Sunday 3 July 2016

बालसंस्कार

👧👦
*आपल्या चिमुकल्यांसाठी एवढे नक्की वाचायलाच हवे..*

*पालक सभेत असा एक प्रश्न विचारून बघावा - ‘कोणाची मुलं हट्टी आहेत, त्यांनी हात वर करा.’*
*सगळे हात वर होतात.*

*असं विचारलं की - ‘कोणाची मुलं नीट जेवत नाहीत?’*
*तरी सगळे हात वर.*

*मी आणखी एक प्रश्न विचारते -*
*‘इथे असे कोणी पालक आहेत का ज्यांनी आपल्या मुलांना कधी मारलं नाही?’*
*बहुतेक वेळेला एकही हात वर होत नाही.*

*मग विचारावं की - ठीक आहे.*
*आता दुसरा प्रश्न विचारते -*
*'असे कोणी पालक आहेत का की ज्यांना आपल्या मुलांना मारून बरं वाटतं, आनंद होतो? त्यांनी हात वर करा.’*
*पुन्हा एकही हात वर होत नाही.*

*पालक सांगू लागतात, ‘मुलांना मारलं की मग आपल्यालाच वाईट वाटतं.*
*रडू येतं. मग रडून झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आम्ही हात फिरवत बसतो. तो उठला की त्याच्या आवडीचं काही खायला करतो.’*

*एकदा असं झालं की, पहिल्या *प्रश्नाला एका पालकाने हात वर केला.*
*ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलांना कधीच मारलेलं नाही.’*

*मला फार नवल वाटलं.*
*मी म्हटलं, ‘तुम्ही पुढे येता का?*
*आम्हाला सांगा तरी तुम्ही असं कसं वागता ते?’*

*ते पुढे आले. हातात माईक घेतला आणि म्हणाले, 'ते डिपार्टमेंट त्याच्या आईकडे दिलंय.’*
*...आणि हशा-टाळ्यांच्या गजरात जागेवर जाऊन बसले.*

*आणखी एका बाबांना स्फूर्ती आली. ते आले आणि म्हणाले, ‘मी कामामुळे बाहेरगावी असतो. त्यामुळे मारायला मला मुलं भेटतच नाहीत.’*

*पुन्हा मोठा हशा झाला.*

*क्वचित काही पालक भेटतात न मारणारे.*
*आणि कुणी सांगतं, ‘आम्हाला* *आमच्या आईवडिलांनी कधीच मारलं नाही त्यामुळे आम्हाला पण मारावंसं वाटत नाही.’*

*कुणी म्हणतात, ‘लहानपणी भरपूर मार खाल्ला त्यामुळे ठरवलं की मुलांना आपण मारायचं नाही.’*

*काही असं सांगतात की, ‘मारायची गरज नाही. समजावून सांगितलं की मुलं ऐकतात.’*

*मला असं विचारावंसं वाटतं, ‘तुम्हाला मुलांना मारल्यावर जर वाईट वाटतं, रडू येतं, तरी का मारता मुलांना?’*

*पालक सांगतात, ‘राग येतो त्यांचा. राग आवरता येत नाही. कधी इतर कुठलातरी राग मुलांवर निघतो. वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसं!’*

*असं आपण जेव्हा म्हणतो की, 'आम्हाला राग आवरत नाही.'*

*तेव्हा आपण लबाड वागत असतो. काय लबाडी करतो आपण?*

*एकच चूक मुलांनी केली की त्याला मिळतो मार आणि वडिलांनी, आजी आजोबांनी, काकांनी केली तर?*
*तर लगेच आपण राग आवरतो.*

*मग एखाद्या छोट्या मुलीला मी माइकपाशी बोलावते.*
*तिला विचारते, 'अगदी सोपा प्रश्न आहे बरं का. घाबरू नको. छान उत्तर दे.’*
*ती 'हो' म्हणते, पण तिच्या चेहऱ्यावर ताण दिसतो.*
*मग मी तिला म्हणते, 'समज ही एक भाजीची वाटी आहे. ती अशी खोलीच्या मधेच ठेवलीय. तिकडून तू धावत-धावत आलीस आणि तुझा पाय वाटीला लागला. वाटी उडाली आणि सगळी भाजी सांडून गेली तर तुझी आई काय करेल?’*

*अर्धा मिनिट ती विचार करते आणि म्हणते, ''आई आधी एक धपाटा घालेल आणि म्हणेल, 'दिसत नाही तुला? आता भरून ठेव ती भाजी.''*

*सगळे पालक हसतात. तिला मी म्हणते, ‘छान उत्तर दिलंस.'*

*आता दुसरा सोपा प्रश्न.*
*'समज ती भाजीची वाटी तशीच आहे आणि तू धावत-धावत नाही आलीस. तुझे बाबा चालत आले. त्यांचा पाय वाटीला लागला. भाजी सांडली. आता आई काय करेल?’*

*मुलीला आता गंमत वाटते आणि उत्तर द्यायला उत्साह वाटतो.*
*ती म्हणते, ‘बाबांना आई काहीच म्हणणार नाही. धपाटापण घालणार नाही. उलट म्हणेल, 'मी भरते ती भाजी. तुम्ही जा कामाला. माझंच चुकलं. वाटी उचलून नाही ठेवली.’*

*पालक पुन्हा जोरदार हसतात.*
*मुलीला मी शाबासकी देते.*
*छोटं बक्षीस देते.*

*आपलं असं ठरलेलंच असतं की,*
*'चूक लहान मुलाच्या हातून झाली तर त्याला लगेच मारायचं आणि मोठ्या माणसांना मात्र माफ.*
*जो आपल्याला उलट मारू शकतो, त्याला आपण मारायला जात नाही! लहान मूल काय बिचारं करणार?'*

*मुलं बालभवनात सांगतात ते पालकांनी ऐकावं.*
*‘आज ना बाबांनी मला खूप मारलं.* *मला आज आत्महत्या करावीशी वाटते आहे.'*

*'आज आईने मला उगाचच मारलं. मला घरातून पळून जावंसं वाटतंय.'*

*आज दोघं मला खूप रागावले.*
*मला असं वाटतंय की, 'जगात माझं कुणीच नाही.'*

*इतकं जर मुलांना वाईट वाटतं,*
*तर का मारायचं मुलांना?*

*'छडी लागे छम-छम’वर अनेक पालकांचा विश्वास असतो.*
*'मारलं नाही तर मुलं बिघडतात' अशी त्यांच्या मनात भीती असते.*




*काही पालक तर हमखास असं सांगतात, 'मी लहानपणी फार वात्रट होतो. आमच्या एका सरांनी मला खूप बदडलं म्हणूनच मी सुधारलो.'*

*मुलं मात्र कितीदा सांगतात, ‘मारू नका ना! समजावून सांगा. आम्हाला कळतं.'*

*पण आपल्या मन:स्थितीचं काय करायचं?*
*कधी समजा सुट्टीचे दिवस आहेत. आवडते पाहुणे घरात आलेत.*
*सर्वांच्या तब्बेती उत्तम आहेत.*
*पैशाचा काही प्रश्न नाही.*
*घरात काही भांडण नाही.*
*अशा आनंदाच्या वातावरणात मुलांनी काही दंगा केला, नासधूस केली, आगळीक केली तर आपण उदारपणे म्हणतो, ‘जाऊ दे, जाऊ दे. भरून टाका ते. आपल्याला आता बागेत जायचंय.'*

*आणि याऐवजी,*
*'समजा मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळालेत, आपल्याला बरं नाही,* *पैशांची चणचण आहे, घरात भांडणं झालीयत, आपला मूड खराब आहे.*
*अशा वेळी मुलाच्या हातून चमचा खाली पडला तरी आपल्याला संताप आवरत नाही.*
*त्याला मार तर बसतोच,*
*वर दहा बोलणी ऐकून घ्यावी लागतात.*
*हा आपला मूड म्हणजे एखाद्या ग्लासातल्या पाण्याच्या* *पातळीसारखा असतो.*
*अप्रिय गोष्टी घडल्या की पातळी खाली जाते आणि आपली सहनशक्ती कमी कमी होते.*
*आवडीच्या गोष्टी घडल्या तर, पातळी वर जाते. आपली सहनशक्ती चांगली असते.*

*तेव्हा एक लक्षात ठेवायचं -*
*'मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत,*
*तोपर्यंत ही पाण्याची पातळी निर्धारपूर्वक वर ठेवायची आणि मुलांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं, 'याची जरूर आहे का?'*

*९९ टक्के वेळा तुम्हाला उत्तर मिळेल* -
*'जरूर नाही. मारू नको. समजावून सांग.'*

*तेव्हा प्रश्न संयमाचा आहे.*
*'मारणं' हा आपला शॉर्टकट असतो.*
*खरं तर,*
*कोण समजावून सांगत बसणार?*
*घाईच्या वेळी मुलं हट्ट करतात.*
*वेळ नसतो. मग घाला दोन धपाटे.*
*...आणि मुलं इतकी चिवट असतात की, ती आपला अंत पाहतात.*
*खरंच आहे. तुम्ही रस्सीखेच सुरू केलीत तर मुलं कधीच हरणार नाहीत.*
*तुम्हालाच आपल्या हातातला दोर सोडून देण्याचा शहाणपणा करावा लागतो.*

*मुलांशी संवाद वाढवण्यासाठी एक गोष्ट करता येईल.*
*रात्री मूल झोपत असेल तेव्हा वेळ काढून त्याच्याजवळ बसा.*
*त्याला गोष्ट सांगा. गप्पा मारा.*
*आणि त्याला हे सांगा की, 'आज दुपारी तू जो दुकानात हट्ट केलास, 'मला अमूक पाहिजे म्हणून' आणि 'रडायला लागलास' ते मला आवडलं नाही.*
*किती खेळणी आहेत तुझ्याकडे !*
*तरी हट्ट करायचा का?*
*मूल पण सांगेल त्याला तेच खेळणं का हवं होतं ते.*
*तुम्हीही सांगा तुम्ही ते का नको म्हणालात ते आणि सारखं* *आपल्याला हवं ते त्या क्षणी मिळत नाही, धीर धरावा, वाट पहावी.*
*कधी नाही मिळालं तर हट्ट करू नये.*
*तमाशे तर नाहीच करायचे हे त्याला/तिला पटवून द्या.*
*हे संवादाचं कौशल्य, प्रामाणिकपणे बोलणं मुलापर्यंत पोचतं. त्याला कळतं.*
*आई उगाचच ‘नाही’ म्हणत नाही.*
*त्यामागे कारणं असतात आणि मूलही मनात विचार करू लागेल.*

*'पालकत्वाची सत्ता' ही न वापरण्यासाठी असते.*
*ती चांगल्यासाठी जरूर वापरावी.*
*...पण मारण्यासाठी, अपमान* *करण्यासाठी, अडवणूक करण्यासाठी कधीही वापरू नये.*

-------------------------------------------------------------
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
(बालसंस्कार विभाग, वटवृक्ष इन्फोटेक फाउंडेशन, फॉर न्यू जनरेशन आष्टा.)

No comments:

Post a Comment