ओळख औषधी वनस्पतींची - काडेचिराईत
- शास्त्रीय नाव - ॲडोग्राफिस पॅनिकुलाटा (Andrographis paniculata)
- वनस्पती परिचय - ही एक झुडूपवर्गीय लहान क्षुप स्वरूपाची वनस्पती आहे. हे क्षुप ३० ते ६० सें.मी. उंच वाढते. त्याचे खोड चौकोनी असून, पाने भाल्यासारखी टोकदार व हिरवी २ सें.मी. लांबीची असतात. तसेच पिकलेल्या पानांचा रंगही किंचित काळपट असतो.
- फुले -फुले मंजिरी व गुलाबी रंगाची असतात.
- फळे - फळे बोंडवर्गीय असून, १.५ ते २ सें.मी. लांबीच्या चपट्या शेंगेसारखी असतात. शेंगा पक्व झाल्यावर, काळपट तपकिरी रंगाच्या असतात.
- बिया - शेंगेमधील बी पिवळट करडे असून, मोहरीपेक्षा लहान असते.
- सर्व पंचांग अतिशय कडू असतो. भारतात काडेचिराईतच्या १९ प्रजाती आहेत. त्यापैकी पॅनिक्युलेटा ही प्रजाती औषधीदृष्ट्या महत्त्वाची आहे.
- औषधी भाग - पंचाग (संपूर्ण वनस्पती)
औषधी गुणधर्म -
- या झाडाच्या कोवळ्या पानांचा काढा लहान मुलांच्या हगवणीवर उत्तम आहे.
- सध्या या वनस्पतीच्या पाल्याचा रस मधुमेहामध्ये दिला जात आहे.
- ५ ग्रॅम चिराईत २० ग्रॅम पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्याचे वस्त्रगाळ करून ५ ग्रॅम मधाबरोबर दररोज 7 दिवस प्राशन केल्यास आमवात, जीर्णज्वर व सर्व प्रकारच्या गर्मीरोगावरील उपचारात फायदेशीर ठरते.
- अंगात मुरलेल्या थंडीतापावर काडेचिराईत, सुंठ, कुटकी, खारीक व कुड्याची साल यांच्या काढा करून, मध घालून द्यावा.
- सर्व प्रकारच्या तापावर चिराईत व माका यांचा काढा करून मध घालून द्यावा. किंवा चिराईत, सुंठ व डिकामली यांचा काढा उकळून आठवा भाग राहिला असता दिवसांतून तीन वेळा प्राशन करावे.
रासायनिक घटक - पानांमध्ये पाण्यात विरघळणारी कडू लॅक्टोन, ॲडोग्रॅफोलीड असते.
लागवड नियोजन
- हवामान व जमीन - या पिकास उष्ण समशीतोष्ण, भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान मानवते. भरपूर गाळाची सेंद्रिय पदार्थ अधिक असलेली जमीन योग्य असते.
- लागवड व पेरणी - एक नांगरणी करून २-३ कुळवण्या करून, जमीन भुसभुशीत करावी. ३० सें.मी. सरी व वरंबे पाडावेत. लागवड बिया व रोपांपासून करता येते. मे, जून महिन्यांत बी थेट पेरून किंवा प्रथम गादीवाफ्यावर रोपे तयार करून लागवड करता येते. एकरी १५० ग्रॅम बी लागते. पेरलेले बी ८-१० दिवसांनी उगवते. ४० ते ४५ दिवसांची तयार रोपे लागवडीसाठी वापरावीत.
- खते व पाणीपुरवठा -एकरी ८-१० टन कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. मोसमी पावसावर हे पीक संपूर्णपणे तयार होते.
- रोग व कीड - या पिकावर रोग व किडीचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र वेळच्या वेळी तण काढणी आवश्यक आहे.
- पीक काढणी - ९० ते १०० दिवसांनी पीक फुलावर येते, तेव्हा काढणी करावी. त्यानंतर पाने गळण्यास सुरवात होते. पीक उपटून काढून, स्वच्छ करावे. ते सावलीत वाळवावे. त्याची भुकटी तयार करावी.
- उत्पादन - एकरी १ ते १.२५ टन वाळलेले पीक (पंचांग) मिळते.
No comments:
Post a Comment