोजन बिघडतेच, शिवाय हाती आलेल्या पिकांचीही मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) येथील मुरलीधर गोरे तसे दूरदृष्टी असलेले शेतकरी म्हणायला हवेत. त्यांनी काही वर्षांपूर्वीच शेतीत यांत्रिकीकरण आणण्यास सुरवात केली.

यांंत्रिकीकरणाचे पुरस्कर्ते गोरे
गोरे यांची एकत्रित कुटुंबाची ४५ एकर शेती. त्यात सोयाबीन, तूर, हरभरा, डाळिंब अशी विविध पिके आहेत. मजुरांच्या समस्येला ते कंटाळले होते. पण म्हणून शेतीपासून दूर जाणे शक्य नव्हते. यांत्रिकीकरण हा हुकमी पर्याय होता. सुरवातीला त्यात आर्थिक गुंतवणूक करावी लागत असली तरी त्याचे फायदे निश्चित मिळणार होते. सन २०१० मध्ये त्यांनी १४ एचपी क्षमतेचा पाॅवर टिलर तर २०१४ मध्ये ५० एचपीचा ट्रॅक्टर खरेदी केला. सन २०१० मध्ये भोपाळ येथे गेले असता यंत्रे-अवजारांसंबंधीच्या संस्थेत त्यांना सोयाबीन काढणी यंत्र (रिपर) पाहण्यास मिळाले. त्यांनी ते काळाची गरज म्हणून खरेदीही केले. आज ट्रॅक्टर, पाॅवर टिलर यांच्या साह्याने पेरणीपूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंतची कामे ते यंत्रांद्वारे करतात. केवळ कोळपणीच्या बैलजोडीचे काम पडते. त्यासाठी एक बैलजोडी आणि एक सालगडी आहे.

गुंतवणूक झाली; पण फायदाही मिळाला
ट्रॅक्टर, पाॅवर टिलर, रोटव्हेटर, एचटीपी फवारणी पंप, बीबीएफ पेरणी यंत्र, तसेच अन्य अवजारांसाठी साधारणतः दहा लाख किंवा त्याहून थोडी अधिक आर्थिक गुंतवणूक झाली. परंतु यामुळे बैलजोड्या, सालगडी, मजुरांवरील खर्च कमी झाला.

सोयाबीनसाठी पेरणी ते काढणी यांत्रिकीकरण
गेल्या दोन वर्षांपासून बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीने ते सोयाबीनची पेरणी करतात. स्थानिक कारागिराच्या मदतीने त्यांनी दोन बीबीएफ यंत्रे जोडून सुधारित यंत्र तयार केले आहे. यामुळे पेरणीच्या वेळेत बचत होत आहे. एका दिवसामध्ये १५ एकर क्षेत्रावर पेरणी करता येणे शक्य होत आहे.

सोयाबीन कापणी यंत्र
सोयाबीनच्या कापणीसाठी सात एचपी क्षमतेच्या पाॅवर टिलरला रिपर जोडले आहे. यात अर्ध्या लिटर डिझेलमध्ये व सुमारे पावणेदोन तासांत एकरभर क्षेत्रावरील कापणी होते. सलग कापणी केली तर दिवसभरामध्ये दहा एकर क्षेत्रवरील कापणी पूर्ण करता येते. परंतु आॅक्टोबरच्या काळातील उन्हामुळे शेंगा फुटू नयेत यासाठी सकाळच्या वेळी सुमारे अडीच एकर आणि सायंकाळी अडीच एकर अशी पाच एकरांवरील सोयाबीनची कापणी गोरे करतात. कापलेले सोयाबीन जमा करण्यासाठी एका मजुराची मदत घ्यावी लागते. मराठवाड्यात ९५ टक्के भागात मजूर लावून हातानेच कापणी केली जाते. त्या तुलनेत कापणी यंत्राचा वापर करून त्याचा फायदा गोरे घेत आहेत. अन्यत्र सोयाबीन कापून जमा करणे व कापणी यासाठी एकरी ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. त्या तुलनेत यांत्रिक पद्धतीने काढणी केल्यामुळे डिझेल व एका गड्याची मजुरी यासह एकरी १२५० रुपयांपेक्षा खर्च पुढे जात नाही. शेतीतील खर्च, वेळ, श्रम कमी करण्याचे कसब अशा रीतीने गोरे यांनी मिळवले आहे.

यंत्राद्वारे डाळिंब, तुरीत फवारणी

गोरे यांची सहा एकर डाळिंब बाग आहे. त्यातील फवारणीसाठी त्यांनी पाॅवर टिलरला पुलीद्वारे एचटीपी पंप जोडला. रोटाव्हेटरच्या जागी द्रावण साठवण्यासाठी २२५ लिटर क्षमतेची टाकी बसवली. यामुळे दोन मजुरांच्या मदतीने सहा एकर डाळिंब बागेस फवारणी करता येते. त्यासाठी अडीच लिटर डिझेल लागते. सुमारे दीड तासात ७०० झाडे फवारून होऊ शकतात. तुरीत फवारणीसाठी छोट्या ट्रॅक्टरवर ब्रॅकेट लावून त्यावर उजव्या व डाव्या बाजूस प्रत्येकी तीन नोझल्स लावले आहेत. यामुळे दिवसभरात दहा एकर तुरीवर फवारणी शक्य होत आहे. त्यासाठी दोन लिटर डिझेल लागते. यामुळे हातपंपाच्या फवारणीपेक्षा वेळेची ७५ टक्के बचत होते, असे गोरे यांनी सांगितले.

नऊ नोझल्सद्वारे फवारणी
एचटीपी पंप आहे. सातशे फूट नळी आहे. ती बांधावर ठेवता येते. तिच्या साह्याने सोयाबीन, हरभरा आदी पिकांत नऊ नोझल्स पंपाद्वारे फवारणी करता येते. यात एकावेळी १८ ओळी ‘कव्हर’ करता येतात. चार मजुरांद्वारे दिवसाकाठी १५ एकरांत एकसारख्या प्रमाणात फवारणी करता येते. पाॅवर स्प्रेद्वारे जास्ती जास्त चार एकर सोयाबीनमध्ये फवारणी शक्य होते.

यांत्रिक काढणीसाठी सोयाबीनचा वाण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (परभणी) विकसित केलेला सोयाबीनचा एमएयूएस-१६२ हा वाण यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी अत्यंत योग्य आहे. त्याचे बियाणे उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे कृषी विद्यापीठात रांग लावून गोरे यांना ते खरेदी करावे लागले. या वाणास जमिनीपासून साधारणतः तीन इंच अंतरावर शेंगा लागतात. त्यामुळे यंत्राव्दारे कापणी करणे सोपे जाते. कवच टणक असल्यामुळे वाळल्यानंतर उन्हामुळे शेंगा फुटत नाहीत. यामुळे नुकसान कमी होते, असे गोरे यांनी सांगितले.

सद्यःस्थितीत शेतकऱ्यांपुढे मजुरांची मोठी समस्या आहे. विशेषतः काढणीच्या काळात मजुरांचा तुटवडा होतो. यामुळे परिपक्व झालेले पीक कापणीअभावी शेतात पडून नासाडी होते. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांनी यांत्रिक कापणीसाठी योग्य असे पिकांचे वाण शोधून काढून त्यांचा प्रसार शेतकऱ्यांत करावा.
- मुरलीधर गोरे


No comments:

Post a Comment