Friday 21 October 2016

केळी लागवड

केळी कांदेबाग लागवड ( टिश्यू कल्चर आणि स्थानिक वाण ).*

ऑक्टोंबर महिन्यात केळीची कांदेबाग लागवड होते. मृग भागापेक्षा या हंगामाचे उत्पादन थोडे कमी होते, मात्र भाव जास्त मिळतो. साडेचार बाय साडेचार किंवा पाच बाय चार फूट अंतरावर लागवड करतात. ठिबक सिंचनाची व्यवस्था आवर्जून करावी, लॅटरल दोन्ही बाजूंनी घ्याव्या. माती परीक्षण करून घ्यावे पीएच ८ च्या वर असेल तर शेखच्या जास्त वापरावे, मातीत मुरूम मिसळावा. श्रीमंती, अर्धापुरी, बसराई असे स्थानिक वाण कंद लावले तर ४५० ग्रॅमच्या खालचे कंद वापरू नये. लागवड करण्यापूर्वी १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बनडेझीम पावडर मिसळून त्या द्रावणात प्रत्येक कंद अर्धा तास बुडेल असे पाहावे. एक बाय एक चा खड्डा करून कंद लावताना खड्ड्यात १० ग्रॅम फोरेट टाकावे. टिश्यू कल्चर ची रोपे तीन महिने हार्डनिंग झालेली आणि ३० ते ४५ सेमी उंचीची ६/७ पानांची निवडावी. रोपे लावल्यानंतर १०० लिटर पाण्यात ६०० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम स्ट्रेप्टोमायसिन ( अँटी बायोटिक ) ६०० मिली क्लोरोपायरीफॉस मिसळून ड्रेचिंग करावे. प्रतिझाड १०० मिली मिळेल असे पाहावे. बेसल डॉस म्हणून प्रति झाड १० किलो कुजलेले शेणखत अर्धा किलो निंबोळी खत २५ ग्रॅम ऍझोस्पिरिलियम २५ ग्रॅम पीएसबी कल्चर टाकावे. प्रतिझाड २५० ग्रॅम  सुपर फॉस्फेट त्याच वेळी देऊन टाकावे. बाकी खते द्रवरूप एक आठवड्याने द्यावी.

केळीच्या कांदेबागचे द्रवरूप खत नियोजन.*

केळी, ऊस यासारख्या भरपूर पाणी लागणाऱ्या पिकांसाठी ठिबक सिंचन करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे पिकाला योग्य पाणी मिळतेच शिवाय पाण्याचा अपव्यय टळतो. जास्त पाण्यामुळे होणारे जमिनीचे नुकसान थांबते, योग्य पाणी आणि खतामुळे उत्पादनही वाढते. केळी पिकाला रासायनिक खताबरोबरच शेणखत, निंबोळी खत, गांडूळ खत यांची जास्त गरज असते. एकरी १० टन शेणखत आणि किमान पाच क्विंटल निंबोळी खत द्यावे. एक टन गांडूळ खत दिल्यास पीक आणखी जोमदार येते. तसेच बेसल डोस मध्येच सुपर फॉस्फेट एकरी ५०० किलो द्यावे. द्रवरूप खत प्रति आठवडा प्रति एकर पुढील प्रमाण द्यावे. एक ते १६ आठवडे युरिया ६.५ किलो पोटॅश ३ किलो. १७ ते २८ आठवडे युरिया १३ किलो पोटॅश ८.५ किलो. २९ ते ४० आठवडे युरिया ५.५ किलो तर पोटॅश ७ किलो ४१ ते ४४ आठवडे केवळ पोटॅश ५ किलो द्यावे. अशा खताबरोबरच मायक्रोन्यूट्रिएंट फवारणी द्वारे किंवा जमिनीतून किंवा ठिबक मधून द्यावे. लागवडी पूर्वी माती परीक्षण करून घेतल्यास खतांचा डोस ठरवण्यास मदत होते. त्या अहवालानुसार तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे बदल करावा.

No comments:

Post a Comment