सद्यःस्थितीत जून-जूलै महिन्यांमध्ये लागवड
केलेली मृग बाग व अक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये लागवड केलेली कांदेबाग
उभी आहे.
मृगबाग ही निसवणीची अवस्था पूर्ण होऊन घड पक्वतेच्या अवस्थेत आहे, तर कांदेबाग वाढीच्या अवस्थेत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्या दृष्टीने केळी बागेत पुढील उपाययोजना कराव्यात.
मृगबाग ही निसवणीची अवस्था पूर्ण होऊन घड पक्वतेच्या अवस्थेत आहे, तर कांदेबाग वाढीच्या अवस्थेत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्या दृष्टीने केळी बागेत पुढील उपाययोजना कराव्यात.
- मुख्य खोडालगत अालेली पिले धारदार विळीने कापावीत. बाग तणमुक्त ठेवावी. कापलेली पिले व तण खोडाजवळ ठेवून त्याचा आच्छादन म्हणून वापर करावा.
- खोडाच्या भोवती लोंबकळणारी रोगविरहित वाळलेली पिवळी पाने कापू नयेत. त्यामुळे उष्ण हवेपासून झाडाचे संरक्षण होण्यास मदत होईल.
- निसवणीच्या किंवा घड पक्वतेच्या अवस्थेतील मृगबागेस फर्टीगेशन करण्यासाठी हजार झाडांसाठी प्रती आठवडा पाच किलो युरिया व सात किलो म्युरेट अाॅफ पोटॅश पाण्यातून द्यावे.
- मुख्य वाढीच्या अवस्थेतील कांदेबागेस फर्टीगेशन करण्यासाठी हजार झाडांसाठी प्रती आठवडा १३ किलो युरिया व आठ किलो म्युरेट अाॅफ पोटॅश पाण्यातून द्यावे.
- घड पूर्ण निसवल्यानंतर व केळफूल तोडल्यानंतर त्यावर १०० लिटर पाण्यात ५० ग्रॅम पोटॅशिअम डाय हायड्रोजन फॉस्फेट अधिक १०० ग्रॅम युरिया अधिक १० मिली स्टीकर मिसळून फवारणी करावी.
- तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग ही वाढत आहे. अशा स्थितीत केळी पिकाला पाण्याचा ताण पडू न देता गरजेइतका पाणीपुरवठा ठिबक सिंचनाने करावा. मृगबाग केळीसाठी २० ते २२ लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवस तर कांदेबाग केळीसाठी १८ ते २० लिटर पाणी प्रतिझाड प्रती दिवस देण्याची गरज आहे.
- वाळलेली पाने (रोगविरहीत), उसाचे पाचट, गव्हाचा भुसा, सोयाबीन भुसा यांचा वापर करून सेंद्रिय आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. जमिनीचे तापमान नियंत्रित राहिल्यामुळे मुळांना इजा पोचत नाही. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- केळी लागवडीच्या वेळी बागेभोवती सजीव कुंपणाची (उदा. शेवरी) लागवड केली नसल्यास बागेभोवती हिरव्या शेडनेटचे वारा प्रतिरोधक उभारावे त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व उष्ण हवेपासून केळी बागेचे संरक्षण होते.
- पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी कोअोलीन या बाष्परोधकाचा वापर करावा. त्यासाठी पावसाळा सुरू होईपर्यंत १५ दिवसांच्या अंतराने कोअोलीन (८ टक्के) बाष्परोधक १० लिटर पाण्यात ८०० ग्रॅम घेऊन फवारणी करावी.
- उन्हापासून घडाचे संरक्षण करण्यासाठी घड केळीच्या वाळलेल्या पानांनी अथवा वर्तमानपत्राने झाकून घ्यावेत.
No comments:
Post a Comment