Wednesday 15 June 2016

भात लागवड

भात उत्पादनाची चारसूत्री:- कोकणातील व पश्चिम घट विभागातील शेतकऱ्यांस भातशेती परवडत नाही. तरीपण आज कित्येक वर्षे ती तोतात करीत आहे. त्याची करणे बरीच आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे निसर्गाने त्याला दुसरा चांगला शेती पर्याय ठेवलेला नाही. त्याला आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि तरीसुद्धा अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन डॉ. नारायण कृ. सावंत आणि श्रीपाद दफ्तरदार जनसेवा फौंडेशन दादरा (दादरा नगर हवेली) यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षात संशोधन केले. फोंडाघाटापासून इगतपुरीपर्यंत ठिकठिकाणी शेतप्रयोग करून सुधारित चार सूत्री भातशेती पद्धती विकसित केली आहे.

१. भात पिकातील पालाश व सिलिकॉन अन्नद्रव्यांचा फेरवापर.

२. गिरीपुष्पाच्या (ग्लीरीसिडीयाच्या) झाडाच्या हिरव्या पाल्याचा हिरवळीचे खात म्हणून वापर.

३. अधिक उपजाऊ भात जातींच्या रोपांची नियंत्रित लावणी

४. स्फुरदयुक्त युरिया ब्रिकेट स्वरुपात रासायनिक खताचा कार्यक्षम वापर.

सूत्र एक भात पिकातील पालाश व सिलिकॉन अन्नद्रव्यांचा फेर वापर वाढीव उत्पादनासाठी महत्वाचे पोषक अन्नद्रव्य आहे. सिलिकॉनच्या अभावी भात नात्र खताचा कार्यक्षमरीत्या उपयोग करू शकत नाही आणि रोगकीडीस लवकर बळी पडते. थोडक्यात भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी नात्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना पुरेशा पालाशचा आणि सिलिकॉनचा योग्य प्रमाणात उपयोग करणे जरुरीचे आहे. पालाशचा पुरवठा करणारी खते (उदा. म्युरेट ऑफ पोटॅश) परदेशातून आयात करावी लागत असल्यामुळे ती महाग आहेत.  सिलिकॉनचा पुरवठा करणारी खते (उदा. कॅल्शियम सिलीकेत स्लॅग) अदयाप गरज न जाणवल्यामुळे भारतीय बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपणास वापरायची असल्यास ही खाते आयात करावी लागतील आणि ते भात शेतीला परवडणार नाही.

भात पिकाच्या दीर्घकालीन उत्पादन वाढीसाठी भात पिकाने जमिनीतून घेतलेला पालाश व सिलिकॉन जमिनीस परत करणे म्हणजेच त्याचा फेरवापर करणे हा एक परवडणारा उत्तम उपाय आहे असे लक्षात येईल. भात पिकातील पळश व सिलिकॉन फेरवापरासाठी शेतकरी खालील दोन पद्धतीचा वापर करू शकतात.

अ) भाताचा पेंढा लावण्यापूर्वी चिखलात गाडावा:- न भिजलेला भाताचा पेंढा भात लावणीपूर्वी हेक्टरी फक्त दोन टन या प्रमाणात शेवटच्या चिखलणीनंतर पसरावा. नंतर पायाने तुडवून चिखलात गाडावा. असे केल्याने हेक्टरी अंदाजे ३०-४० किलो पालाशचा व १२०-१४० किलो सिलिकॉनचा पुरवठा होऊ शकतो. या लेखात वर्णिलेल्या सुधारित भात पद्धतीचा शेतकरयाने अवलंब केला तर त्यास भाताचे उत्पादन सरासरी हेक्टरी ४ टनापर्यंत मिळू शकेल म्हणजेच त्याला प्रती हेक्टरी ४.५ टन पेंढा मिळेल. त्यापैकी निम्मा पेंढा त्याने जनावरासाठी चार म्हणून वापरला तरी २ टन पेंढा वाचवून (नीट रचून ठेवून) पुढील हंगामात शेतात गाडण्यासाठी उपयोगी पडेल. इगतपुरी, फोंडाघाट व लोणावळा येथे केलेल्या शेत्प्रयोगात भाताचा पेंढा गाडल्यामुळे भाताचे उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे.

ब) भाताच्या तूसाची काळी राख रोप वाफ्यात बी पेरण्यापूर्वी मिसळावी:- भाताच्या तूसाची काळी/काळसर रंगाची राख रोप वाफ्यात प्रत्येक चौरस मीटरला अर्धा ते एक किलो या प्रमाणात बी पेरण्यापूर्वी ४ ते १० से.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर भाताचे बी शक्यतो ओळीत पेरून रोप तयार करावे.

तूसाची काळी/काळसर रंगाची राख (पांढरी शुभ्र राख नव्हे) भाताचे  राबात जाळून करता येईल. असे करण्याने राख मिळते पण जळताना निर्माण होणारी उष्णता वाया जाते. योग्य प्रतीची काळसर राख तयार करण्याचा कार्यक्षम मार्ग म्हणजे शेतकऱ्याने रोजचा स्वयंपाक करण्यासाठी ‘लो तर’ नावाची व्हिएतनामी शेगडी वापरावी.

सर्वसाधारणपणे मध्यम आकाराच्या लो ट्रो शेगडीत प्रती तासाला सुमारे १-५ किलो तूस जळते. सहा माणसे असलेल्या मध्यम शेतकरी कुटुंबास अशी शेगडी वापरण्यासाठी अंदाजे ९००-१००० किलो तूस पुरेल असा अंदाज आहे.

या सुधारित भात पद्धतीचा वापर केल्यास शेतकऱ्यास हेक्टरी सरासरी चार टन भाताचे उत्पादन मिळू शकेल व त्यापासून मिळणारे सुमारे १ टन तूस शेतकऱ्यास अंदाजे २५०-३०० दिवस रोजच्या स्वयंपाकासाठी पुरेल. शेगडीखालील गोळा केलेली राख एका हेक्टरला पुरतील इतकी भाताची रोपे करण्यासाठी पुरेशी आहे. तूसाची राख रोप वाफ्यात वापरल्यामुळे सिलिकॉनचा पुरवठा होतो व भाताची रोपे निरोगी आणि टणक होतात. तूसाची राख वापरून तयार केलेली जया भाताची रोपे शेतात लावल्यानंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे कर्जत येथील कृषि संशोधन केंद्राने केलेल्या शेतप्रयोगात आढळले. तसेच तुसाच्या राखेच्या वापरामुळे चिमणसाळ, कोळपी भाताची रोपे सुमारे एक महिन्यापर्यंत पानावरील करपा रोगास प्रतिकार करू शकतात असे लोणावळा येथील प्रयोगात दिसून आले. तुसाच्या राखेच्या वापरामुळे इंद्रायणी जातीच्या भातावर स्कॉल्ड रोगाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

तूसाची राख वापरण्याचा एक अप्रत्यक्ष फायदा

वनशेती तत्वानुसार शेतकऱ्याने घराच्या सभोवती पडीक जमिनीवर, बांधावर, कुंपण म्हणून अथवा मिळेल त्या जागेवर गिरिपुष्प झाडे लावावीत. त्यासाठी कृषि खाते, वनखाते, कृषि विद्यापीठे व खाजगी सेवा संस्था मदत करण्यास तयार झाले आहेत. ही गीरीपुष्पांची झाडे कोकणात व घाटावर सर्वसाधारणपणे २-३ वर्षात पुरेशी वाढतात. त्यासाठी बियापासून तयार केलेली दोन ते चार महिन्याची रोपे किंवा लाकडी फांद्या (दोन ते चार सें. मी. व्यासाच्या व ३०-१००सें. मी. लांबीच्या) आणून एक ते दीड मीटर अंतरावर लावाव्यात. दोन ते चार झाडापासून मिळणारा हिरवा पाला (अंदाजे २० किलो) एका गुंठ्यास (हेक्टरी २ टन) पुरेल.

शेतकऱ्याने गिरीपुष्पाच्या फांद्या बुंध्यापासून (३०-४०) सें. मी. उंचीवर कापाव्यात व शेवटच्या चिखलणीपूर्वी ६-७ दिवस अगोदर शेतात पसराव्यात. या कालावधीत फांद्यांवरील पाने शेतात गळून पडतात. त्यानंतर उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी अगर अन्य शेतीच्या कामासाठी वापराव्यात व शेवटची चिखलणी नेहमीप्रमाणे करावी. असे केल्याने शेतास सेंद्रिय खतामार्फत हेक्टरी १२-१५ किलो नत्र मिळेल. या पद्धतीने गीरीपुष्पाचे हिरवळीचे खत परवडण्यासारखे आहे, कारण ते बरीच कमी खर्चाचे आहे. शेतकऱ्यास दरवर्षी हिरवळीच्या खताच्या बियाण्याचा खर्च करावा लागत नाही. हिरवळीचे खत गाडण्यासाठी नेहमीच्या लाकडी नांगराने केलेल्या चिखलणीवर काम भागते. या खताचा दुसरा महत्वाचा फायदा असा कि या खतातील नत्राचा पुरवठा रासायनिक खतास पूरक ठरतो.

सूत्राप्रमाणे युरिया ब्रिकेट स्वरुपात खोल खोचून दिलेला नत्र लावणीनंतरच्या सुरुवातीच्या काळात भात पिकास उपलब्ध होत नाही. नेमक्या त्याच कालावधीत गिरीपुष्पाचा पाला झपाटयाने कुजत असल्यामुळे त्या पाल्यातील नत्र व काही प्रमाणात इतरही अन्नद्रव्ये भात पिकास उअपलब्ध होतात. या सुरुवातीच्या कालावधीनंतर (सुमारे २-३ आठवड्यानंतर) ब्रिकेट खतातील नत्र व स्फुरद अन्नद्रव्यांची गरज खंड न पडता योग्य रीतीने भागल्यामुळे  ब्रिकेट खताचा कार्यक्षमता वाढण्यास मदत होते, असे कोकण कृषि विद्यापीठाने केलेल्या शेत प्रयोगावरून दिसून आले आहे.

सूत्र तीन सशक्त भात रोपांची नियंत्रित लावणी

कोकणातील आणि घाट विभागातील शेतकऱ्यांचे भाताचे सरासरी उत्पादन अतिशय कमी (१-२ टन प्रती हेक्टरी) आहे. त्याची बरीच कारणे आहेत. त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे उंच वाढणाऱ्या स्थानिक भात जातींची अनियंत्रित लावणी हे आहे. म्हणून सरासरी हेक्टरी उत्पादन वाढवून भातशेती फायद्याची करावयाची असेल तर अधिक उपजाऊ भाताची बुटकी, जास्त फुटवे देणारी जात वापरून नियंत्रित लावणी केली पाहिजे.

सुधारित २० X २० सें.मी. असलेल्या खुणांची दोरी वापरून एकाचवेळी दोन ओळींची लावणी करावी. त्यानंतर ४० सें.मी. मागे सरकावे. त्याचबरोबर दोरीही ४० सें. मी. मागे सरकवावी. पुन्हा सुधारित २० X २० सें.मी. अंतरावर दोन ओळी लाव्यावात. अशा प्रकारे भात लावणी पूर्ण करावी.

दुसऱ्या सूत्राप्रमाणे चिखलणी करून खाचर तयार केल्यानंतर तूसाची काळी राख वापरून तयार केलेल्या भाताच्या ३-४ आठवडयाच्या सशक्त रोपांची नियंत्रित लावणी करावी. म्हणजेच रोपे सुधारित २० X २० सें. मी. अंतरावर लावावी. त्यामुळे आव्यांची संख्या प्रति चौरस मीटरला २५ रहाते. सुधारित जातींना स्थानिक भातापेक्षा जास्त फुटवे येतात. त्यामुळे प्रत्येक आव्यात ४-६ रोपांपेक्षा जास्त रोपे लावू नयेत. नियंत्रित भात लावणीसाठी खालील दोन पद्धती विकसित केलेल्या आहेत.

अ) बांबू मार्गदर्शक लावणी पद्धती:- एक चार मीटर लांबीचा सरळ बांबू, साधी अगर प्लास्टिकची सुतळी व कोयता इतके साहित्य असले की शेतकरी स्वतःच्या शेतावरच बांबू मार्गदर्शक तयार करू शकतो. बांबू मार्गदर्शकांची लांबी उपलब्ध असलेल्या कामगारांच्या संख्येनुसार (एका कामगारास १४५ ते १८५ सें.मी.) कमी अधिक ठेवावी.

ब) दोन-ओळी लावणी पद्धती:- ही लावणी पद्धत पूर्वीच्या जपानी भात लावणी पद्धतीप्रमाणेच आहे. फक्त लावणीस कमी मजूर लागावेत व चौथ्या सूत्राप्रमाणे ब्रिकेट खताचा वापर सहज सोप्या रीतीने करता यावा म्हणून त्या लावणी पद्धतीत खालील सुधारणा करण्यात आल्या आहेत.

रोपांमधील अंतर सुधारित २० X २० सें.मी. राखण्यासाठी लावणी दोरीच्या खुणामधील अंतर आलटून पालटून २५ सें. मी., २५ सें. मी., १५ सें. मी., २५ सें. मी., १५ सें. मी. असे ठेवले आहे.एकाच वेळी दोन ओळी लावल्या जातात व त्यानंतर कामगार (२० सें.मी. अंतराऐवजी) प्रत्येक वेळी ४० सें. मी. मागे सरकतात.दोन-ओळी लावणी पद्धत वापरून नियंत्रित भात लावणी सहजपणे करता येते.

वरील दोन्ही लावण पद्धतीची प्रात्यक्षिके ठाणे, रायगड, नाशिक, व धुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करून दाखविली. आदिवासी भात शेतकऱ्यांनी बांबू मार्गदर्शक पध्दत जास्त पसंद केली. सुरुवातीस त्यांना दोन्ही लागवड पद्धती अवघड वाटल्या पण सवय झाल्यानंतर त्यांनी सहजपणे आपणहून त्यांचा वापर केला. महिला कामगारांना प्रशिक्षण दिल्यास दोन्ही लागवड पद्धतीचा वापर करणे सोपे होईल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

नुसती नियंत्रित लावणी केली व चौथ्या सूत्राप्रमाणे युरिया ब्रिकेट खताचा वापर केला नाही तर शेतकऱ्यास भात उत्पादनात लक्षणीय वाढ होणार नाही व आर्थिकदृष्टया परवडणार नाही. थोडक्यात नियंत्रित लावणीचे पुरेपूर फायदे युरिया ब्रीकेटचा वापर केल्याशिवाय शेतकऱ्यास मिळणार नाहीत.

सूत्र चर स्फुरदयुक्त युरिया ब्रिकेट स्वरुपात रासायनिक खताचा कार्यक्रम वापर:- ज्या रासायनिक खताच्या वापरामुळे भाताचे उत्पादन लक्षणीय वाढले व भारतात भातामध्ये हरितक्रांती झाली तीच खते कोकणातील व घाटावरील शेतकरी अद्यापही हव्या त्या प्रमाणात वापरत नाहीत. त्याला करणे बरीच आहेत. ती महाग आहेत. ती वापरण्यासाठी कार्यक्षम पद्धती नाही. बऱ्याच वेळा भात खाचरात फेकून टाकलेले खत पावसाच्या जोरदार सरीमुळे मोठया प्रमाणावर वाहून जाते. या अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना परवडेल असे नवीन स्फुरद (डाय अमोनियम फॉस्फेट) युक्त ब्रिकेट खत व ते वापरण्याची कार्यक्षम पध्दत विकसित केली आहे.

नवीन सुधारित डीएपीयुक्त युरिया ब्रिकेटींग मशिनच्या सहाय्याने बाजारात मिळणारी युरिया व डीएपी खते वापरून गावातच तयार करता येईल. ब्रिकेट बनवण्याचा खर्च खतांच्या मूळ किंमतीच्या अंदाजे १५ ते २० टक्के होतो. नुकतेच जनसेवा फाउंडेशन, दादरा संस्थेने क्रांती या नावाचे ब्रीकेटींग मशीन तयार केले आहे. ब्रीकेटरमधून तयार केलेली २.७ ग्रॅम वजनाची डीएपीयुक्त युरिया ब्रिकेट चौथ्या सूत्राप्रमाणे वापरल्यास प्रति हेक्टरी ५६ किलो नत्र व १४ किलो स्फुरद दिला जातो.

तिसऱ्या सुत्रानंतर सुधारित भाताची नियंत्रित लावणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा लावणीच्या दुसऱ्या दिवशी युरिया ब्रिकेट खत पिकास खालीलप्रमाणे द्यावे २०० ते ४०० ग्रॅम युरिया ब्रिकेट खत कामगाराने कमरेभोवती बांधलेल्या प्लास्टिक पिशवीत घ्यावे. कोणत्याही एका कोरड्या हाताने पिशवीतून एक वेळेस ५-६ ब्रिकेटस काढाव्यात व दुसऱ्या हातात एका वेळी एक ब्रिकेट टाकावी. त्यानंतर प्रत्येक चार आव्यांच्या (१५-१५ सें. मी. चौरसात) मध्यभागी एक ब्रिकेट हाताने ७-१० से.मी. खोलीवर खोचावी.

नुकतीच चिखलणी केल्यामुळे लावणीचे वेळी चिखल मऊ असतो. त्यामुळे ब्रिकेट खोचताना हातास इजा होत नाही (अवघड जात नाही). ब्रिकेट खोच्ल्यानंतर हात चिखलाच्या बाहेर काढतात त्याजागी पडलेले भोक चिखलाने त्वरित बंद होते व प्रत्येक युरिया ब्रीकेत्मधील जवळजवळ सर्व नत्र व स्फुरद ब्रिकेट खोचली त्याच ठिकाणी चिखलात खोल रहाते व त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून न जाता भात पिकास सावकाशपणे योग्यवेळी उपलब्ध होतो. भात रोपे नत्र व स्फुरद अन्नद्रव्यांचा चांगला उपयोग करू शकतात. व उत्पादन वाढण्यास लक्षणीय मदत होते. याउलट ब्रिकेट खोचण्याची क्रिया  म्हणजे लावणीच्या तिसऱ्या दिवसांनतर केली तर उल्लेख केलेला फायदा मिळत नाही. चिखल घट्ट झाल्यामुळे ब्रिकेट खोचलेल्या जागी भोक उघडे रहाते. युरिया व डीएपी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाण्याची शक्यता वाढते व कार्यक्षमता कमी होते. ब्रिकेट उशीरा खोचल्यामुळे आणखी तोटे होतात. लावणीच्या वेळी असलेला मऊ चिखल घट्ट होत जातो. आणि मग ब्रिकेट हाताने १० सें. मी. खोलीवर खोचता येत नाही. ती उथळ खोचली जाते. खोल खोचण्याचा प्रयत्न केला तर जड श्रम पडतात व हातास इजा संभवते. असे जादा श्रमाचे व हातास इजा करणारे काम करण्यास कामगार नाखूष असतात व काम केले तर त्या कामाची प्रत चांगली नसते. याचा परिणाम होऊन मजुरी वाढते. उदा. सुधारित २० X २० सें.मी. वापरल्यास एका हेक्टरमध्ये ६२५०० ब्रिकेटस खोचाव्या लागतात. जर प्रत्येक ब्रिकेट खोचण्यास एक सेकंद जादा लागला तर हेक्टरी जवळ जवळ दोन दिवस मजुरी लागेल.

तिसऱ्या सूत्राप्रमाणे सुधारित २० X २० सें.मी. अंतरावर रोपे लावल्यामुळे हाताने ब्रिकेट खोचण्याची क्रिया खुप सोपी होते व जलद करता येते. कारण ब्रिकेट खोचणारा कामगार २५ सें. मी. चालण्याच्या मार्गातून बराच जलदपणे चालू शकतो. तसेच तो ब्रिकेट खोचण्याच्या जागा (१५ X १५ सें. मी. आकाराचे चर आव्यांचे चौरस) सहजासहजी ओळखू शकतो. त्यामुळे ब्रिकेट खोचण्याच्या जागा शोधण्यात त्या कामगाराचा वेळ वाया जात नाही. समजा प्रत्येक ब्रिकेट खोचण्याच्या जागी एक सेकंद वाचला तर हेक्टरी अंदाजे दोन दिवसाची मजुरी वाचू शकेल.

थोडक्यात तिसऱ्या सूत्राप्रमाणे भाताची नियंत्रित लावणी करून चौथ्या सूत्राप्रमाणे युरिया ब्रिकेट खताचा वापर केला तर ४०-४५ टक्के एकूण मजुरी बचत होऊ शकते. ४४ टक्के कमी खत वापरून आणि ३० टक्के कमी बी वापरून ५० टक्क्यापर्यंत भाताचे व पेंढ्याचे उत्पादन वाढते, असे १९९३ ते १९९६ सालात ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यातील दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रयोगात दिसून आले आहे. चारसूत्री भात शेती कोकणातील आणि घाट विभागातील शेतकऱ्यांच्या फायद्याची कशी?

कोकणातील व घाट विभागातील हवामान, जमीन व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन विकसित केली आहे.

१. १९३३ ते १९९६ या हंगामात जवळजवळ २०० आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर त्यांनी स्वतः केलेल्या प्रयोगात सूत्र 3 व ४ वापरून सर्वसाधारण सरासरी ४ टन भात इतके उत्पादन आले व भात शेती किफायतशीर झाल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकऱ्याने जादा खर्च केलेल्या प्रत्येक रुपयास रु. ४ ते १० इतका परतावा त्याचे पदरात पडला आहे.

२. भाताच्या तुसामधील व पेंढ्यामधील पालाश व सिलिकॉनचा फेरवापर आणि मर्यादित गिरिपुष्प हिरवळीच्या खताचा वापर नियमितपणे केला तर बऱ्याच प्रमाणात रोग व किडीचा प्रतिकारक (औषधे न वापरता) होऊ शकेल, व खाचरात जमिनीची उत्पादनक्षमता टिकवता येईल.

३. महिला शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन वाढीची भरीव कामगिरी करून दाखविता येईल कारण स्वयंपाकासाठी तुसाची शेगडी वापरून रोप वाफ्यात टाकण्यासाठी राख उपलब्ध करून देता येईल. अप्रत्यक्षपणे वन संरक्षण होऊ शकेल. नियंत्रित लावणी करून युरिया ब्रिकेटचा वापर महिला कामगार सहजासहजी शिकतात व स्वतंत्रपणे करू शकतात.

४. एकत्रितपणे संपूर्ण चारसूत्री भातशेती पद्धतीमुळे एकूण खर्चात बचत करता येईल.

शिफारशीपेक्षा ४४ टक्के रासायनिक खताची बचत होऊ शकेल.

या बियाण्याची ४० ते ५० टक्क्यापर्यंत बचत होऊ शकेल. त्यामुळे त्याच प्रमाणात रोप तयार करण्याच्या, उपटण्याचा व लावण्याचा खर्च कमी होऊ शकेल. हेक्टरी रोपांची संख्या शिफारस केलेल्या रोपांच्या संख्येपेक्षा कमी केल्यामुळे लावणीस व कापणी मजुरीत बचत होऊ शकते. रासायनिक खताच्या कार्यक्षम वापरामुळे तणांचा त्रास कमी होतो व तण काढण्यासाठी लागणारी मजुरी वाचेल. थोडक्यात चार सूत्री भातशेतीमुळे हवा, पाणी, जमीन व जंगलातील झाडे या सर्वाचे मोठया प्रमाणावर संरक्षण होऊन भात उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकेल.

धन्यवाद....

No comments:

Post a Comment