Monday 23 May 2016

पत्र

पत्र
“ तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय ? “
“ अवो ,काई न्हाई ,चुलीच्या धुरानं पाणी आलंय जरा,
अन तुमच्या डोळ्यात का पाणी आलंय ?”
“अगं ,वावधान उठलं न फुफाटा डोळ्यात गेलाय बघ "
दोघांनी एकमेकांना खोटंच सांगितलेलं.
तालुक्याला शिकणाऱ्या पोराचं पत्र आलेलं.
खुशाली कळवली ,अभ्यास नीट करतोय म्हणून सांगितलं त्याचा दोघांना आनंद झालेला.
पत्र आलेलं डालडाच्या पत्र्याच्या डब्यात, भाकरीच्या रिकाम्या फडक्याखाली ठेवलेलं.
त्याला भाकरीचा,लोणच्याचा गंध लागलेला.
काल सकाळी आईनं पाठवलेल्या भाकरीच्या खाली डब्याच्या तळाला वडिलांनी लिहिलेलं पत्र वाचून पोराच्या डोळ्यातून पाणी आलेलं.
" पाऊस बराय,गहू काढणीला आलाय ,गाईला कालवड झालीय तिचा खरवस पाठवलाय तुझ्या आईनं ,तुझ्या मित्रांना पण दे ,बाकी खुशाल ,सुट्टीत आल्यावर बोलू ,काळजी घ्या "
घरच्या जुन्या वहीच्या चतकोर पानावर सातवी पास वडिलांनी लिहिलेलं पत्र.पेनाची कांडी संपली म्हणून शेवटच्या ओळी पेन्सिलनं लिहिलेल्या.
पण त्या अक्षरांना गंध असायचा ,मायेचा ओलावा असायचा.भाकरीचा,भाजीचा,चटणीचा आणि आईवडिलांच्या मायेचा गंध.
हजारो पत्र्याचे डबे रोज एसटीने अशी आईबापाची खुशाली पोरांना व पोरांची खुशाली आईबापाला कळवत असायचे.
लांबच्या गावात शिक्षणाला असलेल्या पोराला, परगावी असलेल्या पाव्हण्या रावळे ,नातेवाईकाला खुशालीचं पोस्टकार्ड जायचं.कधीतरी कुणीतरी गेल्याची व दशक्रियेची माहिती देणारी काळ्या शाईत छापलेली पांढरी कार्ड असायची.
परगावी दिलेल्या लेकीला बाप अंतर्देशीय पत्र टाकायचा.नीळं पत्र आलं न घरातल्या कुणीतरी आणून दिलं कि कामातून वेळ काढून सासुरवाशीण लेक अधिरतेने अल्लाद पत्रं फोडून वाचायची.
“ अनेक उत्तम आशिर्वाद " असं वाचलं कि बापाचा खरखरीत हात गालावरून फिरल्याचा भास व्हायचा.
पत्र वाचताना लेकरू मांडीवर बसलेलं असायचं न " पिंट्याला गोड पापा " वाचलं कि नकळत हात लेकराच्या डोक्यावरून फिरायचा.
शेवटाला " सगळे खुशाल आहेत " वाचलं की डोळ्यातून पडलेल्या थेंबांनी शाई ओली होऊन अक्षरं विस्कटून जायची.
**
रात्री एकांतात पारायण करताना फुटलेला हुंदका नवऱ्याच्या हसण्यात विरघळून जायचा.
अक्षरावरून हात फिरवताना आईवडिलांच्या मायेचा जणू स्पर्श जाणवायचा.
पोस्टाच्या पिवळ्या पाकिटातून राख्या यायच्या नाहीतर तिळगुळ यायचे ,बारीक प्लास्टिकच्या पुडीत ठेवलेले.
भावाच्या आठवणी ,लटकी भांडणं सगळं लख्ख आठवायचं.
लग्न जमलेली ,जमवण्याच्या प्रयत्नात असलेली ,कॉलेजला असलेली जोडपी निगुतीनं गुलाबी सुगंधी कागदावर चांगलं अक्षर असलेल्या मित्र नाहीतरी मैत्रिणीकडून लिहून घेऊन तेही रंगीत पेनानं " मोह्ब्ब्तका इजहार " करायची.
मग अशी पत्रं एखादी वही पुस्तक देण्याच्या निमित्ताने दिली जायची.
मग अशी सुगंधी पत्रं तर कुठल्यातरी वहीच्या मधल्या पानात लपून बसायची न त्याचीही पारायणं व्हायची.
लग्न ठरलेल्या जोड्यांची पत्रं घरात आली कि कुणी फोडत नसलं तरी त्यावरून लहान भाऊ ,बहिण,वहिनी चेष्टा मात्र करायची अन अशी चेष्टाही गोड गुदगुल्या करायची.
कधीतरी अवेळी दरवाजावर पडलेली थाप आणि " तार " अशी हाक ऐकली कि काळजात धस्स व्हायचं न छातीचा ठोका चुकायचा.
आलेली तार बहुतेक वेळा कुणाच्या तरी गेल्याची वर्दी द्यायची तर क्वचित प्रसंगी नोकरीवर रुजू व्हा म्हणून निवड झाल्याची बातमी देऊन आनंदी करायची.
साध्या चतकोर पानावर लिहिलेली चिठ्ठी,पोस्टकार्ड ,अंतर्देशीय पत्रं असोत कि गुलाबी कागदावर लिहिलेली पत्रं असोत ,त्या अक्षरांचा सुगंध आणि स्पर्श अगदी नेमका जाणवायचा ,अगदी मनाच्या तळाला जाऊन पोहोचायचा.
बदल चिरंतन असतो.काळ बदलला.स्मार्टफोन आणि सोशल मिडीयाच्या जमान्यात असली पत्रं पाठवणं म्हणजे बैलगाडीचा स्पीड वाटेल एखाद्याला.
पण वाट पाहण्यातली आतुरता ,हुरहूर आणि अप्रूप आता तेवढं राहीलं नाही.
तसं पाहिलं तर काहीच आता पहिल्यासारख राहीलं नाही...!!

No comments:

Post a Comment