Tuesday 28 June 2016

निवेदन

स्पँनिश आक्रमकांविरुद्ध स्थानिक रेड इंडियन आदिवासींनी दिलेले निवेदन...
---------------------
तुम्ही आकाश खरेदी करणार किंवा विकणार तरी कसे ?
ही कल्पनाच आम्हाला समजत नाही.

हवेचा ताजेपणा आणि पाण्याचे तुषार यावर तर आमची मालकीच नाही, तर तुम्ही ती विकत कशी घेणार ?

या भुमीचे सगळेच भाग हे माझ्या लोकांसाठी सारखेच पवित्र आहेत
ही जमीन आमच्या जगण्याचं अंग आहे आणि या जमिनीचे आम्हीही भाग आहोत.

ही सुवासिक फुले आमच्या बहिणी आहेत,
हे हरिण, घोडा आणि भव्य गरुड आमचे भाऊ.

हे विशाल खडकाळ कडे, कुरणातले रसाळ धान्य, खेचरांच्या अंगातली उब आणि आम्ही माणसे- सगळीच एकाच कुटुंबातली.

हे ओढ्यातून वाहणारे खळाळते पाणी आणि या नद्या ,
या आमच्यासाठी केवळ पाणी नाहीत,
ते आमच्या पुर्वजांचे रक्त आहे.

आम्हाला कळून चुकले आहे की, तुम्हा गोऱ्यांना आमच्या जगण्याचा धर्म अनोळखी आहे.

त्यांच्यासाठी जमिनीचा हा तुकडा काय किंवा त्याच्या लगतचा दुसरा काय,
दोन्ही सारखेच.

तो अंधाऱ्या रात्री येतो आणि त्याला हवे ते ओरबाडून नेतो.
भूमी त्याला भावासारखी नाही.
ती त्याला शत्रू सारखीच.
ती त्याच्यासाठी जिंकायची गोष्ट .

तो पुढे पुढे सरकतो, मागे सोडतो आपल्या पुर्वजांच्या थडगी
आणि त्याचे त्याला काहीच सुखदु:ख नसते.

तो त्याच्या मुलांपासून ही भूमी खेचून घेतो त्याचे ही त्याला काहीच वाटत नाही.
त्याच्या बापाचे थडगे आणि मुलांचे नैसर्गिक अधिकार, याचे त्याला विस्मरण झाले आहे.

ही जमीन ; जी त्याला आईसारखी आहे आणि हे आकाश; जे त्याला पित्यासारखे आहे.
ते त्याला खरेदी करायच्या गोष्टी वाटतात, त्या तुडवायच्या, विकायच्या गोष्टी वाटतात

त्याची भूक सगळ्या पृथ्वीला गिळून टाकेल आणि त्यानंतर मागे उरेल वैराण वाळवंट...

No comments:

Post a Comment